कापूस आणि सोयाबीनची भाव वाढ व्हावी, उत्पादन शुल्कावर आधारीत शेतकऱ्यांना भाव मिळावा. त्याचप्रमाणे यलो मोजाक मूळे जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई मिळावी, पिकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना वेळेवर मिळावा, ग्राहक हेच फक्त भारताचे नागरीक नाहीत तर शेत पिकवणारा, एका दाण्याचे हजरो दाणे करणारा शेतकरी सुध्दा या भारताचा नागरीक आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे संवेदनशिलतेने पाहणे हे या सरकारचे कर्तव्य आहे, या मुद्द्यांना घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकऱ्यांसाठी सातत्याने रस्त्यावर आंदोलन करत या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशी माहिती रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड.शर्वरी तुपकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
19 जानेवारी 2024 रोजी मल्कापूर येथे रेल रोको आंदोलनाचा त्यांनी इशारा दिला होता. पण त्यापूर्वीच म्हणजेच 18 जानेवारीला बुलढाणा शहर पोलीसांनी त्यांना अटक केली त्यानंतर मेडीकलला घेऊन जातोय असा बहाणा देत त्यांना बुलढाण्यातून मेहकर पोलीस स्टेशनला नेण्यात आलं, मेहकरला का नेण्यात येतंय, कुणाच्या सांगण्यावरुन नेण्यात येतंय, याचा काहीही खुलासा पोलीस प्रशासनाने केला नाही. सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर पोलीस प्रशासन नाचतंय की काय असा सवाल ॲड. शर्वरी तुपकर यांनी उपस्थित केला.