औरंगाबाद सामूहिक बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार; रूपाली चाकणकरांची माहिती
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज पैठण तालुक्यात झालेल्या दरोडा आणि सामूहिक बलात्कार घटनेतील पीडित महिलांची भेट घेतली. तसेच याचवेळी पोलिसांकडून घटनेची माहिती जाणून घेत पुढील तपासाबाबत सूचना सुद्धा केली.
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तोंडोळी गावातील एका शेत वस्तीवर सात दरोडेखोरांनी हल्ला चढवत दोन महिलांवर सामूहिक अत्याचार केला होता. या घटनेनंतर महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जात होता. तर दोन दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा पदभार घेणाऱ्या चाकणकर आज पीडित कुटुंबाची भेट घेतली.
रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत, त्यांची विचारपूस करत दिलासा दिला. यावेळी स्थानिक पोलिसांकडून घटनेची माहिती घेत तपासाबाबत चौकशी करत सूचना दिली. तसेच पीडितांना आणखी काही दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची सूचना दिली.