'मी हरामखोर नाही' हे का सिद्ध करावं लागतंय?; चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं बोलले जात असून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठाकरे सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला आहे. यावरूनच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे. 'मी हरामखोर नाही' हे का सिद्ध करावं लागतंय?, असा खोचक टोलाही चित्रा वाघ यांनी राऊतांना लगावला आहे. "संजयजींच्या अस्वस्थेमुळे महाविकासआघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतंय. एकच कोडं कुणीही हरामखोर म्हणलेलं नसताना 'मी हरामखोर नाही'हे का सिद्ध करावं लागतंय? संजयजी माझं आवाहन की तुम्ही ६ आठवड्याचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं" असा टोला चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून लगावला.
गेल्या काही दिवसांपासून विवध मुद्यावरून कॉंग्रेस आणि शिवसेना एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहे. त्यात शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होत असल्याच्या बातम्या येत आहे. पण असं असतानाही भाजप-शिवसेना नेत्यामध्ये एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप मात्र सुरूच आहे.