‘ती’ बस कंडक्टर अशी का वागली?
बस थांब्यावर बस थांबली तशी बसची महिला कंडक्टर चपळाईने गर्दीतून खाली उतरली. एसटी बस पासुन थोड्या अंतरावर एक पडदे लावलेली रिक्षा उभी होती...थेट ती रिक्षात शिरली. एव्हाना चढ- उतार करणारे प्रवासी बस निघण्याची वाट पाहतं चुळबुळ करीत...बसची कंडक्टर गेली कुठं?..असं विचारु लागले. 'येईल ईतक्यात' म्हणुन ड्राइव्हरही वेळ मारून नेत होता. तोच ती रणरणत्या उन्हात उभ्या रिक्षातुन घाईघाईने खाली उतरली.. अक्षरशः धावत बस कडे येतं तिच्या सीटवर बसली आणि डबल बेल दिली... काय होता हा प्रकार? का केलं तीने असं?
मालेगांवला लग्नाला जायचं म्हणुन बस स्टँडवर आलो तरं सगळीकडे गर्दीचं गर्दी. लग्न सराई असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसेस प्रवाश्यांनी तुडुंब भरलेल्या.. बस्स! स्थानकाच्या आत शिरणारी बस पाहिले रे पाहिली की धावलेच प्रवासी. आतल्या लोकांना बस बाहेर येण्याची संधी न देता. जागा पकडण्याची नुसती शर्यत लागलेली. ड्राईव्हरची केबिन, खिडक्या, वाट्टेल तेथून आत जाण्याची धडपड. त्या गदारोळात अखेर महत्प्रयासाने मालेगांवला जाणाऱ्या बस मध्ये स्वतःला कोंबून घेतलं आणि कसाबसा दारांत उभा राहिलो. माझ्या नंतर बस मध्ये शिरायला कुणालाच वाव नव्हता इतकी बस फुल्ल होती.
आता ही बस कधी निघते याचं विचारात असताना लक्ष कंडक्टर सीट कडे गेलं. तर, त्यावर एक अगदीच तरूण कदाचित नवीनच असलेली महिला कंडक्टर एका हातात तिकिट देण्याचे मशिन आणि दुसऱ्या हातातला मोबाईल कानाला लावून कोणाशीतरी बोलण्यात मग्न होती. 'निघालेच मी... अजुन थोडा वेळ जरा सांभाळा' असं कांहीतरी काकुळतीला येवुन सांगत असल्याचं ऐकू येतं होतं. बोलणं झाल्यावर तिनं मोबाईल ठेवला आजुबाजुला एकदा पाहुन. डबल देण्यासाठी समोरची दोरी ओढली आणि तिकडं ड्राईव्हरने सेल मारला. पन्नास पंचावन्न प्रवाश्यांचे ओझे सांभाळत. कुरकुर करीत बस स्थानकाच्या बाहेर निघत मार्गस्थ झाली.
बस थोडीशी पुढे गेल्यावर 'ती' महिला कंडक्टर 'तिकिट तिकिट' हलक्या आवाजात ओरडली. पण बसचा आवाज आणि प्रवाश्यांची गडबड यांतच तिचा आवाज विरला. त्याचवेळी मी खिश्यातुन पैसे काढुन तिच्या समोर धरीत 'एक मालेगांव' म्हणतं तिकिट घेतलं. मग आजुबाजुला बसलेले उभे प्रवाश्यांची पैशे तिकिटाची देवघेव सुरु झाली. कदाचित काहींनी महिला कंडक्टर प्रथमच पाहिली असावी ते तिच्या प्रत्येक हालचाली टिपत होते. हसुन कांहीतरी कॉमेंट्स पास करण्यात धन्यता मानीत होते. शेवटी बसच्या मागील भागातील प्रवाश्यांना तिकिट देण्यासाठी 'ती' गळ्यातली ब्याग आणि मशिन सावरीत उभी राहत. कांही अनावधानाने होणारे.. कांही हेतुपुरस्सर दिलेले धक्के... होतं असणारे स्पर्श यांना चुकवीत.. तोल सांभाळीत... सुट्या पैशांवरून.. मुलांच्या वया वरून नेहमीचे होणारे वाद यांना तोंड देतं देतं मागे जावू लागली... पण, ती कुठंतरी हरवल्या सारखी वाटतं होती. कसल्यातरी काळजीत असल्या सारखी.
तिकिटे देवुन झाल्यावर ती पुन्हा सीटवर येवुन अधीरतेणे शुन्यात नजर लावून बाहेर बघत होती. मधुनच येणाऱ्या मोबाईलवर 'आलेच... पोहोचतेच' अशीच उत्तरं देवुन फोन कट करीत होती. दरम्यान, बसने चांदवडचा टोलनाका पास केला होता. चांदवडच्या बस थांब्यावर बस उभी राहताच उतरणारे चढणारे यांची पुन्हा एकवार झुम्बड उडाली आणि त्या गर्दीत 'ती' घाईघाईने खाली उतरून गेली. एसटी बस पासुन थोड्या अंतरावर एक पडदे लावलेली रिक्षा उभी होती. चपळाईने ती रिक्षात शिरली. एव्हाना चढ उतार करणारे प्रवासी बस निघण्याची वाट पाहतं चुळबुळ करीत. बसची कंडक्टर गेली कुठं? असं विचारून ड्राईव्हरला भंडावून सोडीत होते. 'येईल इतक्यात' म्हणुन वेळ मारून नेत होता. माझंही कुतूहल जागं झालं होतं...
माझी नजर त्या दूरवर उभ्या रिक्षावर खिळली होती. कांहीच अंदाज येतं नव्हता. तोच ती रणरणत्या उन्हात उभ्या रिक्षातून घाईघाईने खाली उतरली. अक्षरशः धावत बसकडे येतं तिच्या सीटवर बसली आणि डबल बेल दिली. बस मालेगांवच्या दिशेनं निघाली. तिच्या शेजारी असलेला प्रवासी उतरून गेल्यानं मला बसायला जागा मिळाली होती. तिच्याकडे पाहताना एक जाणीव झाली. तिच्या चेहेऱ्यावरची काळजीची छटा लोपली होती. ती थोडीशी सावरल्या सारखी दिसतं होती.
नवीन प्रवाश्यांना तिकिट देवून ती शांत बसली होती. शेवटी न रहावुन. "ताई तुम्ही बस सोडून कुठं गेला होता ? प्रवासी ओरडत होते" मी विचारलं... माझ्या अनपेक्षित प्रश्नानं क्षणभर ती गोंधळली. पण तडक उत्तरली.
"माझ्या साडेचार महिन्यांच्या बाळाला दूध पाजायला.. हों... नाशिक मालेगांव- मालेगांव नाशिक अश्या फेऱ्या मारताना रोजचं मला असं करावं लागतं... माझे पती इथेच चांदवडला रिक्षा चालवतात... सासुबाई बाळाला रिक्षात घेऊन येतात. भुकेने व्याकुळ झालेल्या माझ्या बाळाला मी दूध पाजते आणि पुढे जाते. कंडक्टर म्हणून आत्ताच नोकरीवर रुजू झाले. त्यामुळं रजा नाही. त्यासाठीच हे सगळं करावं लागतं. प्रवासी ओरडतात, तक्रारी करतात, पण त्याला ईलाज नाही. बाळासाठी नोकरीसाठी सारं सोसावं लागतं." ती बोलत होती. मी तिची व्यथा ऐकत होतो. न रहावून माझ्या जवळची माझी पाण्याची बाटली मी तिच्या समोर धरली. बुच उघडून ती अर्धे निम्मे पाणी घटाघटा प्याली. जणू बाळाला दूध पाजेपर्यत तिला तहान भुकेची कांहीच शुध्द नसावी इतकी ती तहानलेली होती. 'धन्यवाद काका' म्हणतं तिनं पाण्याची बाटली परत केली.
तिनं उलगडलेल्या तिच्या या अश्या दैनंदिन प्रवासाच्या कथेमुळं माझ मन हेलावल होतं. बाळासाठी आणि नोकरी टिकवण्याची तिची होणारी ससेहोलपट प्रत्यक्ष पाहतं अनुभवीत होतो. त्याचबरोबर नकळत तिच्यातील स्त्रीशक्तीला, तिच्या सहनशक्ती पुढं नतमस्तक होतं होतो. तिच्यातील मातृत्वाला. आपल्या बाळासाठी इतकं सगळं सोसणाऱ्या एका आईला वंदन करीत. आदराने तिच्या कडे पाहतं होतो. ती मात्र एखाद्या देवालयातील मुर्ती सारखी डोळे लावून शांत बसली होती. मालेगांव नाशिक येतांना पुन्हा आपल्या बाळाला दूध पाजण्याच्या विचारांत. स्वतःला तयार करीत असल्यासारखी....
-पराग उनकुळे