रश्मी ठाकरे या दैनिक 'सामना' च्या संपादक झाल्या... दिवसातील मला सर्वात जास्त भावलेली ही बातमी. मी काही शिवसेनीची कार्यकर्ती किंवा पदाधिकारी नाही त्यामुळे ठाकरे परिवारावर स्तुतीसुमने उधळून मला काही पदरात पाडून घेण्याची सुतराम शक्यता या निमीत्ताने नक्कीच नाही. हे सांगण्याचे कारण परत या विषयावर तुम्हांला का रश्मिंचा पुळका वगैरे अशा भिकार कॉमेंटस चे धनी व्हावे लागेल म्हणून हा अप्रस्तुत खुलासा...
त्यांच्या या नव्या इनिंगकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहीले जातेय, एक तर राजकारणात जशी "झेरॉक्स "ही संकल्पना असते तस घरातलं कोणीतरी त्या पदावर हवं किंवा उद्धव जी तरी कुठे संपादकीय लिहीत होते त्या मुळे रश्मी ताई तरी काय विशेष करणार आहेत? वगैरे वगैरे...
मी एका राजकिय परिवारातच लहानाची मोठी झालेय त्यामुळे या घटनेकडे मी नक्कीच एका वेगळ्या कोनातून पाहू शकते. माझ्या लहानपणी राजकीय घराण्यातील महिलांचं एकच काम मी अगदी जवळून पाहीलय ते म्हणजे अगदी दूपारी भर जेवणाच्या वेळी कल्पना न देता घरात आणलेल्या डझनभर कार्यकर्त्यांना भाकरी थापून जेऊ घालणे, ती दिवस रात्र रटरटणारी चूल पूढे कित्येक वर्ष मला अस्वस्थ करीत राहीली असो या व्यतिरीक्त घरातील महिलांचे दूसरे काम म्हणजे महाशिवरात्र किंवा भूमिपूजन, उद्घाटने अशा प्रसंगी ठेवणीतल्या इंदोरी/चंदेरी साड्या नेसून धार्मिक विधींमध्ये सहभाग नोंदविणे व उरलेला वेळ शेताकडे लक्ष ठेवणे.
मी थोडीशी मोठी झाल्या नंतर मग सहकारी तत्वावर पापड, लोणची,तिखट अशा संस्था आणी जोडीला महिलांनी चालविलेले स्टोअर्स आले. मला आठवतय वारणा पापड आणी त्याच धर्तीवर अकलूजची गौरीशंकर महिला उद्योग संस्था,मग या संस्थेच्या निमीत्ताने दौरे , घरचे मसाले, घरात चालणाऱ्या बायकांच्या मिटींग्ज, पापडांचे लाटे आणी बरच काही. या सगळ्याला जोड म्हणून गाई, कोंबड्या, शेळ्या... सगळं काही त्या बायका लिलया पेलायच्या. पूढे मग शाळा, महाविद्यालय संभाळणे ,दूध संघ,पोल्ट्री फार्म संभाळणे ही additional कामे त्या करायला लागल्या पण महिला संस्था वगळता कोणत्या संस्थेचा अध्यक्ष होणे वगैरे उदाहरणे विरळच...
राजकारणात देखील मला आठवतात अशी शालिनीताई, प्रमिला ताई अशी मोजकीच उदाहरणे पुढे पुढे कारखान्याच्या डायरेक्टर बोर्डावर प्रतिनिधित्व द्यावे लागते म्हणून एखादी महिला असायची पण ती चूकूनदेखील कारखान्याकडे फिरकायचीच नाही.
महिला आरक्षण आले आणि मग नाईलाजाने वहिणींसाहेब, ताई साहेब, आक्का साहेब सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालय, या सोबतच राजकीय क्षेत्रात दिसू लागल्या आणि आपल्या कामाचा ठसा उमटवू लागल्या. हळूहळू तात्पुरती राजकीय सोय म्हणून आणी नंतर नंतर कायम स्वरूपी राजकारण हाताळू लागल्या. हे मी फक्त राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरातील महिलांबद्दलच बोलतेय. ज्यांना ही पार्श्वभूमी लाभली नाही पण त्यांनाही राजकारणात भरीव आणी ठोस काम करायचय त्यांची वाट अजूनही कशी बिकट आहे आणी ती का वहिवाट होत नाही त्याबद्दल पुढे कधीतरी विस्ताराने...
असो तर राजकारणात असलेल्या पूढारी घराण्यातील महिलांचे काळानुसारचे हे स्थित्यंतर, यामध्ये एक गोष्ट कॉमन ती म्हणजे ती आपल्या घराण्याचा लौकिक जपण्याचा कटाक्षाने प्रयत्न करीत राहीली.
आज ठाकरे घराण्यातील एक नाव जे गेल्या दशकापासून एक सुंदर, प्रभावी, हसरे व्यक्तीमत्व, कुटुंबातील सर्वांच्या सोबतचा एक आश्वासक,खंबीर असा सगळीकडे आहे पण कुठेच नाही असं काहीतरी वाटायला लावणारा लोभस चेहरा, आज एका वेगळ्या क्षेत्रात एक आवश्यक जबाबदारी पेलण्यासाठी घरचा चेहरा म्हणून उतरतोय. कारण काहीही असो पण मला वाटतय त्या या माध्यमातून व्यक्त होतील त्या या ही संधीच सोन करतील आणी एक या क्षेत्रात भरीव काम करणारा संपादक म्हणून त्या ओळखल्या जातील या अपेक्षांसह त्यांना हार्दिक शुभेच्छा.
- डॉ. हेमलता पाटील