कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही शालेय शुल्कात कपात करावी; बाळा नांदगावकर
कोरोना माहामारीचा सर्वांनाच मोठा आर्थिक आणि मानसिक फटका बसला आहे. अशात पालकांना मुलांच्या शाळेची फि भरण्यासाठी अवघड जात आहे.
कोरोनाचा लॉकडाउन संपला आणि हळूहळू जनजीवन पुर्व पदावर यायला सुरूवात झाली आहे. मुंबई वगळता लॉकडाउनच्या काळात ऑनलाईन सुरु असलेल्या शाळा-महाविद्यालये आता सुरू झाल्या आहेत. मात्र शाळा-महाविद्यालये सुरू होऊनही अनेक विद्यार्थ्यांना फि अभावी शाळेला मुकावं लागत आहे. मात्र कर्नाटक सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देत जसं शालेय फि मध्ये ३० टक्यांची सुट दिली आहे. तशीच महाराष्ट्र सरकारनेही द्यावी अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत 'कर्नाटक सरकारने शालेय शुल्कात ३०% कपात करण्याचा निर्णय घेतला, असाच निर्णय घेऊन महाराष्ट्र सरकारने फी बद्दल शाळा व पालक यांच्यातील तिढा सोडवावा. शाळा अनेक महिने बंद असल्याने त्यांचीही अनेक दैनंदिन खर्चात मोठी बचत झाली आहे व ३०-४०% फी कमी केल्यास पालक हि ती भरू शकतील. तसेच मोठ्या प्रमाणात फी जमा झाल्यास शाळेचे रुतलेले आर्थिक चक्र हि मार्गी लागेल.'
बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना टॅग करत, ही मागणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या विविध भागांतून पालक आणि शाळा यांतील फि वरून वाद सुरु असल्याच्या वारंवार बातम्या येत आहे. बाळा नांदगावकर यांनी केलेल्या या मागणीचा राज्य सरकार विचार करून हा प्रश्न मार्गी लावेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.