आईचं एक खोटं, ज्याने मुलाचं आयुष्य बदलून टाकलं...
आई प्रत्येकाच्या आयुष्यातील एक एकमेवाद्वितीय कप्पा असतो. या कप्प्यात आईच्या आठवणी व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत तशाच ताज्या टवटवीत राहतात. आई आपल्या पिल्लांसाठी जे करते ते सगळ योग्यच असत असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आम्ही असं का म्हणतोय ते आपल्याला धनंजय देशपांडे यांचा हा लेख वाचल्यावर लक्षात येईल. आईचं एक खोटं तिच्या मुलाचं आयुष्य कस बदलून टाकत जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख....;
एका गावात काशीबाई नावाची एक विधवा आई त्याच्या दहा बारा वर्षाच्या मुलासह राहात असते. पती निधनानंतर चार घरची धुणी भांडी करणे, कपडे शिवून देणे अशा प्रकारे तिने कष्ट उपसून मुलाचे शिक्षण सुरू ठेवलेले असते. मुलगाही नियमित शाळेत जात असतो. अर्थात तो थोडासा विसराळू, लाजरा बुजरा व जरा वेगळाच असतो. वर्गावर असताना तो कायम गुमसुम बसलेला असायचा.
एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर त्याने एक लिफाफा आईच्या हाती ठेवला आणि म्हणाला, "आई, हेडमास्तरांनी हे पत्र दिलंय तुझ्यासाठी."
आईने ते पाकीट उघडून पत्र वाचले. मुलाने अधीरतेने विचारले, "काय लिहिलंय ग आई त्यात?"
आई हसून म्हणाली, "बेटा, यात लिहिलंय की, तुमचा मुलगा खूप वेगळा आणि हुशार आहे. मात्र त्या लेव्हलचे शिकवण्यासाठी आमच्याकडे शिक्षक नाहीयेत. तरी कृपया तुमच्या मुलाला उद्यापासून आमच्या शाळेत पाठवूं नका ! त्याला दुसऱ्या शाळेत घालावे"
*
हे ऐकून मुलाला थोडे वाईट वाटले की आता आपले जुने मित्र भेटणार नाहीत, पण आनंद देखील झाला की "आपण" कोणीतरी खास आहोत याचा !! आईने त्याला नंतर दुसऱ्या शाळेत घातले. दिवस झपाट्याने सरत होते. त्या नवीन शाळेत मुलगा लवकर रुळला. खूप नेटाने अभ्यास करून तो नंतर त्याच शाळेच्या कॉलेजात गेला. तिथेही चिकाटीने शिकत राहिला. कारण त्याच्या मनात पूर्वीच्या हेडमास्तरने सांगितलेले एकच वाक्य घोळत राहायचे. "तुमचा मुलगा खूप वेगळा आहे,"
मुलगा त्याच भावनेतून जिद्दीने शिकून पुढे स्पर्धा परीक्षेला बसला. त्यात पास होऊन चक्क तो कलेक्टर झाला. तोवर इकडे गावी त्याची आई म्हातारी झाली होती. सतत आजारी असायची. आणि अचानक एकेदिवशी तिने शेवटचा श्वास घेतला. मुलगा त्यावेळी शहरात होता. त्याला हे कळल्यावर घाईघाईने तो गावी आला. दुःख अनावर झालेले, इतरांनी त्याचे कसेबसे सांत्वन केले. आईचे अंत्यविधी करून घरी परत आल्यावर सहज मुलाचे लक्ष एका कपाटाकडे गेले. उघडून पाहिले तर त्यात आईच्या बऱ्याच गोष्टी होत्या. त्यातच एक डायरी होती. त्याने ती उचलून काही पाने चाळली. तर त्यात 15 वर्षांपूर्वी जुन्या शाळेच्या हेडमास्तराने लिहिलेले "ते" पत्र घडी घालून ठेवलेले दिसले. मुलाने ते वाचायला सुरुवात केली.
"आदरणीय श्रीमती काशीबाई, कळवण्यास दुःख होत आहे की, तुमच्या मुलाचे अभ्यासात अजिबात लक्ष नाही. खेळ, स्नेहसंमेलन यातही तो भाग घेत नाही. वयाच्या मानाने त्याची बुद्धी विकसित झालेली नाहीये, तरी कृपया त्याला आमच्या शाळेतून काढून मंद बुद्धीच्या विद्यार्थ्यासाठी असलेल्या शाळेत त्याला टाकावे"
**
पत्र वाचता वाचता मुलाच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रुनी त्या पत्रावरची अक्षरे धूसर होत होती !!
***
(वाचकांनो अर्धा मिनिट ब्रेक घ्या,. डोळे बंद करून वरील गोष्टीचा चित्रपट रिवाइंड करा मग पुढचे वाचा"
*******
डीडी क्लास : मुलामध्ये वैगुण्य असते ते जगाच्या रितीरिवाजात. पण आईच्या दृष्टीने तिचे मुल कधीच मंद नसते. आणि जरी मंद असले तरी ती त्याच्यात ऊर्जा निर्माण करून त्याचे आयुष्य घडवते. म्हणून आई "ग्रेट"च असते.
ज्यांची आई सोबत आहे त्यांनी तिला जपावे, ज्यांची नाहीये त्यांनी तिचे संस्कार आठवून ते प्रत्यक्षात जगावे.
त्यातच खरे मातृप्रेम आहे !!
लेखक
धनंजय देशपांडे