माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर ऍक्शन मोडमध्ये
धान्यवाटपासह मदतीचा हात आणि घरोघरी साधला आपुलकीचा संवाद दोन दिवसात अमरावतीच्या १७ गावांचा नॉनस्टॉप पाहणी दौरा;
एकीकडे सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचे स्वागत सोहळे रंगत असताना दुसरीकडे मात्र माजी मंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांचा पूरपरिस्थितीची पाहणी दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. आपल्या जिवाभावाची माणसे संकटात असताना त्यांना धीर देणे, आधार देणे हे आपले प्रथम कर्तव्य समजून माजी महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या गावागावात घरोघरी पाहणी दौरा सुरु केला आहे. दोन दिवसात तब्बल अमरावतीच्या १७ गावांचा नॉनस्टॉप पाहणी दौरा केला आहे. यामध्ये अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करीत जनतेला धीर देतानाच गरजूंना धान्यवाटपासह मदतीचा हात दिल्याने आपला लोकप्रतिनिधी संकटकाळात सोबत असल्याची भावना स्थानिक जनतेने व्यक्त केली आहे.
अमरावतीमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ॲड. यशोमती ठाकूर यांनी तातडीने तालुक्यातील तिवसा, मोझरी, वरखेड, तारखेड व सातरगांव आदी गावांना भेट घेत झालेल्या नुकसानाची पाहणी केली. तर आज पुसदा, रोहनखेड, ब्राम्हणवाडा भगत, देवरा, पातूर, कटसुर, विचोरी अशा तब्बल १२ गावांना ठाकूर यांनी भेट देत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी मोठ्याप्रमाणात रस्ते वाहून गेल्याचे, नाले खचल्याचे चित्र आहे, त्यामुळे वाहतुकीला आणि मदत कार्यातही अडथळा येत आहे. मात्र नुकसानी संदर्भात पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली आहे. या नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असून आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी असल्याचे ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
आकांक्षा ठाकूर यांच्याकडून गरजूंना धान्य वाटप
जिल्ह्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासोबत त्यांच्या कन्या आकांक्षा यांनी देखील जनतेला धीर देण्यासाठी जनतेच्या भेटी घेत संवाद सुरू ठेवला आहे. नेरपिगळाई गावातील अनेक घरात पुराचे पाणी घरात शिरून अन्नधान्याचे नुकसान झाले. त्यामुळे आकांक्षा यांनी गावातील गरजूंना धान्य वाटप केले.