राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री झायरा वसीम हिने पाच वर्षांपूर्वी बॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. दंगल गर्ल म्हणून सर्वांच्या समोर आलेल्या झायराने कमी वयात एक अष्टपैलु अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली. यशाच्या शिखरावर मार्गक्रमण करत असतानाच तिने सिनेसृष्टीतून कायमची निवृत्ती घेतली. त्यावेळी तिने ‘हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या रस्त्यापासून भरकटले होते,’ असे म्हणत आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले होते. परंतु निवृत्तीनंतरही द पिंक इज स्काय या आगामी चित्रपटात काम केल्यामुळे कमाल खान याने आक्षेप घेत तिच्यावर टीका केली आहे.
बिग बॉसच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेला कमाल खान नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. या वेळी तो अभिनेत्री झायरा वसीमवर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आलाय. त्याने झायराला इस्लाम धर्माचा दाखला देत अमिर खानची चमची असे म्हटले आहे.
“इस्लाम धर्म झायराला चित्रपटात काम करण्याची परवानगी देत नाही, तरीही द पिंक इज स्काय या चित्रपटात तिने का काम केले.केवळ चर्चेत येण्यासाठी तिने हे निवृत्तीचे नाटक केले. ती आमिर खानची चमची आहे. प्रसिद्धी कशी मिळवतात हे तिला चांगलेच माहित आहे”, असे वक्तव्य कमाल खानने झायराविषयी बोलताना केले होते. आपल्या आक्षेपार्ह विधानाने नेहमीच चर्चेत असलेल्या खानने याआधी 18 अभिनेत्री बाबत अश्लील आणि आक्षेपार्ह विधाने केली होती.