पक्षनिष्ठतेचं उत्तम उदाहरण म्हणजे किंगमेकर मेधा कुलकर्णी, पुण्यातील सुशिक्षित कुटूंबामध्ये ३० ऑक्टोंबर १९६९ साली मेधा कुलकर्णी यांचा जन्म झाला. वडील डॉक्टर आणि आई शिक्षिका असल्यानं घरात शिक्षणाला प्रचंड महत्त्व होतं. माहेरी राजकारण नव्हते परंतू समाजकारणाला विशेष प्राधान्य दिलं जात होतं. वडील गोवा मुक्ती संग्रामामध्ये स्वातंत्र सैनिक असल्यामुळे कुटुंबात सामाजिक भान चांगलच जपलं जात होत. समाजाला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण त्यांच्या मदतीला जावं अशी शिकवण मेधा कुलकर्णी यांना लहानपणापासूनच मिळाली होती.
पोर्तूगीजांची सत्ता पुण्यातून घालवणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या वडिलांचा समावेश होता. त्यामुळे नेतृत्त्व करण्याची कला मेधा कुलकर्णी यांना त्यांच्या वडिलांकडूनच अवगत झाली असावी. पुढे त्यांचे पती हे आधीपासूनच भारतीय जनता पार्टीचे काम करत होते. त्यामुळे लग्नानंतर पतीसह त्याही राजकारणात सक्रिय झाल्या.
सुरवातीला त्या भाजपच्या पुणे शहराच्या महिला मोर्चा पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. २००२ साली पहिल्यांदा मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी मिळाली त्यानंतर २००२, २००७ आणि २०१२ असं तीन वेळा नगरसेवीका म्हणून निवडून आल्या आणि अशा पद्धतीनं सुरू झालेला हा त्यांचा राजकीय प्रवास आजतागायत सुरु आहे.
राजकारणात नवीन असताना मेधा कुलकर्णी यांना प्रमोद महाजन आणि अटल बिहारी वाजपेयी या नावाजलेल्या नेत्यांकडून प्रेरणा मिळाली. यासंदर्भात ‘मॅक्सवुमन’शी बोलताना त्या म्हणाल्या की, “प्रमोद महाजन यांची वकृत्त्व ऐकून मला असं वाटायचं की, असं आपल्याला वकृत्त्व करता येईल का? राजकारणात असा अभ्यास मला करता येईल का? अशी छाप पाडता येईल का? तसेच अतिशय शांत पण देशासाठी कणखर भूमीका घेणारा नेता म्हणजे अटलजी त्यांच्या सारख्या नेत्यांना पाहून मला प्रेरणा मिळाली. शामप्रसाद मुखर्जी आणि जयाजी उपाध्याय यांच्या काळात जरी मी नसले तरी त्यांची पुस्तके वाचून मला प्रेरणा मिळाली.”
राजकारणात सक्रीय झाल्यापासून मेधा कुलकर्णी यांनी महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक काम केली आहेत. यावर त्या म्हणाल्या की, “जेव्हा एखादी व्यक्ती लोकांसाठी मनापासून काम करते तेव्हा ती लोकांच्या मनापर्यंत जाऊन पोहचते आणि त्यांच्यामध्ये जे आपूलकीचं नात तयार होतं. त्याचंच नंतर मतात परिवर्तन होतं. त्यामुळे मतांसाठी वेगळं काही करावं लागत नाही.” असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या समाजसेवा करण्याच्या आणि लोकांना आपलेपणाने वागवणाऱ्या भावनेमुळे त्या पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
नुकतेच पार पडलेल्या महारष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये कोथरूड मतदारसंघ हा लक्षवेधी मतदारसंघ ठरला. राष्ट्रवादीचे आव्हान स्विकारून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले खरे. मात्र, यामुळे कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आणि त्यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. मेधा कुलकर्णी यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच स्थानिक लोकांनी बाहेरून आयात केलेला उमेदवार नको अशी पोस्टरबाजी करत चंद्रकांत पाटील यांना विरोध दर्शवला होता. परंतू मेधा कुलकर्णी यांनी बंडखोरीचा मार्ग न निवडता स्वत: पुढाकार घेऊन चंद्रकांत पाटील यांच्या प्रचाराची धूरा सांभाळली. तसेच लोकांची समजूत काढून चंद्रकांत पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं.
यासंदर्भात आपला अनुभव सांगताना कुलकर्णी म्हणाल्या की, “मी सर्वांना समजवलं की, मी जरी या निवडणूकीला उभी नसले तरी, माझे मोठे दादा उभे आहेत. जे प्रेम तुम्ही माझ्यावर व्यक्त करणार होतात. तेच प्रेम आणि तोच आशीर्वाद तुम्ही दादांना द्या असं मी लोकांना सांगितलं. लोकांनीही नंतर छान प्रतिसाद दिला. जे लोक नाराज होते त्यांची आणि दादांची भेट करून दिली. त्यांच्याशी बोलून चर्चा घडवून आणली आणि त्यांच्याकडून पाठिंबा मिळवला. वेगवेगळ्या समाजातील, वयोगटातील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या महासंघाचा मेळावा घेतला. तसंच ब्राम्हण समाजाच्या १७ संघटनांना एकत्र करुन चर्चा घडवून आणली आणि त्यांचा पाठिंबा मिळवला.” कुलकर्णी यांच्या पाठिंब्यामुळे चंद्रकांत पाटील या मतदार संघातून विजयी झाले.