मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक यांच्याबद्दल वाईट बातमी समोर येत आहे. हेलेना ल्यूक यांचे निधन झाले आहे. रविवार, ३ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक यांचे अमेरिकेत निधन झाले. मिथुन आणि हेलेना ल्यूक यांचे लग्न केवळ चार महिनेच टिकू शकले. अमिताभ बच्चन यांच्या 'मर्द' या चित्रपटात हेलेनाने खास भूमिका साकारली होती. बराच काळ अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या हेलेना यांनी अमेरिकेतचं काम केले. काल रात्री त्यांच्या एका पोस्टमध्ये त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, त्यांची तब्येत बरी नाही आहे. पण वैद्यकीय मदत न घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती समोर येत आहे.
मिथुन चक्रवर्ती पहिल्याच नजरेत हेलेना ल्यूक यांच्या प्रेमात पडले
मिथुन आणि हेलेना ल्यूकच्या लव्ह लाईफ आणि लग्नाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री सारिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मिथुनची मॉडेल आणि अभिनेत्री हेलेना ल्यूक यांच्यासोबत भेट झाली. असे म्हटले जाते की दोघेही पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले, त्यानंतर त्यांनी लग्न केले. १९७९ मध्ये त्यांचे लग्न झाले. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. एका जुन्या मुलाखतीत हेलेना म्हणाली होती की, मिथुनसोबत लग्न करणे ही तिची चूक होती. हे लग्न एक वाईट स्वप्न होतं असे हेलेना ल्यूक म्हणाल्या होत्या. त्यावेळी अभिनेत्रीने खंत व्यक्त करत म्हंटले होते की मी विचार करते की असे कधीच घडले नसते.