मनेका गांधींना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून वगळले

Update: 2021-10-07 15:07 GMT

भाजपचे खासदार वरुण गांधी आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून वगळण्यात आले आहे. वरुण गांधी यांनी लखीमपूर प्रकरणी टीका केल्यानंतर त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीमधून वगळण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी गुरुवारी पक्षाच्या ८० सदस्यांच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ८० नेत्यांचा समावेश आहे.

लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या प्रकरणात भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी आपल्याच पक्षाच्य़ा सरकारवर टीका केली होती. वरुण गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांनाही लक्ष्य केले होते. त्यामुळेच वरुण गांधी यांचे नाव वगळण्य़ात आल्याची चर्चा आहे. भाजपच्या या नवीन कार्यकारिणीमध्ये ५० विशेष निमंत्रित सदस्य आहेत. तर १७९ स्थायी सदस्य आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळांचे सदस्य यांचा समावेश आहे. माजी मंत्र्यांनाही स्थान एकीकडे गांधी यांनी वगळण्यात आले आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेल्या प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद आणि हर्ष वर्धन यांनाही कार्यकारिणीमध्ये जागा देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची नावे कायम राहिली आहेत.

Tags:    

Similar News