''चित्रा नाही तर त्या विचित्रा ताई, आरडाओरडा करायला कुठेही पोहोचतात" मंत्री ठाकूर यांनी घेतला समाचार..

''स्वत:च दिवे बंद करायचे, स्वत:च दगड फेकायचे, अशा या विचित्रा वाघ आरडाओरडा करायला कुठेही पोहोचतात. ज्यांनी आरडाओरडा करावा त्यांनी आधी स्वतःच्या घरात बघावं'' असा टोला मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी चित्रा वाघ यांना लगावला…

Update: 2022-04-07 10:41 GMT

मागच्या ७० वर्षात जे जे उभारलं, घडवलं, ते ते विकायचं काम मागच्या ७ वर्षात केलं गेलं, त्यामुळे हे कुणी केलं हे आपण विसरता कामा नये. असा गंभीर आरोप करीत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी नाव न घेता थेट मोदींवर प्रहार केला आहे. महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार जाधव जयश्री चंद्रकांत (आणा) यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्या कोल्हापूरातील महिला मेळावा आज पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, अनेक कंपन्या विकूनही वर तोंड करून हे लोक विचारतात की गेल्या ७० काँग्रेसने वर्षात काय केले? मग एवढं खोटं नाटं पसरवलं जात असेल तर माझ्या आई बहिणींनीसह प्रत्येक महिलेने आई भवानीचं रूप धारण करून याविरोधात लढलं पाहिजे, असे आवाहन ही त्यांनी कोल्हापूरकरांना केले.

''विचित्र ताई आरडाओरडा करायला कुठेही पोहचतात''

चित्रा नाही तर यांना विचित्रा ताई म्हंटल पाहिजे. स्वत:च दिवे बंद करायचे, स्वत:च दगड फेकायचे, अशा या विचित्रा वाघ आरडाओरडा करायला कुठेही पोहोचतात. ज्यांनी आरडाओरडा करावा त्यांनी आधी स्वतःच्या घरात बघावं असा आरोपही मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी केला. स्वत: अग्निदिव्याचा सामना करणाऱ्या चित्रांची ताईंच्या तोंडी आग टाकून जीभ जाळण्याचे काम भाजप करते आहे. चित्राताई भाजपात का गेल्यात हे आपल्याला कितीही माहिती असले तरीही आपल्यापेक्षा हे चित्रा ताईंनाच जास्त माहिती आहे. भाजपाकडून वापर चित्रा वाघ यांचा पद्धतशीरपणे वापर सुरू आहे. पुढच्या काळात त्यांना त्यांची अनुभूती येईल. ज्या संस्कृतीमध्ये महिलांचा मान सन्मान होत नाही, तर त्या संस्कृतीमध्ये मूळ भाजपाच्या महिलाना बाजूला सारून चित्रा ताईंमाध्यमातून आगी लावण्याचा कुटिल डाव भाजप करीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिला कुठे दिसतात का? असा प्रश्नही मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला.

''काश्मीर फाइल्सबद्दलचं सत्य आपण तपासून घ्यायला हवं''

२५ हजार तिकीटं भाजपने वाटून हा चित्रपट पाहायला लोकांना भाग पाडले. मात्र काश्मीर फाइल्सबद्दलचं सत्य आपण तपासून घ्यायला हवं. त्यावेळी कुणाचं राज्य होतं, कोण पंतप्रधान होते, कुणी संसदेला घेराव घातला होता आणि कुणाच्या सांगण्यावरून दहशतवादी संसदेत घुसले होते हे आपण जाणून घेतलं पाहिजे.

''स्त्री आणि स्त्रीत्वाचा अपमान कधी सहन करणार नाही''

स्त्री आणि स्त्रीत्वाचा अपमान कधीही सहन करणार नाही आणि ते कुणी करीत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असे मंत्री ॲड. यशोमती ठाकूर स्पष्ट केले. आपल्या सांस्कृतिक राजधानीला डाग लावण्याच काम विरोधक करत आहेत. इथले खासदार आमच्या महिला उमेदवार यांना बिचारी म्हणतात, अशांना माहिती नाही की आपल्या देशाच्या पंतप्रधान पदी, राष्ट्रपती पदी महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. असे सांगत खासदार धनंजय महाडीक यांना टोला लगावला आहे.

Tags:    

Similar News