शिवसेना भवनासमोर राडा झाला पण दोनही पक्षांचे नेते काही शांतहोइनात
शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी आणि भाजपाच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल देसाई यांच्यात शाब्दिक वॉर
शिवसेना भवनासमोर झालेल्या शिवसेना भाजप राड्याचे पडसाद अजूनही राजकीय वर्तुळात उमटत आहेत. राम मंदिर जमीन खरेदीतील घोटाळ्यावरुन हा वाद झालेला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले हाणामारी झाली. पण कार्यकर्ते काय अजून शांत झालेले नाहीत. आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आव्हानांची मालिका सुरू झाली आहे.
शिवसेनेला जशास तसं उत्तर देऊ म्हणणाऱ्या भाजपाच्या सो कोल्ड नेत्यांनी फक्त वेळ आणि तारीख सांगावी आम्ही पुन्हा मैदानात येऊ असा इशारा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी दिला होता. यावर भाजपाच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राडेबाजी ही शिवसेनेची पहिल्यापासून प्रवृत्ती आहे मात्र आता महिलांवर हात उचलणे ही शिवसेनेची संस्कृती झाली आहे. तुम्ही राड्याची तारीख सांगा, आम्ही आमच्या विकासकामांच्या तारखा सांगतो असं चँलेज शीतल देसाईंनी शिवसेनेला दिलं आहे.
शीतल देसाई म्हणाल्या की, "शिवसेनेला त्यांच्या नव्या दोस्तांचा वाण नाही तर गुण लागला. लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा हक्क आहे. परंतु भाजपाच्या आंदोलनाला शिवसेनेने हिंसक मार्गाने विरोध केला. मुद्दे संपले की, गुद्दे सुरू होतात. हिंसक प्रत्युत्तर दिल्यास भाजपाचा कोणताही कार्यकर्ता अरेला कारे करणारच." असा इशाराच त्यांनी शिवसेनेला दिला आहे.