सणासुदीत फुलांच्या किंमतीत वाढ, आनंदाचे रंग महाग झाले!

Update: 2024-11-01 06:34 GMT

सणासुदीच्या काळात झेंडूसह इतर विविध प्रकारच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने लक्ष्मी पूजनासाठी आणि सजावटीसाठी फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.

दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी झेंडू फुलांची मागणी खूप वाढत असते. यंदा बाजारात झेंडू फुलांची आवक १०० ते १२० टन झाली आहे, आणि घाऊक बाजारात त्याची किंमत १०० ते १५० रुपये प्रति किलो आहे. दिवाळीच्या सणासाठी हे फुल विशेषतः लोकप्रिय असतात. दिवाळीनिमित्त बाजारात विविध प्रकारची फुले विक्रीसाठी दाखल झाली आहेत. दिवाळीत झेंडूच्या फुलांना जास्त मागणी असते. यावर्षी ऐन दिवाळीत झेंडूची फुले महागली आहेत. परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली होती. त्याची झळ झेंडू फुलांच्या शेतीला बसल्याने नियमित उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाल्याची परिणती दर गगनाला भिडल्याचे चित्र आहे. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला बाजार पिवळ्या व भगव्या रंगाच्या झेंडू फुलांनी बहरला. शहरातील विविध भागात ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी फुलांची दुकाने लावली आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेबरोबर हार बनविण्यासाठी या फुलांना विशेष मागणी असते. घर, दुकान सजावटीत त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दीपावलीत मात्र ही फुले महागली आहेत. दसरा सणावेळी २०० ते २५० रुपये जाळी या दराने ही फुले मिळत होती. गुरुवारी सकाळी त्यांचे भाव दुपटीने वाढून ५०० ते ६०० रुपयांपर्यंत गेले होते. परंतु, दुपारनंतर आवक वाढल्याने भावात काही प्रमाणात घसरण झाली. मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी आहे. सध्या शेवंती २५० ते ३०० रुपये किलो, गुलाबांचा १० फुलांचा गुच्छ ८० ते १२० रुपये, पाण्यातील कमळ प्रत्येकी २० ते ५० रुपयापर्यंत मिळत आहे. झेंडू फुलांच्या दरवाढीमुळे या फुलांचे तयार हारही महागले आहेत.

Tags:    

Similar News