शिलेदार संस्थेच्या रणरागिणींनी केला रायगड किल्ल्यावरील हिरकणी कडा सर
जागतिक महिला दिनी अनोखा उपक्रम, हिरकणीच्या पराक्रमाची आठवण ताजी
रायगड - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन सोमवारी किल्ले रायगडावर महिलांनी हिरकणीच्या पराक्रमाच्या आठवणी ताज्या करत हिरकणी बुरुज सर केला. शिलेदार संस्थेच्या महिलांनी हा अनोख्या उपक्रम साजरा केला. स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड अभेद्य होता. घरी असलेल्या लहानग्या बाळासाठी हिरकणी नावाची सर्वसामान्य महिला पराक्रमाची शर्त करीत गडाचा कडा उतरली होती.
नंतर या कड्याला हिरकणी बुरुज हे नाव दिले गेले. हिरकणीच्या या पराक्रमाला उजाळा देते शिलेदार संस्थेच्या महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करीत हा हिरकणी बुरुज सर केला. या उपक्रमानंतर या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. या मोहिमेत सातारा पोलीस दलातील मोनाली निकम, सोलापूर वनविभागातील शिलाताई बडे यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पन्नास महिला सहभागी झाल्या होत्या, आदिती व आर्या या लहान मुलींनी देखील मोहिमेत सहभाग घेतला होता.