राज्यात भाजप विरोधात महाविकास आघाडी सामना चांगलाच रंगलेला पहायला मिळत आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टिका केली होती. त्यापाठोपाठ राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपच्या भुमिकेमुळे देशाच्या एकतेला धोका असल्याचे विधान केले आहे.
कर्नाटकातील एका महाविद्यालयातून सुरु झालेल्या हिजाब वादाचे लोण पुर्ण कर्नाटक राज्यात पसरले आहेत. तर त्यावर महाराष्ट्रातील बीड व मालेगावमध्ये प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. त्यापार्श्वभुमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी भाजपच्या भुमिकेमुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण होऊ शकतो, असे विधान केले आहे.
कर्नाटक राज्यातील उडुपी येथील एका महाविद्यालयात मुस्लिम मुली हिजाब परिधान करून येत होत्या. त्यावरून उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी भगवे पंचे घालून येण्यास सुरूवात केली. मात्र यामुळे महाविद्यालयाचे वातावरण कलुषित झाल्याने महाविद्यालयाने मुस्लिम मुलींना हिजाब परिधान करण्यास बंदी घातली. मात्र त्यानंतर हिजाब वादाचे लोण कर्नाटकभर पसरले. तर शिवमोगा आणि बागलकोट जिल्ह्यात दगडफेकीचे प्रकारही समोर आले. तर बीड आणि मालेगावमध्ये पहिले हिजाब, फिर किताब अशा आशयाचे फ्लेक्स लावले. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटायला सुरूवात झाली आहे. त्यावरुन विचारलेल्या प्रश्नाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले. तर वळसे पाटील म्हणाले की, हिजाब वादाला नको तितके महत्व दिले जात आहे. या वादाला जास्त महत्व देऊ नये. तसेच राज्यात विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी अशा विषयावर आंदोलन न करता शांतता राखावी.
पुढे पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांनी हिजाब प्रकरणावरून भारतावर टीका केल्याने दिलीप वळसे पाटील म्हणाले की, देशात भाजप दोन मतं तयार करून समाजामध्ये दुहीची बीजे पेरण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण होईल, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. तसेच या देशातील सर्वधर्माचे लोक एकत्रित गुण्यागोविंदाने रहायला हवेत, अशी भुमिका सर्वच पक्षांनी घेतली पाहिजे, अशी भुमिका दिलीप वळसे पाटील यांनी घेतली.