राज्यातील केंद्र सरकारने मासेमारी व्यवसायातील सगळे निर्बंध हटवले आणि मासेमारी सुरू करण्यास परवानगी दिली. सागरी किनारपट्टीवर लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम महिलांवर होत आहे. ज्या महिला मच्छी मार्केट किंवा घरोघरी जाऊन मासेविक्री करून आपले कुटुंब चालवितात त्यांच्यासाठी हा लॉकडाऊनचा काळ कठीण होऊन बसला आहे.
तांबळडेग देवगडच्या तेजस्विता कोळंबकर सांगत होत्या की, यावर्षी आम्ही समुद्रात फक्त १२ ते १४ वेळाच जावू शकलो. मासेमारी राखी पोर्णिमेनंतर सुरू होते पण वादळी पाऊस, फयान आणि क्यार सारखी वादळे यामुळे आम्हाला मासे मिळाले नाही. पार्सिसन नेट फिशिंगमुळे तर आम्हाला पुरेशी कॅचही (जाळे समुद्रात टाकल्यानंतर मिळणारे मासे त्याला कॅच हा शब्द वापरतात ) मिळत नाही. आधी पार्सिसन नेट फिशिंग होत होती त्यात अजून एलईडी लाईटचाही वापर केला जातो. हे असच सुरू राहिलं तर समुद्रात मासाच मिळणार नाही. ह्या सगळ्याचा विचार केला तर पारंपारिक मच्छिमारांनी जगायचं कसं हा प्रश्न आमच्या पुढे आहे. तरीही आम्ही जी मच्छी मिळेल ती विकून आमचे कुटुंब चालवतो.
कोरोनामुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे. सरकारने एकीकडे मासेमारीचे काम सुरू केले असे दिसत असले तरी मासेविक्री करण्यार्या महिलांसाठी लॉकडाऊनच आहे. आम्ही ज्या ठिकाणी आठवडी बाजार असतो त्याठिकाणी जाऊन मच्छी विकतो तर कधी दारोदारी जावून मच्छी विकतो. पण आता कोठे जाण्यासाठी वाहतूक साधन उपलब्ध नाही. यात पुन्हा उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे मासे जास्तवेळ उन्हात राहिले तर खराब होऊन जातात. यासाठी माशाची टोपली, बर्फ, मीठ हे सगळं घेऊन मासे विक्रीचे काम करावे लागते. एक बाई डोक्यावर इतक सगळं सामान घेऊन कशी चालणार. दारोदारी फिरून मासे विकता यावे म्हणून तरी गावात वाहतूक व्यवस्था सुरू झाली पाहिजे.
मालवण शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या तारकर्ली गावातील रहिवासी माधुरी खवणेकर (वय ६४) मालवण मासळी मार्केटमध्ये त्या मासे विक्री करतात. लॉकडाऊनच्या काळात मत्स्य व्यवसायातील सद्यस्थितीबद्दल भाष्य करताना त्या अतिशय चिंता व्यक्त करतात.
माधुरीताई सांगतात, "काही वर्षांपूर्वी विविध प्रकारच्या माशांच्या राशीच्या राशी मी पाहिलेल्या आहेत. आम्ही पाहिलेली मालवणची वैविध्यपूर्ण मत्स्य संपदा काही वेगळीच होती. पण आज ते मत्स्य वैभव हरपले आहे. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सचे वाढलेले अतिक्रमण आणि विध्वंसकारी एलईडी पर्ससीन मासेमारीमुळे रापण व गिलनेटधारक स्थानिक पारंपरिक मच्छीमारांना मासे मिळणे दुरापस्त झाले आहे. परराज्यातील हे ट्रॉलर्स मासे लुटून नेत असल्याने स्थानिक बाजारात माशांची आवक घटते आहे. त्यामुळे माशांचा दरही स्थिर राहत नाहीये. त्याचा मोठा आर्थिक फटका मासे विक्रेत्या महिलांना बसतो आहे.
यावर्षी जानेवारीपासून मोठ्या प्रमाणात मत्स्य दुष्काळाची झळ मच्छीमारांना बसली आहे. त्यातच सातत्याने निर्माण होणाऱ्या वादळांमुळेही मत्स्य व्यवसायाचे वेळापत्रक बिघडले आहे. परिणामतः मच्छीमारांचेही आर्थिक गणित बिघडलेले आहे. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही जाणवतो आहे. बाजारपेठेत आर्थिक मंदी आहे. लॉकडाऊनमुळे तर हाती काहीच पडत नाहीये. एलईडी फिशिंगमुळे आमची अन्न सुरक्षा हिरावून घेतली आहे. शासनाने या लॉकडाऊनच्या काळात दोन महिने अनुदान देण्यासाठी माहिती भरून घेतली आहे. अद्याप कोणतीही मदत आम्हाला मिळाली नाहीये.
मत्स्य व्यवसाय अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. त्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत यासंबंधीचे निवेदन वेळोवेळी मच्छीमार संघटनांकडून शासनाला सादर केले जाते. तरी शासनाने पारंपरिक मच्छीमारांच्या मागण्यांची दखल घेणे आवश्यक आहे. तसेच पावसाळ्याच्या मासेमारी बंदी कालावधीत दारिद्रयरेषेची अट न ठेवता मासे विक्रेत्या महिलांना अनुदान देणे आवश्यक असल्याचे मत खवणेकर यांनी व्यक्त केले.
८१,४९२ मच्छिमार कुटुंबापैकी ९१% मच्छिमार हे पारंपरिक मच्छिमार कुटुंब आहेत. महिला आणि पुरुष म्हणून मच्छिमारांचे विश्लेषण पाहिले तर ६२,११४ पुरुष मच्छिमार ह्या कामात पूर्णवेळ गुंतले आहेत तर ११,४१४ हे पार्ट टाइम स्वरूपाची मासेमारी करतात. उर्वरित मच्छिमार पुरुष हे मत्स्य बीज संकलनाच्या कामात गुंतलेले आहेत. ४०% मच्छिमार पुरुष हे मासेमारी आणि त्याच्याशी संबधित अन्य कामात गुंतलेले आहेत. जसे की, जाळे दूरस्ती, नौका दुरूस्ती, सुके मासे प्रक्रिया इत्यादी. ४१% पुरुष हे मार्केटिंगच्या कामात गुंतलेले आहेत, २६ % तस्त्म मजुरीच्या कामात तर उर्वरित १३ % हे मासेमारी व्यवसायासाठी संबधित कामात गुंतलेले आहेत. यात स्त्रीयांचे प्रमाण पाहिले तर ६९% स्त्रिया ह्या मासेमारी लिलावातून मासे खरेदी करणे, मासेविक्री करणे, मार्केटमध्ये जाणे, सुक्या माश्याच्या प्रक्रियेत पूर्णवेळ काम करणे, जाळे विणणे आणि त्याची दुरूस्ती देखभाल याशिवाय कुटुंबाची जबाबदारी या कामात स्त्रिया गुंतलेल्या आहेत. मासे प्रक्रियाच्या कामात ९१% तर मार्केटिंगच्या कामात ८४% स्त्रिया गुंतलेल्या आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणात स्त्रीयांचे मासे विक्रीच्या व्यवसायातील काम आहे. यालॉकडाऊनने तोंडचा घास हिसकावून घेतल्याची भावना या महिला व्यक्त करतात. हे लॉकडाऊन लवकर संपले तर थोडाफार तरी व्यवसाय करता येईल. ज्यामुळे पावसाळ्यात जी मासेमारी बंद असते तो कालावधी तरी जगण्यास सुसह्य होईल. राज्यातील पारंपारिक मच्छिमार, मासे विक्रेत्या महिला आधीच पार्सिनिन नेट फिशिंग, एलईडी फिशिंग, सागरी वादळे आणि अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडला असतांना लॉकडाऊनने यात भर टाकली अशी खंत महिलांनी व्यक्त केली आहे.
-रेणुका कड