एकनाथ खडसेंनंतर आता पंकजा मुंडे यांचं 'लो चली मैं'?

Update: 2020-10-28 15:35 GMT

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता भाजपाला आउटगोइंग सुरु होणार व देवेंद्र फडणवीस एकटे पडतील अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यातच भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या ट्वीट मुळे नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

काय आहे हे ट्वीट पाहूया...


"@PawarSpeaks hats off ... कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले... पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे." या ट्वीटमुळे आता एकनाथ खडसेंनंतर पंकजा मुंडे या भाजपला 'लो चली मैं' करणार का? असा प्रश्न समोर आला आहे.

पंकजा मुंडे यांची मंगळवारी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसदर्भात शरद पवार, धनंजय मुंडे नेत्यांसोबत चर्चा झाली. या बैठकीत एकमेंकाचे राजकीय विरोधक समजले जाणारे सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे बाजुबाजूला बसले होते. यावेळी दोघे हास्यविनोदात रंगलेले पाहायला मिळाले. गेल्या वर्षी निवडणुकीअगोदर बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात एकत्र आलेले हे बहिण भाऊ तब्बल एक वर्षानंतर एकत्र पाहायला मिळाले.


तसचं भगवान गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा देताना "माझा अभिमन्यु झालाय. येत्या काळात केवळ भगवानगडच नाही तर मुंबईतील शिवाजी पार्क भरून दाखवायचं आहे. तिथे शक्तिप्रदर्शन करायचं आहे." असं म्हटलं होतं.

या दोन घटनांमुळे खडसेंनंतर भाजपवर नाराज पंकजा मुंडे पक्षांतर करणार का? पक्ष प्रवेश केला तर कोणत्या पक्षात करतील? असे आले.

या संदर्भात आम्ही साम टिव्हीचे संपादक निलेश खरे यांची प्रतिक्रीया घेतली असता "पंजका मुंडे यांचा हा पक्षांतर्गत राजकारणासाठी दबाव तंत्राचा वापर आहे." तर धनंजय मुंडे व पंकजा एकत्र यांच्या भेटीबद्दल ते म्हणाले की, "मुळात राजकारणात कुणी कुणाचा वैरी नसतो. त्यात धनंजय आणि पंकजा तर रक्ताचं नातं असलेले राजकारणी आहेत. ते जास्त काळ दुर राहू शकत नाहीत. सोबतच स्थानिक राजकारणावर आपली पकड मजबूत करण्यासाठी हे दोघेही एकत्र आलेले पाहायला मिळू शकतात." असं निलेश खरे यांनी सांगीतलं.


या प्रश्नावर आम्ही जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेशक संजय आवटे यांची प्रतिक्रीया घेतली असता "एकनाथ खडसे आधीच म्हणाले होते आता हा संसर्ग अटळ आहे. त्यामुळे खडसेंनंतर कोण? तर अर्थातच पंकजा मुंडे.. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ज्या लोकांना संपवण्याचा प्रयत्न केला त्यात खडसें सोबत पंकजा मुंडे या सुध्दा होत्या. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली पण त्या कशी पराभुत होतील यासाठी सुध्दा फडणवीस यांनीच प्रयत्न केला. हे लपून राहिलेलं नाही.."

"या आधी गोपीनाथ गडावर झालेल्या सभेत खडसेच म्हणाले होते "हम तो डूबेंगे सनम मगर, तुम्हे लेके" हे ज्या कार्यक्रमात खडसे म्हणाले त्याच्या आयोजकच मुळात पंकजा होत्या. त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीवर घेतलेलं आहे. पण तरिही त्यांचं करियर पुढे काय? हा प्रश्न राहतोच. आता पंकजा मुंडे यांनी पक्षांतर करताना प्रितम मुंडे या भाजपकडून खासदार आहेत याची चिंता करणार नाहीत. कारण खडसे राष्ट्रवादीत गेले तरी खासदार रक्षा खडसे भाजपातच आहेत." असंही संजय आवटे यांनी सांगीतलं.


यासर्वांवरुन पंकजा मुंडे या पक्ष नेतृत्वाला शह देण्याच्या तयारीत आहेत हे उघड आहे. आणि ही बंडखोरी भाजपात राहून शक्य नाही हे सुध्दा पंकजा जाणून आहेत. त्यामुळे सध्या पंकजा मुंडे यांच्यापुढे शिवसेना की राष्ट्रवादी? असे दोन पर्याय आहेत.

पंकजा मुंडे यांनी पक्षांतर केलं तर कोणत्या पक्षात करतील? असा प्रश्न आम्ही संजय आवटे यांना विचारला असता ते म्हणाले, "पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत घेण्याचा निर्णय शरद पवार घेतील असं वाटत नाही. कारण धनंजय मुंडे तिथे आहेतच. त्यामुळे धनंजय मुंडे असताना पंकजांना पक्षात घेण्याचा निर्णय पवार घेणार नाहीत. आता पंकजा जर शिवसेनेत प्रवेश करणार असतील तर किमान पवारांनी त्याला विरोध करु नये." अशी प्रतिक्रीया संजय आवटे यांनी दिली.


मुंडे आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध...

मुंडे आणि ठाकरे कुटुंबाचे जुने संबंध आहेत. पंकजा मुंडे या आपल्या प्रत्येक भाषणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा भाऊ म्हणून उल्लेख करतात. कारण जेव्हा गोपीनाथ मुंडे भाजपवर नाराज होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना " पक्ष सोडण्यासारखा काही निर्णय घेऊ नका" असं म्हणून थांबवलं होतं. त्यामुळे मुंडेंच्या मतदार संघात शिवसेना विरोधी उमेदवार देत नाही. या घरगुती संबंधांमुळे पंकजा मुंडे यांना शिवसेना अधीक जवळची आहे. असं मतही विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

त्यामुळे स्वत:चा अभिमंन्यु झाल्याचे, भविष्यात शिवाजी पार्कवर शक्तीप्रदर्शन करयचंय असं कार्यकर्त्यांना सांगणाऱ्या पंकजा मुंडे यांनी पवारांची स्तुती केल्याने. एडसेंनंतर पंकजा नक्की कोणत्या पक्षात लो चली मै करणार हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags:    

Similar News