प्रसूतीकाळात रजा मिळण्यासाठी प्रथमच आवाज उठवणारी रणरागिणी

गरोदर महिलांना हल्ली प्रसूती काळात सहज भरपगारी सुट्टी मिळून जाते. या सुट्टयांसाठी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अभरच मानतो. पण ज्या महिलमुळे या सुट्ट्या दृष्टिपथात आल्या त्याच महिलेची ही गोष्ट जाणून घ्यायची असेल तर वाचा धनंजय देशपांडे यांचा हा लेख....;

Update: 2022-07-16 07:35 GMT

भारताच्या इतिहासाच्या पुस्तकात अशी अनेक पाने आहेत जी इतक्या वर्षानंतर अद्यापही आपल्या पिढीने वाचलीच नाहीत. आणि वाचलीच नाहीत त्यामुळे माहितीच नाही आणि आपल्यालाच माहित नाही तर पुढच्या पिढीपर्यंत ते पोचणार कसे ?

याच विचारातून हि नवीन मालिका मी सुरु करतोय !


"अप्रकाशित पण अतुलनीय सत्यकथा"

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात एक अशी रणरागिणी महिला होऊन गेली, जिने सन 1942 मध्येच महिलांना त्यांच्या प्रसूतीकाळात रजा मिळालीच पाहिजे यासाठी आवाज उठवला आणि इतकचं नव्हे तर महिलांकडे "अनपेड लेबर" म्हणून पाहिले जाते त्यावर देखील कडाडून विरोध करत त्या प्रकारचा ठरावंच त्या काळी मांडून क्रांतीची बीजे रोवली.

यथावकाश त्यांचा तो अहवाल स्वातंत्र्यानंतर भारतीय घटनेने स्वीकारला आणि तसे कायदे केले गेले. ज्याचा लाभ आजवर सर्व त्या गर्भवती महिलांना मिळतो आहे.



 


तर त्या रणरागिणीचे नाव आहे....

कमलादेवी चटोपाध्याय

कमलादेवी यांचे स्वातंत्र्य संग्रामात देखील मोलाचे योगदान आहे. एका ब्रिटिश पत्रकाराने त्यांच्याबद्दल म्हटलं होत की, कमलादेवीची बौद्धिक उंची, त्यांची विचार करण्याची पद्धत आणि दूरदृष्टी हि महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या इतकीच तोलामोलाची होती.

या एकाच वाक्यात कमलादेवी म्हणजे किती थोर होत्या हे कळत.

जातीपाती मोडल्या पाहिजेत इथपासून ते कलाकाराना योग्य वेळी संधी मिळण्यासाठी चांगले थिएटर्स उपलब्ध करून दिले पाहिजेत इथपर्यंत सर्वव्यापी त्यांचे विचार होते. इतकं सगळं असूनही इतिहासाच्या पानात यांचे नाव, याची कारकीर्द कुठं हरवली कुणास ठाऊक ? फारच मोजक्या लोकांना त्यांच्याबद्दल माहित असावी. असो !

कमलादेवी यांचा आणखी एक क्रांतिकारी माईलस्टोन सांगतो.

या त्याच रणरागिणी होत्या, ज्यांनी "सत्याग्रहात महिलांनाही सहभागी करून घेतलेच पाहिजे" असा ठाम आग्रह खुद्द महात्मा गांधींकडे धरला होता आणि तो पूर्णही करून घेतला आणि त्यामुळेच हजारो महिलांना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन भारतमातेची जणू सेवा करण्याची संधी मिळाली.

देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यत त्या स्वतःही सतत सत्याग्रहात सहभागी होत्या. त्यामुळेच ब्रिटिशांनी कैकवेळा त्यांना तुरुंगात टाकले होते.


सन 1928 मध्ये कमलादेवी ऑल इंडिया कांग्रेस कमिटीवर निवडून आल्या. आणि 1936 मध्ये कांग्रेस सोशलिस्ट पार्टीच्या थेट अध्यक्षही झाल्या. त्यानंतर 1942 मध्ये अखिल भारतीय महिला संमेलनाच्या देखील त्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या. आणि त्याच संमेलनात त्यांनी "प्रसूतीकाळात महिलांना रजा मिळालीच पाहिजे." हा ठराव मांडून तो मंजूरही करून घेतला !


सत्यकथा इथं संपलीय.

डीडी क्लास : महिला मंडळीनो, आता मनापासून सांगा की, खरंच हे तुम्हाला माहित होत का ? की तुमच्या प्रसूतीकाळात तुमची रजा हि "पेड" कुणामुळे झाली ? माहित नसेल तरी हरकत नाही. पण आता माहित झालं न ? तेही पुरेसं आहे. आपल्या जीवनात महत्वाचा असा काही उपयुक्त बदल घडवून आणणाऱ्या आपल्या या पूर्वजांना म्हणूनच कृतज्ञ राहून वंदन करूया ! तितकही पुरेसं आहे. सतत असं काहीतरी विस्मृतीत गेलेलं शोधत बसणे हा माझ्या आवडीचा प्रांत आहे. त्यातून जे असं अनोखं हाती येतं ते तुमच्यासमोर ठेवत असतो. सोशल मीडिया खऱ्या अर्थाने त्यासाठीच आहे न ?

© धनंजय देशपांडे

Tags:    

Similar News