संसदेत एकाच पक्षातले लोक सहसा आपल्याच पक्षातील लोकांच्या मुद्द्यांवर हसताना दिसल्याचं फार कमी वेळा आढळतं. संसदेत दिंडोरी मतदार संघातील खासदार भारती पवार पाण्याच्या मुद्द्यावरून गावागावात असलेल्या वादांविषयी बोलताना दिसतात, यावर उपाय म्हणून नरेंद्र मोदींनी जलशक्ती मंत्रालय उभारले याबद्दल त्यांचे आभारही त्यांनी मानले. सुरुवातीला कर्जमाफी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते असं त्या म्हणाल्या, आणि त्यांच्या मागेच बसलेल्या भाजपच्याच खासदार असलेल्या प्रीतम मुंडे व रक्षा खडसे एखाद्या धमाल विनोदावर हसावं अशाप्रकारे टेबलाच्या खाली वाकून वगैरे हसायला लागल्या. यात हसण्यासारखं नक्की काय हे मात्र अजूनही कळलं नाही हे विशेष ! शिवाय या मुद्द्यात खासदार भारती पवारांनी सामान्य माणसाला हसू आवरणार नाही अशाप्रकरचं विधानही केलेलं नाही, भले त्यांनी त्यांच्या पक्षातील लोकांचे गोडवे गायले असतील पण त्यात स्वपक्षीय लोकांनी हसण्यासारखे काहीही गैर नाही.
आता हसण्यासाठी दोन मुद्दे उरतात, एक तर हसणाऱ्या खासदारांना भारती पवारांनी केलेली विधानं मान्य नाहीत आणि भाजपने ती कामं केलेली नाहीत किंवा त्यांचं त्यात क्रेडिट नाही हे तुमच्या आमच्या सारखं मत असल्याने त्या हसत असाव्यात किंवा भारती पवार या दिंडोरी सारख्या आदिवासी मतदारसंघातून येतात, त्यांच्यावर तिकडच्या भाषेचा वगैरे प्रभाव असल्याने त्यांची भाषा आणि सादरीकरण विनोदी वाटून, कुठे संसदेत ही 'अशी' लोकं येतात या विचाराने भाजपच्या दोन खासदारांना हसू अनावर झालं असावं.
दिंडोरी मतदार संघातील खासदार भारती पवार या अतिशय दुर्गम आदिवासी भागाचं नेतृत्व करतात. त्यांना राजकीय वारसा आहे. त्यांचे सासरे स्व. ए. टी. पवार हे नाशिक जिल्ह्यातील कळवण-सुरगाणा मतदार संघातील आमदार (राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष) होते. २०१४ च्या निवडणुकीत ते पडले आणि नंतर वृद्धपकाळाने त्यांचं निधन झालं. आता २०१९ च्या निवडणुकीत भारती पवार या भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन खासदार झाल्या आहेत. एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर किंवा एक जबाबदार व्यक्ती म्हणून न बजावलेल्या जबाबदारी वर आपण हसू अथवा प्रश्न उपस्थित करू शकतो, परंतु एखाद्या व्यक्तीच्या भाषेवर, संस्कृती-परंपरा-पोशाख यावर हसण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही हे कदाचित रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे यांना माहीत नसावं.
रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे या दोघंही खासदार महाराष्ट्रातील राजकारणाचा वारसा लाभलेल्या मोठ्या घराण्यातून येतात, त्यांच्याकडून असं वर्तन महाराष्ट्राच्या राजकारणाला अपेक्षित नाही.एकतर राजकारणात तश्याही अत्यल्प प्रमाणात महिला आहेत, त्यातही महिलांना हिनवण्याचे प्रकार महिलाच करत असतील तर या मानसीकतेला काय म्हणाव?
पक्षातल्या लोकांकडूनच आपल्या अस्तित्वाची, भाषेची, परंपरांची वगैरे खिल्ली उडवली गेल्यानंतरही त्या पक्षात टिकून राहणाऱ्या बऱ्याच नेतेमंडळींना ही लाचारी झुगारून देऊन ताठ मानेने जगण्याचं बळ मिळो.
-अरहत धिवरे