रंगिला गर्ल बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधत नव्या राजकीय इनिंगची सुरुवात केली.
यापूर्वी कॉंग्रेसकडून लोकसभा लढलेल्या उर्मिला मोतोंडकरांचा राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्याआधी उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त जागेसाठी शिवसेनेच्या कोटय़ातून उर्मिला मातोंडकर यांचे नाव महाविकास आघाडी सरकारने पाठवलं होतं.
उर्मिला यांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता.
पक्ष प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. कंगना राणावतनं उर्मिला मातोंडकर यांचा उल्लेख सॉफ्ट पॉर्न स्टार असा केला होता. कंगनानं केलेल्या या टीकेनंतर मोठा वादंग निर्माण झाला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी सरळ 'नाही', असं उत्तर दिलं आहे. 'कंगनावर बोलायला पाहिजे त्यापेक्षा जास्त बोललं गेलंय', असं त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, राजकारणातून दूर राहिल्यानंतर वर्षभरानंतर उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिली होती. मातोंडकर यांचे वडील श्रीकांत मातोंडकर हे समाजवादी चळवळीशी केवळ जोडलेले आहेत. त्यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारत शिवसेनेची ऑफर स्विकारली होती.त्यानुसार आज दुपारी उर्मिला मातोंडकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर पोहोचल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केलं.