मुंबई जिल्हयातल्या मीरा-भाईंदर मतदारसंघात खरे तर नरेंद्र मेहता यांच्याबाबत नाराजी होती. विशेषतः पक्षातील कार्यकर्तेही आपली नाराजी बोलून दाखवत होते पण पक्षाने त्याकडे दुर्लक्ष करीत श्री. मेहता यांनाच तिकीट दिले आणि मग बंड करीत मैदानात उतरलेल्या गीता जैन यांनी मेहता यांचा पराभव करीत जायंट किलर ठरल्या. २००९ साली तयार झालेल्या या मतदारसंघात प्रामुख्याने गुजराती, मारवाडी, जैन,उत्तर भारतीय, मुस्लिम मतदार आहे. या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या अगदी अल्प आहे. त्यामुळे येथील उमेदवार सहसा हिंदी भाषकच असल्याचे दिसून आले आहे. यावेळी भाजपच्या नरेंद्र मेहता यांना नाकारत येथील जनेतेने गीता जैन यांना आपला भक्कम पाठिंबा देत निवडून दिले.
मुख्यत्वे हिंदी भाषक असणाऱ्या या मतदारसंघातील नरेंद्र मेहता आणि गीता जैन हे दोघेही राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील मूळचे रहिवासी आहेत. पाली जिल्ह्यातील कोसेलाव इथले गीता जैन यांचे सासरे मीठालाल जैन हे पाली लोकसभा मतदारसंघाचे पहिले जैन समाजातील खासदार म्हणून निवडून गेले होते. भारतीय युवा शक्ती आघाडीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचा वारसा गीता जैन मीरा –भाईंदर येथून चालवत आहेत.
मूळच्या भाजपच्या असणाऱ्या गीता जैन यांनी यावेळी या मतदारसंघातून तिकिटाची मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती असलेल्या नरेंद्र मेहता यांनी २०१७ ला झालेल्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत ही पालिका भाजपाकडे आणण्यात यशस्वी झाले. या सर्वांचे फळ म्हणजे पुन्हा एकदा त्यांना विधानसभेचे तिकिट देण्यात आले. शेवटी नाराज झालेल्या गीता जैन यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज भरला. खरे पहायला गेले तर महापालिकेतील आणि शहरातील अनागोंदी कारभाराने सर्वसामान्यांबरोबरच कार्यकर्तेही नाराज झाले होते. मेहतांच्या एकाधिकारशाहीमुळे आणि अनेक गैरप्रकारांमुळे प्रशासनात आणि जनतेत त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर होता.
विधानसभेवर निवडून जाण्यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून गीता जैन आपल्या विविध कामाच्या माध्यमातून प्रयत्न करत होत्या. तसे पहायला गेले तर या भागात परिसरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसेन यांचेही मोठे आव्हान जैन यांच्यापुढे होते.पण सर्वात मोठे आव्हान होते ते नरेंद्र मेहता यांचे.
माहेरी कोणताही राजकीय वारसा नसलेल्या गीता जैन या सर्वसामान्य कुटुंबात वाढल्या. बारावी नंतर डीएमएलटीचा कोर्स पूर्ण केलेल्या जैन यांनी लग्नाआधी अनेक छोट्या- मोठ्या नोकऱ्या केल्या. बिल्डर भारत जैन यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या पहिल्यांदा २००२ ला महापालिकेच्या निवडणूक लढल्या. काही काळ त्या खेळ आणि सांस्कृतिक विभागाच्या सभापतीपदीही काम केले. पुन्हा एकदा २००६ ला त्या नगरसेविका झाल्या. २०१२ ला त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. २०१५ ला महापालिकेच्या महापौरपदी विराजमान झाल्या. यासर्व कार्यकाळात त्यांनी विविध लोकोपयोगी कामे करत जनतेमध्ये आपली चांगली प्रतिमा निर्माण केली.याचाच फायदा त्यांना या निवडणुकीत झाला.
शिवसेनेनेही त्यांना उघड उघड पाठिेंबा देत मदत केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी मेहतांच्या प्रचारात मदत करण्याऐवजी जैन यांचाच प्रचार केला. याचाच परिणाम म्हणजे १५ हजार मतांनी मेहता यांचा पराभव करत गीता जैन या निवडून आल्या. निवडणुकीनंतर शिवसेनेने त्यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर देऊ केली होती. परंतू त्यांनी घरवापसी करत भाजपामध्येच जाणे पसंत केले.