'महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे माझ्या मातीने केलेला माझा गौरव' – आशा भोसले

२५ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य शासनाचा २०२१ सालचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला होता. त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी गुरूवारी सकाळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं.;

Update: 2021-07-29 12:21 GMT

२५ मार्च २०२० रोजी महाराष्ट्र राज्य शासनाचा २०२१ चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला. त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज सकाळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केलं. यावेळी संगीतकार राहुल रानडे यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी देखील उपस्थित होते.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड झाल्याबद्दल त्यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केल. 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं. तर 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेलं कौतुक आहे, या शब्दांत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. राज्य शासनाचा २०२१ सालचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे.

कॅबिनेट मंत्री अमित देशमुख यांनी यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना पुष्पगुच्छ, महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याचा शासन निर्णय, आशा भोसले यांच्या कारकिर्दीवर आधारित 'सुवर्णरंग' हे पुस्तक आणि महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रकाशन असलेलं 'लोकराज्य' हे मासिक यावेळी भेट म्हणून देण्यात आलं. भारतरत्न लता मंगेशकर आणि महाराष्ट्र भूषण आशा भोसले या संगीत क्षेत्रातील एक चमत्कार आहेत. आणि त्यामुळेच आशा भोसले यांची एकमताने या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्य शासन महाराष्ट्रात संगीत विद्यापीठ सुरू करण्यासंदर्भात आग्रही असून यासाठी संगीतातील दिग्गज मंडळींची मदत घेणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

याशिवाय "सुमधुर स्वरांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना नुकताच 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने आज त्यांचे निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले.पुरस्कार स्वीकारल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने आभार मानले." असं ट्विट देखील सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे.

मला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यासाठी मी सर्वांची आभारी आहे. परंतू 'महाराष्ट्र भूषण' हा पुरस्कार वेगळा आहे कारण हा माझ्या मातीने केलेला माझा गौरव आहे. हा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे घरच्यांकडून माझे कौतुक झाले आहे असे मी मानते, असं ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सांगितलं. या पुरस्कारासाठी मी राज्य शासनाची आभारी आहे. सध्या राज्यात कोविडचं संकट अजूनही संपलेलं नाही. तर गेल्या आठवड्यात चिपळूण, सांगली, कोल्हापूर येथे अतिवृष्टीमुळे बरंच नुकसान झालं आहे. राज्यातील परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सन्मान सोहळा आयोजित करावा अशी विनंतीही त्यांनी केली.

Tags:    

Similar News