काल सकाळी कोणाशी तरी बोलतांना मी अगदी सहजच म्हणाली की “नाही, एखाद्या गोष्टीत आलेल्या अपयशामुळे आपण खचून न जाता, परत जोमाने कामाला लागलं पाहिजे”. किती छान विचार, व्वा. पण नंतर मात्र मला प्रश्न पडला की हा विचार छान असला तरी काहीसा पोकळं तर नाही? कारण हे बोलणं, आणि इतरांना तस सांगणं, खुप सोप असलं तरी तसं करणं मात्र तितकसं सोप नाही. आणि सगळ्यांना नाही जमत हे, सहजतेने आणि लवकर तर नक्कीच नाही. मीही काही त्याला अपवाद नाही.
पण याला खरोखरच कोणी अपवाद असेल का? ज्याला कधीच कोणत्याही गोष्टीत अपयश आल नाही, ज्याने कधीच कोणतीही चूक केली नाही, असं कोणी असेल का? मला वाटत की हा काहीसा समर्थांच्या “जगी सर्व सुखी असा कोण आहे?“ सारखाच प्रश्न आहे. आणि बहुतेक तरी या प्रश्नाचेही उत्तर नाही असचं आहे. पण आलेलं अपयश, केलेल्या व झालेल्या चुका शक्य तो कोणीही तितक्या मोकळेपणाने व प्रामाणिकपणाने कबूल करत नाही, अगदी स्वत:शीही कबूल करत नाही, हेही तितकंच खरं आहे. मात्र या सोबतच असं न करणारे, आलेल्या अपयशानंतर खचून न जाता, केलेल्या चुकांमधून शिकून त्याच चुका परत न करता, जोमाने कामाला लागून यशस्वी झालेली माणसं, अपवाद म्हणूनच का असेना पण, आपल्या आजूबाजूला आहेतच.
मग का जमत नसेल हे सगळ्यांना? का जमत नाही हे मला? का जमतंच हे सगळ्यांना आणि मलाही? बहुतेक तरी जमतंच. कारण मी लहान असताना चालायला शिकली ते बऱ्याचदा पडल्यानंतरच, मी बनवलेल्या पोळीचा आकार छान गोल झाला व सगळा स्वयंपाक उत्तम बनला तो देखील बराच प्रयत्न केल्यानंतरच. अर्थात यालाही काही जण अपवाद असतीलच, पण तरीही हे जवळपास सगळ्यांनाच आणि सगळ्याच गोष्टींना लागू पडत हेही तितकंच खरं आहे. फक्त आपण, किंवा आपल्यापैकी काही जण तरी, हे हळूहळू विसरून जातो. आणि मी देखील हे इतर कोणाला सांगत होती तरीही स्वत: मात्र काही प्रमाणात विसरून गेली होती. त्यामुळे आता मला तरी पटलं आहे की “एखाद्या गोष्टीत आलेल्या अपयशामुळे आपण खचून न जाता, आपण परत जोमाने कामाला लागलं पाहिजे” हा विचार पोकळं नाही, आणि असं करणं सोप नसलं तरीही आवश्यक मात्र आहे. आणि मी तरी तसा प्रयत्न करते आहे, करणार आहे.
-आरती आमटे