NCB रिया चक्रवर्तीला पुन्हा तुरुंगात टाकण्याच्या तयारीत?
अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2020 मध्ये जामीन दिला होता. पण, NCB ने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने रिया चक्रवर्तीला पुन्हा अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुशात सिंह आत्महत्या प्रकरणात सुशांतला आमली पदार्थ सेवनाची सवय असल्याचं समोर आलं. सुशांतला हे ड्रग्ज त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती पुरवत असल्याचा आरोप करण्यात आला. याच प्रकरणात सप्टेंबरमध्ये रियाला सेंट्रल एजन्सी ऑफ नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) अटक केली होती. रिया तुरुंगातही गेली. रिया सोबतच तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यालाही अटक करण्यात आली होती. ऑक्टोबर 2020 मध्ये रियाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
आता एनसीबीने रियाच्या बेलविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार एनसीबीच्या याचिकेवर 18 मार्च रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ही सुनावणी मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर होण्याची शक्यता आहे.
रियाला अटक करतेवेळी एनसीबीने रिया ड्रग्स पुरवठा करणाऱ्या टोळीची सक्रीय सदस्य असल्याचं म्हटलं होतं. तर आपल्या जबाबात रियाना "मी निर्दोश आहे. तपास यंत्रणा मला मुद्दम यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुशात मागील अनेक दिवसांपासून नैराश्यात होता. यातूनच त्याला ड्रग्सचे व्यसन लागलं होतं. आणि मी त्याचं हे व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते."
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रियाचा जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करतेवेळी न्ययालयाने "रिया कोणत्याही ड्रग्ज गॅंगची सदस्य नाही. शिवाय तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे अवैध आमली पदार्थ आढळले नाहीत." असं म्हटलं होतं. न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला. तसेच रियाला कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ नये असे आदेश देखील दिले होते.
पण आता एनसीबीने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने NCB रियाला पुन्हा एकदा तुरुंगात टाकण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.