मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून हालचाली सुरु होत्या, अखेर आज याची अधिकृत घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातून महिला खासदार भारती पवार यांना संधी मिळाली आहे. काही वेळापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या यादीत मुंडे यांच्या नावाची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे.
भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. भारती पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने भाजपचा उत्तर महाराष्ट्रात आणखी दबदबा वाढणार आहे. तसेच येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत सुद्धा फायदा होणार आहे.
महाराष्ट्रातून शेवटपर्यंत भारती पवार यांच्यासह प्रीतम मुंडे, हिना गावित, पुनम महाजन, या महिला खासदारांच नाव सुद्धा चर्चेत होते. त्यामुळे या चार महिला खासदारपैकी कुणाला केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
कोण आहेत भारती पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा राहिलेल्या भारती पवार यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनतर भाजपने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे त्यावेळेचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट करत, भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे भाजपमधले प्रस्थापित यांना मोठा धक्का बसला होता.