ॲड. यशोमती ठाकूर, आमदार
निर्भया प्रकरणानंतर देशभर संतापाची लाट उसळली. हे प्रकरण तत्कालीन काँग्रेस सरकारने अतिशय योग्य रित्या हाताळलं, त्यातील सगळी संवेदनशीलता जपली, तरीही लोकांचा राग उसळून आला. या प्रकरणानंतर देशभर निदर्शने झाली. कुठलंही राजकारण न करता तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह मिडियाला सामोरे गेले, झुकलेल्या नजरेने त्यांनी लोकांचा राग योग्य आहे असं वक्तव्य केलं. त्यात कुठेही आम्ही सरकार आहोत, तुम्हाला आम्हाला विचारायचा हक्क नाही असा अभिनिवेश नव्हता की सत्तेची गुर्मी नव्हती. देशात एक अत्यंत भितीदायक पद्धतीने एका बहिणीवर लैंगिक अत्याचार झाले होते, त्यातील उद्वेग युपीए सरकारने प्रगल्भता दाखवत मान्य केला. आज मणिपूर घटनेनंतर मनमोहन सिंह यांचा जुना व्हिडीयो व्हायरल झाला, आणि पुन्हा दोन सरकारांमधील तुलना होऊ लागली.
मणिपूर घटनेनंतर देशात संतापाचं वातावरण आहे. घटना घडल्यानंतर ७७ दिवसांनी लोकांमधील संताप पाहून आधी मिडीयातील काही अँकर्स, मग स्मृती इराणी यांनी मत व्यक्त केलं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ७७ दिवस मौन पाळून होते, त्यांना बोलता यावं म्हणून वातावरण निर्मिती करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी संसदेसमोर बोलण्याएवजी संसदेच्या बाहेर ३० सेकंदाच्या आसपास आपली भावना व्यक्त केली. त्यात ही थेट मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना राजधर्म शिकवण्याएवजी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांनी कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सांभाळावी असा सल्ला होता. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर देशभर निराशा पसरली. देशाचा पंतप्रधान किती निष्ठूर आहे याची चर्चा व्हायला सुरूवात झाली. या चर्चेवर लगाम लागावा म्हणून म्हणून टुलकिट पसरवण्यात आलं. मणिपूर उल्लेख असलेल्या पोस्ट सोशल मिडीयावरून आपोआप डिलिट होऊ लागल्या. दिल्लीतील माध्यमांनी देशातील महिला अत्याचाराचा तुलनात्मक अभ्यास सुरू केला. राजस्थान, पश्चिम बंगाल, छत्तीसगड मध्ये काय स्थिती आहे यावर चर्चा सुरू झाली.
महिला अत्याचाराच्या घटनांबाबत इतकी असंवेदनशीलता आजपर्यंत कुठल्याही पंतप्रधानांनी दाखवली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेच्या नऊ वर्षांनंतरही अजून विरोधी पक्षांनाच जबाबदार धरण्याचं तंत्र राबवलं आहे. या कटात देशातील मिडिया ही सामिल आहे. ७७ दिवस एखाद्या सीमावर्ती राज्यातील हिंसाचार भारतातील मिडिया दाबून ठेवते हे अनाकलनीय आहे. माध्यमांना सीमा नसतात, माध्यमांना पक्ष नसतो असं सांगितलं जातं, मात्र देशातील माध्यमं निष्पक्ष राहिलेली नाहीत. माध्यमांनी काँग्रेस किंवा INDIA ची बाजू घ्यावी असं आमचं म्हणणं नाही, मात्र माध्यमांनी जे सत्य आहे ते तरी दाखवलं पाहिजे. देशातील काही माध्यमांनी विषय भरकटवण्यासाठी आरोपी मुस्लीम असल्याची बातमी दिली आणि कुठलीही शहानिशा न करता ही बातमी व्हायरल करण्यात आली. त्यानंतर देशात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. हे सर्व पाहून मनाला वेदना होतात.
लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या हातात जी आयुधं आहेत त्याचा वापर करून आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फर्मेशन मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र सन्माननीय अध्यक्षांनी नियमांचा हवाला देत चर्चा नाकारली. या देशात महिलांच्या अस्मितेच्या मुद्द्यांची चर्चा करायला सगळे नियम आहेत, विरोधी पक्षांची सत्ता पाडायला, आमदार विकत घ्यायला, नियमबाह्य सरकार निवडायला, अध्यक्ष निवडायला, पक्ष फोडायला काही नियम नाहीत. नियम तोडून अर्थसंकल्प मांडता येतो, पुरवणी मागण्या मांडता येतात, सभागृह चालवता येतं पण आमच्या आया-बहिणीच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना आम्हाला बोलता येत नाही.
एक महिला म्हणून, एक आई म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी खूप व्यथित आहे. देशातील महिलांनी न्यायासाठी कुठे जायचं, या देशात एक खासदार महिला कुस्तीपटूंचं शोषण करतो आणि सरकार सर्व शक्तीनिशी त्याचं संरक्षण करते, हाथरस मध्ये पिडीत मुलीचा देह तिच्या परिवाराला दूर ठेवून जाळला जातो, विरोधी पक्षांच्या महिला नेत्यांना केस धरून फरफटत नेलं जातं, देशाच्या महिला व बालविकास मंत्री पिडीतांनात गुन्हेगार ठरवण्यासाठी पुढे सरसावत असतात... या देशाचं हे चित्र भयानक आहे.
काँग्रेस शासित राज्यांमध्ये महिला अत्याचाराच्या सर्व घटना नोंदवल्या जाव्यात असे आदेश आहेत. गुन्ह्यांची संख्या तेव्हाच जास्त दिसते जेव्हा प्रकरणं नोंदवली जातात, भाजपाशासित राज्ये महिला अत्याचाराची प्रकरणे नोंदवत नाहीत. पिडीतांना संरक्षण देत नाहीत. पक्ष बघून भूमिका ठरवली जाते. बिल्कीस बानो प्रकरणात आरोपींची मुक्तता करून त्यांचा सत्कार करणारा पक्ष हा या देशातील महिलांचा रक्षणकर्ता होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी कमालीचे असंवेदनशील आहेत. ते विभाजनकारी नेते आहेत. त्यांच्या राजवटीत देशात अंतर्गत कलह निर्माण झाला आहे, आंतरिक सुरक्षा धोक्यात आली आहे. काँग्रेसने वारंवार याचा इशारा दिला होता, तुम्ही द्वेष पेरत आहात, हा द्वेष देशाची प्रगती रोखणारा आहे. देशभरात आज चिंतेचं वातावरण आहे, आज माझ्यातली आई रडतेय... देशभरातली लाखों आया रडतायत. आमच्या लेकीबाळींचं भविष्य अंधारात दिसतंय. तुमचं राजकारण होईल.. पण या देशातील पोरीबाळींचा जीव त्यासाठी पणाला लावू नका. हा देश तुम्हाला माफ करणार नाही. इतिहास तुम्हाला माफ करणार नाही.