आता तुमच्या 12विच्या गुणांत असणार 10वी आणि 11वीच्या गुणांचा महत्वाचा रोल

Update: 2021-06-17 10:15 GMT

10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा प्रश्न निर्माण झाला असताना, सरकारने 10 वीच्या मूल्यांकनासंदर्भात निकालासाठी 100 गुणांचं मूल्यमापन करण्यात येईल. असं जाहीर केलं आहे. मात्र, 12 वीच्या परीक्षाच्या मूल्यांकनाचा प्रश्न कायम होता.

या संदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे की, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे त्यांच्या १० वीच्या तसेच ११ वीच्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. बारावीचे गुणपत्रक हे मुलांच्या मागील वर्षाच्या गुणपत्रकाद्वारे ठरवण्यात येणार असून 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचे मंडळाने सांगितले आहे.

तसेच १२ वीच्या परीक्षेच्या मूल्यांकन गुणपत्रामध्ये ४० टक्के गुण हे १२ वीच्या पूर्व - परीक्षेवर आधारित असतील. तर दहावी आणि अकरावीच्या परीक्षांचे सुद्धा प्रत्येकी 30 - 30 गुण जोडले जातील. दरम्यान बारावीच्या निकालासाठी मागील परीक्षांच्या कामगिरीलाही महत्त्व देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांच्या खंडपीठाने मंडळाच्या प्रस्तावाला सैद्धांतिक सहमती दिली आहे. सोबतच न्यायालयाने CBSE आणि ICSE यांना त्यांच्या वेबसाइटवर मूल्यांकन अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत.

CBSE ने न्यायालयाने सांगितले आहे की, प्रॅक्टिकल्स 100 गुणांचे असतील आणि शाळेद्वारे विद्यार्थ्यांना दिलेले गुणही ग्राह्य धरले जाणार आहेत. दरम्यान 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्यात येतील असे ICSE बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

यावर न्यायालयाने CBSE आणि ICSE ला सुनावणी वेळी सांगितले की, निकालानंतर निर्माण होणाऱ्या प्रश्नावर समाधान मिळवण्यासाठी एक पॅनलची निर्मिती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Similar News