दिवाळी आठवडाभरावर आली असली तरीही थंडीची चाहूल नाही. दिवसभर कडक ऊन पडत असून, त्यामुळे घामाच्या धारा लागलेल्या आहेत. तर सायंकाळनंतर ढग दाटून येत असतात आणि पावसाळ्याच्या सरी पडत आहेत. तरीही रात्री उकाडा जाणवत आहे. या विचित्र हवामानाचा परिणाम आरोग्यावरही दिसू लागला आहे. रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. सोमवारी काहीसा गारवा जाणवत होता. मात्र, मंगळवारी दिवसभर उखाड्याने हैराण केले होते. आठवडाभरापासून ऑक्टोबर हिटचे चटके नागरिक सहन करीत आहेत.
दरवर्षी ऑक्टोबर मध्ये थंडीची चाहूल लागते. परंतु यावेळेस मात्र अद्यापही थंडी जाणवत नसून वातावरणातील बदलामुळे लोकांना थंडीची प्रतीक्षा आहे. दिवाळीनंतरच थंडी वाढेल असा अंदाज आहे. या बदलत्या हवामानामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण यामुळे त्रस्त आहेत. चक्कर येणे, अतिसार, डोकेदुखीच्या समस्या वाढल्या आहेत. साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे.