सध्या सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी दहा ग्रॅम सोन्याचा दर ७७,६०० रुपयांवर पोहोचलाय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत वाढ होताना दिसते. सोन्याच्या दरात तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.
भू-राजकीय तणाव :
पश्चिम आशिया सध्या अशांत आहे. इस्रायल-इराणमध्ये कधीही युद्धाचा भडका उडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर गाझा पट्टीत इस्रायलने मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात हमासचे प्रमुख याह्या सिनवार ठार झाले आहेत. तसेच लेबनॉनसोबतही इस्रायलचा संघर्ष सुरू आहे. हमासने इस्रायलवर गेल्या वर्षी सात ऑक्टोबररोजी हल्ला केला होता. या हल्ल्याचे मास्टरमाईंड याह्या सिनवार होते. आता सिनवार यांच्या मृत्यूनंतर गाझा पट्टीत युद्धविरामाची शक्यता होती. मात्र ती तूर्तास दिसत नाही. दुसरीकडे, रशिया-युक्रेनमधील युद्ध आता जवळपास तीन वर्षांपासून सुरू आहे. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्येही तणाव वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात युद्ध आणि अस्थिरता असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. जागतिक अस्थिर परिस्थितीत सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे आणि त्यामुळे दरही वाढत आहेत.
जागतिक आर्थिक परिस्थिती :
युरोपातील अनेक देशांमध्ये सध्या मंदीसदृश परिस्थिती आहे. ब्रिटन आणि जर्मनी या देशांमध्ये मंदीसदृश परिस्थिती असल्याने अपेक्षेप्रमाणे युरोपियन सेंट्रल बँकेने तिसऱ्यांदा व्याजदरात कपात केली आहे. युरोपियन सेंट्रल बँकेने २५ आधार बिंदूंनी व्याजदरात कपात केली आहे. १३ वर्षांत पहिल्यांदाच एकामागोमाग युरोपियन सेंट्रल बँक व्याजदरात कपात करत आहे. अमेरिकेतील फेड बँकेनेही पुन्हा एकदा व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. व्याजदर कमी होत असताना सोन्याचे दर वाढतात, तर व्याजदर वाढल्यानंतर सोन्याचे दर कमी होतात. आर्थिक आणि जागतिक अस्थिरता असल्यास सोन्याचे दर वाढण्याची शक्यता अधिक असते.
सेंट्रल बँकांकडून सोनं खरेदी :
जागतिक अस्थिरतेमुळे जगातील सर्वच सेंट्रल बँका सोन्याची खरेदी करत आहेत. आरबीआयनेही तब्बल ३७ टन सोन्याची खरेदी केली आहे. आरबीआयकडे ८४०.७६ मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे. सेंट्रल बँकांनी सोनं खरेदी वाढवल्यामुळे सोन्याच्या दरात तेजी आली आहे.
सीमाशुल्कात कपात :
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोनं आणि चांदीच्या सीमाशुल्कात सहा टक्के कपात केली आहे. सीमा शुल्क कमी केल्याने सोन्याची मागणी वाढली आहे. तसेच सध्या दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराई सुरू होणार असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यानंतर दरात वाढ होते, या नियमानुसार सोन्याचे दर वाढत आहेत. जागतिक अशांतता, व्याजदरात कपात आणि वाढत्या महागाईच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडतात. सोन्यातील गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळतोय. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोनं खरेदीच्या मुहूर्ताची वाट न पाहता, सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यास सोनं खरेदीची सुवर्णसंधी साधावी. नवीन वर्षात, २०२५ मध्ये प्रति १० ग्रॅम ३,००० डॉलरवर सोन्याचा दर पोहोचू शकतो. म्हणजे भारतीय बाजारात एक तोळे सोन्याची किंमत ८३ ते ८५ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
एकूणच, दीर्घकालावधीच्या गुंतवणुकीसाठीही सोन्याची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करावी, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.