इंदोरीकरांच्या अडचणीत वाढ; महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका
प्रकरणाची सुनावणी आता आठ आठवड्यानंतर होणार आहे.
महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली असून, पुढील सुनावणी आठ आठवड्यानंतर होणार आहे.
समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केल्याने याप्रकरणी त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने खटला दाखल करण्यात आला होता. पुढे इंदुरीकर महाराजांच्या वतीने संगमनेर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात अपील करण्यात आलं होतं. हे अपील न्यायालयाने मंजूर करत, वादग्रस्त वक्तव्य प्रकरणातील खटला रद्द केला होता.
त्यामुळे निकालाला आव्हान देत याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी ऍडव्होकेट जितेंद्र पाटील व नेहा कांबळे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली आहे. इंदुरीकर यांच्या विरोधातील तक्रार रद्द करू नये अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली असून खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी या प्रकरणाची सुनावणी आता आठ आठवड्यानंतर ठेवली आहे.