मासिक पाळी दर महिन्यातले ते चार दिवस स्त्रीसाठी त्रासाचे, आव्हानाचे असतात. मासिक पाळी येणं हे स्त्रीचं शरीर मातृत्वासाठी तयार करण्याची प्रक्रीया असते. मात्र या सृजनाच्या आविष्काराला आपल्या समाजाचा एक मोठा भाग तिरस्काराच्या, घृणास्पद नजरेनं बघतो. विटाळ ... या काळात स्वयंपाक करायचा नाही, देवळात जायचं नाही, देवपूजा करायची नाही, तुळशीला पाणी घालायचं नाही, लोणच्याला हात लावायचा नाही, पाणी भरायचं नाही, पापड करायचे नाहीत. यातून स्त्रीच्या रजस्वला अपवित्र्याचा शिक्का मारला जातो. तो तिच्या मनावर आघात असतो, अगदी दर महिन्याला... कुटुंब सुशिक्षित असले तरीही मासिक पाळी संदर्भात अज्ञान आणि अंधश्रद्धा आहे.
काहीवेळा मुलींमध्ये पिरियडबद्दल जागृती असते तरी कुटुंबाच्या दबावाखाली सगळं सहन करावं लागतं. घरात धार्मिक वातावरण असेल तर शिवताशिव अधिक पाळली जाते. या वर्तवणुकीने वयात येणाऱ्या मुलींना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे त्यांना मासिक पाळीबद्दल घृणा वाटू लागते. वयात येणाऱ्या मुलींच्या प्रश्नावर अनेक स्त्रीवादी लेखिका आणि लेखक वृत्तपत्र व सोशल मीडियातून लिहितात. परंतु ज्यांच्यासाठी हे लिखाण आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. भारतीय माणसाने ज्ञान-विज्ञानामध्ये प्रगती केली. पण सोयीची. उपभोग्य वस्तूचा वापर करण्यासाठीच. विचार अजूनही बुरसटलेले आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने आहेत. परंतु तरीही त्यांना दुय्यमतेची वागणूक मिळते.
यासंदर्भात मुख्य प्रवाहात काम करणाऱ्या मुलींचे अनुभव...
लेखिका मोनिका चौघुले सांगतात, "अवघ्या 'अकराव्या' वर्षी पिरियड आले. त्यावेळी पिरियड म्हणजे काय हे काहीच माहिती नव्हतं. लहानपणी मावशीच्या मुलीला पाळी आल्याचं घरात एकदा ऐकलं होत. त्यावेळी 'पाळी म्हणजे काय ?' असं विचारल्यावर 'मोठी झाल्यावर कळेल' असं सांगितलं. पहिल्यांदा पिरियड आले तेव्हा खूप त्रास झाला. रडत आईला सांगितलं. 'काही होत नसतं. चार दिवस दुखलं.' असं दुखायला लागल्यावर मेडिसिन घ्यायचं नाहीत. नंतर चांगलं नसतं हे सांगितलं गेलं. माझ्यासाठी ते चार दिवस खूपच भयंकर होते. घरात कुठेच स्पर्श करायचा नाही, स्वयंपाक घरात जायचं नाही, वेगळं जेवण, वेगळं झोपायचं, खेळायचं नाही, असं बरंच काही नियम होते. टीव्हीवर सॅनिटरी पॅडची जाहिरात लागली की चॅनल बदलला जायचा. या चार दिवसात 'कोणतंही काम नव्हतं.' मात्र काही दिवसांनी धुणं-भांडी या सारखी वरची काम करावी लागत. या साऱ्या गोष्टी खूप वीट यायचा. शारीरिक त्रास होताच पण मानसिक त्रासही होयचा. इतरांना दिसत नव्हता आणि सांगायची सोय नव्हती. तेव्हा वाटायचं उगाच मुलगी झाले. मुलगा असते तर बरं झालं असत. एकदा देवाला प्रार्थना देखील केली होती तशी. कॉलेजमध्ये गेल्यावर समजत गेलं आणि सवय होत गेली. वयात येतानाचे अनुभव वाईट असले तरी आता सारं किरकोळ वाटतं.
याबद्दल तरुण पत्रकार गौरी सांगतात, 'मी आठवीला असताना पहिल्यांदा पिरियड आले. त्यावेळी वर्गातचं होते. मुलींना माहीत झालं होतं पण मुलांना माहीत झालं तर चेष्टेचा विषय होईल म्हणून खूप घाबरले होते. यापूर्वी 'पाळी' एवढंच नाव माहीत होतं. पिरियडबद्दल ना कधी आईने सांगितले, ना वर्गात. पिरियड काळात पोटात खुप दुखायचे. आईला सांगितले तर काहीतरी कारण सांगून चार दिवस लोटायची. कदाचित तिलाही पाळीबद्दल सविस्तर माहिती नसावी. प्रत्येक वेळी त्रास व्हायचा. त्यावेळी मी एकटीच रडत बसायचे. मैत्रिणीत चर्चा व्हायच्या पण त्याही ऐकीव माहितीवर होत्या. कॉलेजला जाईपर्यंत पिरियडबद्दल काहीच माहिती नव्हती. नंतर माहिती मिळत गेली पण तोपर्यंत सगळं अंगवळणी पडलं होतं.'
पत्रकार भारती गुंड सांगतात, "मोठ्या बहिणींसोबत टीव्ही पाहत होते तेव्हा 'विस्पर'ची जाहिरात लागली होती. ती जाहिरात समजत नव्हती. आणि कोणाला विचारायची हिंमत नव्हती. एकदा त्याबद्दल मोठ्या बहिणीला विचारलं, 'ही जाहिरात कशाची आहे ?' त्यावर ती म्हणाली, 'तुला काय करायचंय त्याच ? पुन्हा असले प्रश्न विचारायचे नाहीत. तू अजुन लहान आहेस.' त्यानंतर पिरियड येईपर्यंत माझ्यासाठी 'विस्पर' म्हणजे एक रहस्य बनलं होतं. नववीत असताना पहिल्यांदा पिरियड आले. त्या दिवशी माझी चित्रकलेची परीक्षा होती. आणि मी घाईमध्ये आवरून सायकलवर निघाले होते. काहीवेळात माझी पॅन्ट रक्ताने माखलेली दिसली. काही समजेना, कुठेच काही लागलेलं नव्हतं आणि हे रक्त कसं काय ? मी खूप घाबरले. तशीच घरी आले आणि आईला मिठी मारून रडले. आईला पॅन्टवरील रक्ताचे डाग दाखवले. त्यावेळी तिने पिरियडबद्दल समजावून सांगितले. परंतु त्यानंतर खूप दिवस पिरियडबद्दल खूप घृणा वाटायची. घरात सणावाराला शिवताशिव पाळली जाते. पाठ्यपुस्तकांमधून आणि वूमन डेव्हलपमेंट प्रोग्राममधून पिरियडबद्दल माहिती मिळाली. तेव्हा समजलं की, मासिक पाळी शिवाय स्त्री परिपूर्ण नाही."
ऍड श्वेता (नाव बदललं आहे.) सांगतात, "मी आठवीला नगरला शिकायला आले. त्यावेळी आमच्या शाळेत आठवी ते दहावीच्या वर्गातील मुलांना आणि मुलींना 'वयात येताना' या विषयावर वेगवेगळे लेक्चर होते. त्यामध्ये शारीरिक बदल, पिरियड, विरुद्ध लिंगी व्यक्तीचे आकर्षण या विषयी मार्गदर्शन होते. यावेळी सांगितले की, 'याविषयी चर्चा करायची नाही. जेव्हा गरज लागेल तेव्हा छोटी बहीण किंवा स्वतःसाठी उपयोग करायचा.' आई शिक्षिका होती. तिची कडक शिस्त होती. एकदा दिवाळीच्या दिवशी पिरियड आले होते. तेव्हा तिने मला दुसऱ्या रूममध्ये थांबायला सांगितले. कारण पूजा राहिली होती. त्यामुळे कशाला हात लावू नको म्हणून तिने बजावले होते. झाडू देताना मी अस्पृश्य असल्यासारखी वागणूक दिली. मला खूप वाईट वाटले. त्यावेळी मी दहावीला होते. लक्ष्मीला (देवी) पिरियड आले नसतील का ? ती पण एक स्त्रीचं आहे ना ? असे विचार माझ्या मनात नेहमी यायचे."
प्रा. शितल (नाव बदललं आहे.) सांगतात, "आमच्या शाळेत आठवी ते दहावी अशी तीन वर्षे 'वयात येताना' या विषयावर मार्गदर्शन झाले होते. त्यामुळे पिरियडबद्दल माहिती होती. माझ्या सर्व मैत्रिणींना पिरियड आले होते. कॉलेजला गेले तरी मला पिरियड आले नव्हते. त्यामुळे घरचे घाबरले होते. शेजारच्या आणि नातेवाईक महिला आईला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देत. पण आई समजदार होती. बारावीच्या परीक्षा काळात पिरियड आले होते. त्यावेळी आईने सर्व नातेवाईक आणि शेजारी मुलगी शहाणी झाल्याचे उत्साहात सांगितले. घरात धार्मिक वातावरण असल्याने शिवताशिव पाळली जाते. त्याच्याही भावना दुखवायच्या नको म्हणून सर्व पाळावं लागतं."
स्त्री स्वातंत्र्याची आणि शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली. शेकडो वर्षे उपेक्षित असलेल्या वर्गाला सन्मान मिळावा या उद्देशाने. परंतु समाजात चुकीचे रीतिरिवाज अजूनही जिंवत आहेत. यामध्ये अन्याय होतो तो 'स्त्री'वर. पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या दबावाखाली तिचा आवाज अजूनही दबला जातो. कुटुंब सुशिक्षित असले तरीही मासिक पाळी संदर्भात अज्ञान आणि अंधश्रद्धा आहे. काहीवेळा मुलींमध्ये पिरियडबद्दल जागृती असली तरी कुटुंबाच्या दबावाखाली तिला सहन करावं लागतं. घरात धार्मिक वातावरण असेल तर शिवताशिव अधिक पाळली जाते. सबरीमला, शनिशिंगणापूर, हाजीआली दर्गा याठिकाणी महिलांच्या प्रवेशासाठी आंदोलन झालं. महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध करणारे संस्कृती, धर्म रक्षक रस्त्यावर आले.
यातून महिलांना किती अस्पृश्य समजले जाते हे दिसून येतं. विज्ञानाने प्रगती साधली असली तरी विचाराने समाज अंधारात चाचपडत आहे. हा फक्त एका मंदिराचा प्रश्न नाही तर देशातील लाखो मंदिरात आज महिलांना प्रवेश नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजी यांनी अस्पृश्य समाजाला मंदिर प्रवेश मिळवून दिला. मात्र समाजातील ५०% लोकसंख्या असलेल्या वर्गाला आजही अस्पृश्याची वागणूक मिळते. त्यांच्या स्पर्शाने देवाला बाट होतो. संविधानाने सर्वांना समान हक्क आणि स्वातंत्र्य दिले आहे. अशावेळी महिलांना मंदिर प्रवेशासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावन्याची वेळ येणं लाजिरवाणी बाब आहे. सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु केवळ मतासाठी पुरुषसत्ताक व्यवस्थेचं लांगुलचालन केलं जातं, तेव्हा न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी ?
-प्रशांत शिंदे