आपल्याला आईवरुन कोणी शिवी घातली की समोरच्याची कॉलर धरणारे आपण..
"हिला" तर आत्ताच आईपणाची चाहुल लागली होती ना.. तिला हक्क होता जगण्याचा.. मुल वाढवण्याचा...
पण केरळच्या हैवानांनी अननसातून फटाके खाऊ घालून आपण दैत्य म्हणून जन्मलो असल्याचं सिद्ध केलं..
हत्तींच्याच जीवावर स्वतःचं घर चालवणारे त्याभागात बरेच आहेत..
शिवाय ही घटना बघितल्यानंतर आता केरळचं नाव देवभूमी नाही तर दैत्यभूमी नामकरण करण्याची वेळ आली आहे असं वाटतं..?
जगात महामारीत माणूस माणसासाठी धावतोय तिथे हे असले नराधम एका गर्भार हत्तीणीचा बळी घेतायेत...
त्यातही तिने माणूसकी सोडली नव्हती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.. .
केरळच्या सायलेंटवॅलीमधून बाहेर आलेली हत्तीण भूकेने व्याकुळ होऊन फिरत होती. अन्नाच्या शोधात ती जंगलाबाहेरील एका गावात आली, तिला कुणीतरी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घातला..
तिचं चुकलं इतकंच....
तिनेही माणसावर विश्वास ठेवत घास घेतला, पण फटाके फुटल्यामुळे तिचे तोंड, जीभ फाटली. त्याही अवस्थेत तिने आजुबाजुच्या कुठल्याही माणसाला मारले नाही, रागाने नासधूस केली नाही.
शांतपणे पाण्याच्या शोधत ती चालत राहिली, शेवटी तिला नदी दिसल्यावर पाण्यात डोकं खुपसून उभी राहिली.
वेदना शमवण्यासाठी ३ दिवस ती नदीतच पाय रोवून उभी होती, जखमा थंड करण्यासाठी पाणी पित होती. अखेर तिची सहनशक्ती संपली आणि तिने जलसमाधी घेतली....
मात्र पोस्टमोर्टमध्ये कळालं ती गर्भवती होती, पुढील १०-१२ महिन्यात ती आई होणार होती...
नदीत उभी राहिली तेंव्हा काय भावना असतील तिच्या? पोटातल्या बाळाला वेदना होऊ नये म्हणून बाहेर नसेल आली ती? बाळ सुरक्षित राहील पाहिजे म्हणून पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली असेल का ती? आईपण निभावण्यासाठी आई स्वतः चे प्राण पणाला लावते मग ती माणसाची असो वा प्राण्यांची हेच खरं!
पण तिच्या आईपणचा, तिचा, तिच्या होणाऱ्या बाळाचा बळी घेणारा हा दानवच..! जगातली कुठलीच "आई" त्याला माफ करणार नाही....
- दीपक पळसुले
(लेखक एबीपी माझा चे वृत्त निवेदक आहेत.)