गोव्यामधल्या सुखी आयुष्याची गुरुकिल्ली ...

Update: 2019-12-24 04:48 GMT

एखाद्या छोट्याशा खेडेगावात ही माणसं तुमची सपोर्ट सिस्टिम असतात . यातला सगळ्यात महत्वाचा असतो सकाळी सकाळी सात वाजता पोंपों करत सायकलवरून येणारा पोदेर म्हणजे पाववाला . त्याच्या टोपलीतले गरमगरम लुसलुशीत पाव आणि उंडे चहाबरोबर फस्त करणं ही आम्हा गोवेकरांसाठी पर्वणीच . पर्वा त्याने मला मस्कापाव नावाचा एक मस्त प्रकारही खिलवला .या सगळ्या पावप्रकाराची खासियत म्हणजे हे बेकरीत लाकडावर जळणाऱ्या भट्टीत भाजलेले असतात ,म्हणून त्यांना एक वेगळीच खुमासदार चव असते. या चविष्ट पावप्रकारांचं उत्पादन एकाद दुसऱ्या गावापुरतच मर्यादित असतं म्हणून लाकूड जाळल्याबद्दल फार अपराधी वाटण्याची पाळी येत नाही .

पोदेराइतकाच महत्वाचा असतो रेंदेर .म्हणजे नारळाच्या झाडावर चढून माडी काढणारा. माझ्या लहानपणी हे रेंदेर ठरलेले असायचे , ते ठरल्या वेळी भाटातल्या माडावर झापझाप चढून तिथे मडकी लावायचे ,उतरवायचे तेव्ह मस्त कोकणी गाणी म्हणायचे .कोकणी संस्कृतीने त्यांची अशी हवेत सूर झुलवणारी अनेक रोमॅंटिक गाणी मनाशी जपून ठेवली आहेत .आता माझ्याकडे येतो तो त्या अर्थी रेंदेर नाही तो नारळ पाडपी आहे . या बिहारी मुलाचं नाव आहे शिवा,तो मशीन लावून माडावर चढतो आणि फटाफट नारळ काढून देतो. तो असा फटाफट माडावर चढायला लागला की ते जगातलं सातवं आश्चर्य बघायला अर्ध गाव जमा होतं .हे कितें करता ? कसो चढता पळे ? इथपासून कितले पैशे दिले गो ह्येका ,यशोधरा ? अशा चौकशाही करून होतात .सगळ्यांचा डोळा किती 'नाल्ल' पडले त्यावर असतो ,कारण ते सर्वांनाच हवे असतात ,मग ती चाचपणी सुरु होते . हे सगळे तू खाणार? एकलीच ?की विकणार ? किती गो ? मी आपली आमच्या एकुलत्या एका माडाकडे बघून दीर्घ श्वास घेते.

तो येऊन गेला की येतो नुस्तेकार हा बहुतेक सायकल-स्कुटर वरून येतो .ताजे फडफडीत मासे घरपोच आणून देणाऱ्या या नुस्तेकारावर प्रत्येक घरची सुखशांती अवलंबून असते . पण हा येतो फक्त मंगल -बुध -शनी -रविवारीच .बाकी दिवस याची पोंपों अजिबात ऐकू येत नाही . मग सोम -गुरु येते भाजीवाली मावशी .पण माझ्याकडे तिचं काहीच विकलं जात नाही हे बहुधा कळून चुकल्यामुळं ती मला सरळ टांग मारून पुढच्या घरी जाते .

एवढ्यावरच आमच्या होम डिलिव्हरीची यादी संपते .बाकी काही म्हणजे काही घरपोच येत नाही. अगदी दुध ,वर्तमानपत्र ,फळं आणि भाज्या ,चहा -कॉफी -डाळ -तांदूळ असा किराणा आणायला स्वतःच पायपीट करावी लागते , सामिष पदार्थ आणण्यासाठी तर फोंडा गाठण्याशिवाय पर्याय नाही .आणि गोयंकार खरंच सुखी आणि सुशेगाद म्हणून सगळं अगदी मस्त आरामशीर चालतं .

या देवळाबाहेर फुल विकणाऱ्या मावश्या आता इतक्या वर्षांच्या ओळखीच्या ,बहुतेकांना मी आणि त्या मला नावानं ओळखतात .मी आले की ;केन्ना आयले ,बाय ? कशी असा गो ? बुर्गीबाळा ?

अशी सगळी चौकशी होते. त्यांना सगळ्या खबरी दिल्याशिवाय माझी सुटका नसते .आज मी देवीची ओटी घ्यायला सुकांतीच्या टपरीवर गेले तर माझी घे ,माझी घे म्हणून बाकी सगळ्या - माया ,शोभावंती ,म्हाताऱ्यानी मला इमोशनल ब्लॅकमेल करून व्यवस्थित कापलं आणि मी कापून घेतलं . आज शुक्रवार म्हणून चणेवाल्या ताईनं 'घे ग देवीला ,शास्त्र असतं ते ' असं म्हणून चणेही घ्यायला लावले . एरवी घेतले नाही तरी येता जाता ती माझ्या हातात 'असेच खा ग्ग ताई ' म्हणून चणे द्यायची राहत नाही .

सुशांतच हॉटेल इथं त्याचा आणि माझाही जन्म होण्याआधीपासून आहे .इथं येणाऱ्या सगळ्या भक्तांना चहा ,गरमगरम वडे ,समोसे ,भजी खायला घालून तृप्त करणारी ही एकमेव जागा . याच्याकडे सगळी सॉफ्ट ड्रिंक्स मिळतात आणि फ्रीझर असल्यामुळं चक्क क्वालिटी वोल्सही मिळतं .दुपारी उन्ह तापली ,खास करून एप्रिल -मे मध्ये उकाडा असह्य झाला की कौलारू घरात तापलेला गोवेकर गोटीवाली सोडा -बाटली मागवणारच ,मी त्याला अपवाद कशी असणार ? तेव्हा कोल्डड्रिंक्स आणि चॉकोबारसाठी सुशांतच्या दुकानाशिवाय पर्याय नाही .

माझ्या घराच्या अगदी मागे प्रीतीचं झेरॉक्सच दुकान आहे . प्रीती शिकलेली आहे ,किती म्हणून विचारलंत ? ती पदवीधर आहे .तिचे 'मिष्टर ' पीडब्लूडीत नोकरी करतात आणि प्रीती स्वतःचा व्यवसाय करते . झेरॉक्स,लॅमिनेशन असं सगळं काम ती स्वतः उभी राहून करते ,शिवाय सगळ्या प्रकारची स्टेशनरी तिच्याकडे मिळते . त्यात तिने रेडिमेड कपडे आणि फिनाईल वगैरे घरसफाईच्या अनेक उत्पादनांचा बिझनेस सुरु केला आहे . त्याशिवाय ती शिकवण्या घेते आणि महिलांचा बचतगटही चालवते. गावपातळीवर महिला नेतृत्व कसं उदयाला येत याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि एवढं करून ती एकदम साधी आणि नम्र आहे . काल आम्ही आमच्या पाठच्या बागेतल्या एकमेव माडाचे नारळ पाडले तर ताईला सोलून कोण देणार ? म्हणून तिनं स्वतःहून त्यातले पाच नारळ उचलून , सोलून मला घरपोच आणून दिले .कोण करेल इतकं ? माझ्या अडीअडचणीला धावून येणारी ही नवी मैत्रीण मला इथे मिळाली आहे . विशेष म्हणजे ती व्हाट्सऍप आणि फेबुवर पण आहे .

तशाच प्रफुल आणि निधी या माझ्या मदतनीस आहेत . खूप प्रेमानं करतात सगळं .जेव्हा मी ,बहिणी इथं नसतो तेव्हा निधी घर सांभाळते ,स्वच्छ ठेवते .ती घरच ,नवरा -दोन शिकणाऱ्या मुलांचं सगळं करून एका शाळेत काम करते, तिला सुट्ट्या तशा कमी मिळतात ,त्यात ती माझी मदतनीस म्हणूनही येते . इथं कामाला माणसं मिळत नाहीत म्हणून परवा कंटाळून मीच हातात खराटा घेऊन बाग झाडायला सुरुवात केली तेव्हा ते दृश्य बघून निधीनं माझ्यापेक्षा जास्त उड्या मारल्या ,मग आम्ही दोघीनी मिळून बाग झाडली तेव्हा झालेल्या माझ्या अवताराकडे बघून तिलाच हसू आवरता येईना ,मग तिनं मला तिथून सरळ पिटाळून दिलं .

प्रीतीप्रमाणे माझ्या घराच्या मागे दुकान असलेला साईश हा पण माझ्या सपोर्ट सिस्टीमचा महत्वाचा घटक आहे .आमच्या गावात बँक अलीकडे सुरु झाली आणि एटीएमचा आसपासच्या परिसरात कुठंही पत्ता नाही म्हणून घरासाठी जे काही लागेल ते साईशच्या दुकानातून बिन्धास आणलं जातं . इथे माझं क्रेडिट खातं चालतं ते मुंबईला जायच्या दिवशी बंद केलं जातं.

राहता राहिला संदेश . तो म्हटलं तर रिक्षा -टॅक्सीवाला आहे पण या गावात तो एकमेवच आहे म्हणून कुठंही जायचं असला तर सगळी भिस्त त्याच्यावर असते . शिवाय तो इतका स्थानिक आहे की त्याला गूगल मॅप ,जीपीएसची काही गरज नाही ,किंबहुना त्याला ते ठाऊकही नसेल .तरी 'फोंडयाला उमाताई ' ,माशेलला ज्योती ',वास्कोला नाना 'म्हटलं कि त्याला ती व्यक्ती ,तिचा घर -ऑफिस पत्ता एवढंच नव्हे तर तिचं कुटुंब ,व्यवसाय , सगळं ए टू झेड माहिती असतं .त्यामुळे संदेश असला की मी बिन्धास असते .अशी ही सगळी माणसं .माझ्या इथल्या सुखी आयुष्याची गुरुकिल्ली . धिस हॅपन्स ओन्ली इन गोवा !

Similar News