त्यांच्या हक्काच्या दुधाचं काय ?

Update: 2020-01-19 08:20 GMT

पुणे येथे दोन नवजात बालके सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. एक दिवसाचे बाळ ज्यात एक मुलगा व एक मुलगी होती ती कचरा कुंढी जवळ आढळली व नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या बालकांची योग्य ती काळजी घेत पोलिसांना बोलवले. आता ही मुलं सुरक्षीत आहेत व स्वस्थही आहेत मात्र पुढच्या निरोगी भविष्यासाठी त्यांच्या हक्काचे आईचे दुध त्यांना मिळणार नाही.

आईचच्या दुधाचा वाटा कुठल्याही बालकाच्या वाढीत महत्वाची भुमिका बजावत असतो. केवळ दुधच नाही तर बालकाची पहिली १००० दिवस हे त्याच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचे समजले जातात. जन्माला आल्यानंतर पहिल्या १००० दिवसांत मुलाच्या मेंदूची वाढ सुमारे ७५ टक्के इतकी झालेली असते. या वाढीचा वेग सुमारे ३०० टक्के इतका असतो. बाळाचा मेंदू या काळात प्रत्येक सेकंदाला एक लाख न्युरॉन इतका तयार करण्याची क्षमता बाळगून असतो. असे असतांना या बालकांच्या मेंदुची वाढ नक्की कशी होईल यावर मात्र प्रश्नचिन्ह उभे राहते. भारतात दरवर्षी सुमारे २.५ कोटी बाळांचा जन्म होतो. म्हणजे जगातील १८ टक्के मुलं भारतात जन्म घेतात.एसडीजी (SDG) मानकानुसार भारतातला २०३० पर्यंत पाच वर्षांखालील बालकांचा मृत्युदर २५ करायचा आहे.

सध्या हा दर सरासरी ३४, ग्रामीण भाग ५६, नागरी भाग ५० (NHFS-4, २०१५-१६) इतका आहे.एसडीजी (SDG) मानकानुसार भारतातलं २०३० पर्यंत मातामृत्यूचं प्रमाण ७० करायचं आहे. २०१४-१६ मध्ये हा दर १३० इतका भयानक होता. (इकनाँमिक सर्व्हे ऑफ इंडिया).अर्भक मृत्यूचं महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यातील प्रमाण ग्रामीण भागात १७ तर नागरी भाग ९ इतकं आहे. (२०१७).आहारातून पूर्ण पोषण मिळणाऱ्या, तसंच दूधावर असणाऱ्या ६ ते २३ महिन्यापर्यंतच्या मुलांचं प्रमाण भारतात अवघं ८.७ टक्के आहे. (NHFS-4, २०१५-१६). हि आकडेवारी आपल्याला बरच काही सांगुन जाते. भारतातील १० टक्क्यांपेक्षाही कमी मुलांना पहिल्या १००० दिवसांत पूर्ण पोषण मिळतं. याचाच अर्थ असा आहे की, भारतातील अनेक लहान मुलं ही डायरिया, इतर संसर्गजन्य आजार, यामुळे पाच वर्षं पूर्ण व्हायच्या आधीच दगावतात. याचा दुसरा अर्थ असाही आहे की, कित्येक कुपोषित मुलांच्या आयाच बाळंतपणात दुर्दैवीरीत्या मृत्यूमुखी पडतात. आई नसलेल्या मुलांची मातेच्या अंगावरचं दूध मिळण्याची शक्यता संपते.

हि आकडेवारी खरी ठरवणा-या घटना आपल्या आसपासच घडत असतात. पुण्यात सापडलेल्या नवजात बालकांच्या आईची काय स्थिती काय होती , ती जिवंत आहे की दगावली हेही माहिती झाले नाही. अशा नवजात बालकांना आईच्या दुधा पासुन वंचितच रहावे लागते. काहिवेळा मात्र काही घटना अचंबित करुन जातात , कचरा कुंडीत सापडलेल्या एका तान्ह्या बाळाला कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकाने मातृत्वाचे कर्तव्य निभावत व माणुसकीचे दर्शन घडवत स्तनपान करत त्याचा जीव वाचवला होता. ही घटना मागिलवर्षी मध्य प्रदेशमध्ये घडली होती. अनिला पराशर असे नाव असलेल्या या पोलिस उपनिरीक्षक महिलेचा तिच्या कर्तृत्वाबद्दल आदर्श व्यक्तिमत्व पुरस्काराने गौरव करण्यात आला.मध्य प्रदेश पोलिस विभागातून हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या एकमेव पोलिस महिला आहेत.

पराशर यांनी सांगितले की, “माझी किशनगंज येथील पोलिस ठाण्यात उप निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

२ ऑगस्ट २०१८ रोजी मला पोलिसांचा मदत क्रमांक असलेल्या १०० नंबरवर फोन आला व कचरा कुंडीत एक बाळ आढळून आले असल्याचे सांगण्यात आले. यानंतर मी तातडीने संबंधित ठिकाणी पोहचले व त्या बाळाला उचलले. ते केवळ दोन दिवसांचं बाळ होतं, भुकेने व्याकुळ झालेल्या त्या बाळाचा घसा रडून रडून लाल झाला होता. मी त्याला अगोदर थेट रूग्णालयात घेऊन गेले, मात्र तरी देखील त्याच रडणं सुरूच होत. अखेरीस मला न राहवल्याने मी त्याला स्तनपान करणं सुरू केलं, त्यानंतर आलेल्या डॉक्टरांनी देखील त्याला स्तनपानाची अत्यंत गरज होती, नसता त्याचा भुकेने बळी गेला असता असे सांगितले.” त्या बालकाला आईचे दुध मिळाले मात्र पुण्यातील बालकांच्या वाट्याला असा कुठलाही चमत्कार आला नाही. बालकाच्या वाढीसाठी पहिले १००० दिवस कितीही महत्वाचे असले तरी त्यावर फारसे कोणाचे लक्ष जात नसल्याचे रोजच्या जीवनात दिसते.यासाठी बिडच्या लंकाबाईचेही उदाहरण समोर आहे.

२२ मुलांना जन्म देणारी म्हणुन सर्वच मिडीयात तिला प्रसिध्दी मीळाली मात्र सर्व वैद्यकीय उपचार देण्यास तयार असलेल्या आरोग्य यंत्रणेच्या हातावर तुरी देत लंकाबाई पोटाची खळगी भरण्यास उसतोड कामगार म्हणुन कर्नाटकात गेल्या मात्र जातांना ट्रक्टरवर त्याना मोठ्या प्रमाणावर धक्के बसले व त्यातच त्यांची प्रस्तुती झाली व त्यांचे मुल दगावले. बालकांच्या हक्काबद्दल बोलतांना त्यांच्या वाढीसाठी आवशक असलेल्या आईच्या दुधाबद्दल फारस कोणी बोलत नाहीये. त्यांच्या हक्काच्या दुधाच काय हा प्रश्न अजुनही तसाच राहणार आहे.

-प्रियदर्शिनी हिंगे

Similar News