सामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या संपादिका जयश्री खाडिलकर

सामान्य माणसांचा आवाज, वेळप्रसंगी मदतीला धावणाऱ्या... प्रसिद्धीच्या झोतात न राहता आपली जनमाणसांत वेगळीच ओळख निर्माण करणाऱ्या महाराष्ट्राच्या एकमेव महिला मालक-संपादक जयश्री खाडीलकर... यांच्या कर्तृत्वाबद्दल मैत्रिण श्रद्धा बेलसरे खारकर यांनी लिहिलेला हा लेख नक्की वाचा...

Update: 2021-06-27 03:09 GMT

जयश्री खाडिलकरची माझी पहिली भेट औरंगाबादला झाली. तेव्हा ती बुद्धिबळाच्या स्पर्धेत खेळत होती. त्याकाळी खाडिलकर भगिनी प्रसिद्धीच्या झोतात होत्या. तिन्ही बहिणींनी 'ग्रँडमास्टर' हा किताब मिळवला होता. देशविदेशात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. मी काही पत्रकारांबरोबर तिला भेटायला गेले. गोरापान रंग, घारे तेजस्वी डोळे, गंभीर चेहरा आणि मितभाषी स्वभाव असलेली जयश्री मला पहिल्या भेटीतच खूप आवडली. तिने आम्हाला छान मुलाखत दिली. त्यावेळी मला भावला तो तिचा साधेपणा! मग पुढे अनेक वर्षांनी मुंबईला आल्यावर तिच्याशी माझी प्रत्यक्ष मैत्री झाली.

जयश्री हे अफलातून रसायन आहे. ती आयुष्यात अतिशय नेमस्त आहे. तिची दिनचर्या शिस्तबद्ध आहे. कुठल्याही परिस्थितीत ती सकाळी ८ वाजता ऑफिसमध्ये हजर असते. वडील 'अग्रलेखांचे बादशहा' निळूभाऊ खाडीलकरांच्या तालमीत ती तयार झालेली आहे. गेल्या दोन दशकापासून नवाकाळचे संपादकपद ती समर्थपणे सांभाळत आहे.

मुंबईतील दंगलीनंतर एकदा निळूभाई खाडीलकरांनी श्रीकृष्ण आयोगावर एक अग्रलेख लिहिला होता. 'जस्टीस श्रीकृष्ण यांचे डोके ठिकाणावर आहे का?' असे अत्यंत प्रक्षोभक शीर्षक त्यांनी दिले. भाऊच ते! लोकमान्य टिळकांना गुरुस्थानी मानणारे निळूभाऊ कुणाला घाबरणार? त्या अग्रलेखावर हक्कभंग ठराव झाला आणि त्यांना ८ दिवस तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावेळी भाऊ खूप आजारी होते. जयश्रीने लगेच संपादक म्हणून सगळी जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेतली आणि तुरुंगवास भोगला. त्यावेळी जर तिने माफी मागितली असती तर तिचा तुरुंगवास सहज टळला असता. पण स्वत:च्या मतावर ठाम असणा-या जयश्रीने माफी न मागता तुरुंगवास भोगला व एक इतिहास घडवला!

ती नवाकाळ चालवताना खूप तटस्थ असते. पण एखादा न आवडणारा विषय असेल तर मात्र ती वाघिणीसारखी तुटून पडते. त्यावेळी कुणाचीही भीडभाड ठेवत नाही. जयश्रीची राजकीय जाणीव परिपक्व आहे. तिचे अग्रलेख वाचनीय असतात ते जणू निळूभाऊनी लिहिलेत असा भास लोकांना होतो.

वृत्तपत्राचे जिकीरीचे कामकाज बघताना आणि त्यातील चढउतारांना तोंड देताना ती थकत नाही. तिच्याकडे प्रश्नांना तोंड देण्याची एक वेगळीच उर्जा आहे जयश्रीचा कल आहे तो आपल्या हातातील पेपररुपी हत्यार वापरून गरीब आणि वंचित घटकांच्या उन्नतीला मदत करण्याकडे. नवाकाळ हा पेपर सामान्य माणसाचा आहे. तिला त्यांचे प्रश्न सोडवण्यात रस आहे. संपामुळे गिरणगाव संपले. कामगार देशोधडीला लागला. गिरणीच्या जागांवर प्रशस्त मॉल उभारले गेले. पण ज्यांचे रक्त सांडले त्या कामगारांना मात्र काहीच मिळाले नाही.

गिरणी कामगारांच्या घरासाठी जयश्रीने अनेक वर्षे लढा देवून त्यांना घरे मिळवून दिली. हा लढा देणे सोपे नव्हते. धनदांडग्या लोकांबरोबरची लढाई ही खूप थकवणारी आणि वेळ घेणारी असते. पदोपदी पदरी निराशा आणणारी असते. पण ती न कंटाळा न करता काम करत असते.

महापालिकेत सफाई करणारे कर्मचारी हा असाच एक वंचित घटक! त्यांच्यासाठीही तिने अनेक वर्षे लढा देवून त्यांना घरे मिळवून दिली आहेत. विविध सामाजिक प्रश्नांची तिला चांगली जाण आहे आणि त्यावर ती कुणाचीही भीडभाड न बाळगता सडेतोड लिखाण करते. तिला प्रवासाची खूप आवड आहे. आम्ही अनेकदा बरोबर फिरलो आहोत.

मध्यप्रदेश निवडणूक दौ-यात वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या सभा कव्हर करण्यापेक्षा तिला अंगणवाड्यांना भेट देणे, शेतमजुरांशी चर्चा करून त्यांची स्थिती जाणून घेणे यात जास्त रस असायचा. दिवसभर वणवण फिरल्यावर संध्याकाळी ती 'कॉपी पूर्ण करून मुंबईला नवाकाळच्या कार्यालयात पाठवल्याशिवाय कधीही आराम करायची नाही. आजूबाजूला कितीही गडबड गोंधळ असेल तरीही जयश्रीचे लिखाण एकाग्रपणे सुरु असते.

तिला समाजातल्या वेगळे काम करणाऱ्या लोकांना भेटायला आवडते. सिंधुताई सपकाळ असोत की कोणत्याही माहेर नसलेल्या स्त्रीला माहेर देणा-या कोकणातील चंदाराणी कोंढाळकर असोत ती स्वत: जाऊन त्यांचे काम बघून त्या कामाला प्रसिद्धी देते. ती सारखी नवतेच्या शोधात असते. नवे बघायला आणि त्यावर लिहायला तिला आवडते. वेगळे काम करणाऱ्यांना ती प्रोत्साहित करते.

खरेतर भांडवलशाही वृत्तपत्राच्या काळात एकटीने एवढे मोठे वृत्तपत्र चालवणे आणि तो कोणताही राजाश्रय नसताना चालवणे हे अवघड काम आहे. शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. पण ते जयश्री लीलया पार पाडते.

माझ्या माहितीप्रमाणे ती महाराष्ट्रातील एकमेव महिला मालक-संपादक आहे. बुद्धिबळ खेळलेली आंतरराष्ट्रीय विजेती आहे. पण या सर्वाचा गर्व तिच्या वागण्याबोलण्यात मला कधीही दिसला नाही. कधी कुठे सभासमारंभाला गेली तर शांतपणे मिळेल त्या खुर्चीवर बसून बघते. छोट्यामोठ्या वार्ताहरांचे नखरे मी पाहिलेले आहेत पण जयश्रीच्या वागण्यात कुठेही मी संपादक आहे हा अविर्भाव नसतो.

तिची न बोलता अनेक कामे चालू असतात. बहुतेक दर महिन्याला ती मोखाड्याला जाऊन भेट देते. तिथले प्रश्न समजावून घेते. तिथल्या शाळेत जाणा-या मुलींना चार पाच किलोमीटर चालावे लागते. तिने त्या मुलींना सायकली पुरवल्या. बरे या गोष्टीचा कधी गवगवा नाही की प्रसिद्धी नाही. गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यात महापुर आला होता. ती तिथली परिस्थिती पहायला गेली आणि ती विदारक परिस्थिती बघून हेलावली. मुंबईत येऊन तिने लगेच मदत गोळा केली. तिच्या हे लक्षात आले कि रस्त्यावरच्या गावांना खूप मदत मिळते. आडमार्गाच्या गावांना मदत पोहोचूच दिली जात नव्हती. मधल्या गावांची टोळकीच्या टोळकी रस्त्यावर उभी असत आणि ट्रक अडवून मदत काढून घेत. तिने प्रयत्नपूर्वक एक लांबचे गाव निवडले. तिथल्या ५०० कुटुंबांना तिने संसार उपयोगी साहित्य आणि धान्य पोचवले. खर तर तिच्या हाती तिचा स्वत:चा लोकप्रिय पेपर आहे ती रोज फोटो/बातम्या टाकू शकते. पण ही मुलगी नेहमीच प्रसिद्धीपासून दूर असते.

मराठवाडा आणि विदर्भात पूर्वी बारवा असत. बारवा म्हणजे पायविहिरी. काळाच्या ओघात या बारवा बुजून गेल्या. काही बारवा तर स्थापत्यशास्त्राचे अनोखे नमुने आहेत. या बारवा संवर्धन करण्याचे काम तिने आणि तिचे पती रमाकांत पांडे यांनी हाती घेतले. अशी कितीतरी कामे सांगता येतील. पण तिला विचारले तर ती काहीच बोलणार नाही.

माझी आणि तिची मैत्री कशी याचे अनेकांना कोडे पडते. खरंच आहे ते. आमच्या दोघीत काहीच साम्य नाही. मी खळाळता झरा आहे तर ती शांत डोह. मी तडकफडक तर ती स्थितप्रज्ञ! मी बडबडी तर ती मितभाषी. माझा जनसंपर्क खूप तर ती नेमक्या आणि मोजक्यातच रमणारी. तरीही मैत्री आहे आणि ती खूप खोल आणि गहिरी आहे. ती अतिशय कुटुंब वत्सल आहे.

मला नेहमी प्रश्न पडतो मला कधी तिच्यासारखे होता येईल का?
-श्रद्धा बेलसरे-खारकर
८८८८९५९०००

Similar News