फ्लोटिंग पणत्या, एलईडी दिवे आणि रंगीबेरंगी पणत्यांना ग्राहकांची खास पसंती
दिवाळी म्हणजे आनंद, आशा, आणि उजेडाचा उत्सव. रंगीबेरंगी आणि चमकदार दिवे या उत्सवाच्या वातावरणात अधिक उत्साह वाढवतात. या दिव्यांमुळे सणाची विशेषता अधिक वाढते. या सणांच्या काळात प्रत्येकजण आपल्या घरांना सजवण्यासाठी विविध प्रकारच्या सजावटींच्या गोष्टींचा वापर करतो. यामध्ये फ्लोटिंग पणत्या, एलईडी दिवे आणि रंगीबेरंगी पणत्यांना विशेष पसंती आहे. या सर्व प्रकारच्या दिव्यांच्या वापरामुळे दिवाळीच्या सणाचा आनंद वाढतो. बाजारात सध्या विविध फ्लोटिंग पणत्या, एलईडी दिवे, रंगीबेरंगी पणत्या, काचेचे दिवे, मातीचे दिवे हे दाखल झाले आहेत. फ्लोटिंग पणत्या पाण्यात ठेवताना एक अद्वितीय आकर्षण निर्माण करतात. विविध रंगांच्या आणि आकाराच्या पणत्या बाजारात दाखल झाल्या असून ग्राहकांसाठी ते आकर्षण बनले आहेत. आधुनिक काळात ऊर्जा बचतीचा विचार करणे आवश्यक आहे. एलईडी दिवे पारंपरिक पणत्यांच्या तुलनेत कमी ऊर्जा वापरतात आणि दीर्घकाळ टिकतात. यामुळे घर सजवताना खर्च कमी करण्यास मदत होते. त्यामुळे ग्राहक अधिकाधिक एलईडी दिव्यांना प्राधान्य देत आहेत.
मुंबईतील सध्या विविध ठिकाणांच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात पणत्या विक्रीसाठी आल्या आहेत. लाल मातीच्या पणत्या वीस रुपये प्रति नग, तर सजावट केलेल्या पणत्यांची किंमत प्रति नग दोनशे रुपये पर्यंत आहे. रंग आणि स्पार्कल यांनी सजविलेल्या पणत्यांची किंमत आकार व सजावटीनुसार वाढत आहे. फ्लोटिंग पणत्यांनाही यंदा चांगली मागणी आहे. या पणत्या दीडशे रुपये जोडी पासून उपलब्ध आहेत. याबरोबर कमी तेल लागणाऱ्या पणत्या देखील खरेदी करण्याकडे महिलांचा अधिक कल आहे.