मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सध्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जनतेशी संवाद आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भात कानोसा घेत आहेत. परंतु राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिला दारूबंदीसाठी अनेक मोर्चे काढत आहेत. अनेक महिलांचे संसार या दारूमुळे उध्वस्त होत आहेत. गुन्हेगारी वाढत आहे, युवकांचे नुकसान आणि प्राण जात आहेत तरीसुद्धा राज्य सरकार "महाराष्ट्रात दारूबंदी" करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलायला तयार नाही.
राज्य सरकारची "दारूची बाटली म्हणजे मृत्यूची बातमी "अशी जाहिरात अनेक ठिकाणी पाहायला मिळते परंतू हीच दारूची बाटली राज्य सरकारच्या परवानगीनेच सर्वांना देण्यात येते.
तातडीने महाराष्ट्रात दारूबंदी करावी. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात पहिल्या पाच मुद्द्यांपैकी "दारूमुक्त महाराष्ट्र" हा मुद्दा घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, यासाठी हडपसर येथे महाजनादेश यात्रेचे स्वागत उद्या सायंकाळी पाच वाजता भूमाता ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून तसेच त्यांच्या बरोबरील इतर मंत्र्यांना दारूच्या बाटल्या हातात घेऊन करण्यात येणार आहे.