toolkit case : "...त्यामुळे दिशाला कोर्टात स्वत:च आपली बाजू मांडावी लागली"

दिशा रवी यांच्या वकिलांचा पोलीसांवरआरोप

Update: 2021-02-15 06:30 GMT

दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ग्रेटा थनबर्गने जे टूलकिट (toolkit) सोशल मीडियावर व्हायरल केले होते, त्या टूलकिट प्रकरणी २२ वर्षांची पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी (Disha ravi) हिला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिशाला बंगळुरुमधून शनिवारी अटक करण्यात आली. पण तिच्य़ा अटकेच्या प्रक्रियेमध्ये नियमांचे पालन झाले नाही असा आरोप दिशाच्या वकिलांनी केला आहे. रेबेका जॉन या तिच्या वकिलांनी गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाचे न्यायमूर्ती दिशाला कोर्टात कायदेशीर प्रतिनिधित्व उपलब्ध करुन देण्यात अपयशी ठरले असा आरोप रेबेका यांनी केला आहे.

दिशावर देशद्रोह आणि कट रचल्याचा आऱोप ठेवण्यात आला आहे. तिला अटक केल्यानंतर दिल्लीतील कोर्टात रविवारी हजर करण्यात आले. त्यानंतर तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पण यावेळी तिच्यासोबत तिचे वकील नव्हते, तसेच दिशाला कोणत्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे हे सुद्धा तिच्या वकिलांना माहित नव्हते, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे दिशाला कोर्टात स्वत:च आपली बाजू मांडावी लागली. एवढेच नाही दिशाला बंगळुरुहून दिल्लीला आणताना देखील नियमांचे पालन झाले नाही असा आरोप तिच्या वकिलांनी केला आहे.

दरम्यान दिशाच्या अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी आणखी दोन कार्यकर्त्यांना अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. निकीता जेकब आणि शांतनू अशी या दोघांची नावे आहेत. टूलकिट प्रकरणात या दोघांचाही संबंध असल्याचा सायबर विभागाच्या विशेष टीमला आढळून आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

Tags:    

Similar News