आयुष्यात आपलं पुस्तक प्रकाशित होईल, असा कधीही विचार केला नव्हता. पण हे खरं झालंय, राज्यातल्या खमक्या सरपंचताईंमुळे.. लोकसत्ता चतुरंग पुरवणीत 2019 मध्ये महिला सरपंचांवर माझं 10 महिने सदर सुरू होतं. त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला.
महिला आरक्षणाला आता 26 वर्ष झालीत. या काळात महिला नेतृत्वात झालेला बदल टिपण्याचा प्रयत्न मी केला. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या सरपंचताईंनी गावाला एकत्र आणून गावातील कामांचा क्रम कौशल्यानं बदलला. प्रत्येक गोष्ट कशा शिकल्या. भ्रष्टाचार आणि दारूला मूठमाती देताना, त्यांना कोणत्या संकटांना सामोरं जायला लागलं. निरक्षर ते उच्चशिक्षित, प्रत्येकीच्या समोरची आव्हानं वेगळी होती.
या सर्व सरपंच महिला आहेत, हीच त्यांच्यातली सामायिक बाब.. लेखाची दखल घेत नाशिकमध्ये डोंगराच्या कुशीतल्या दहेगावकरता रस्ता मंजूर होऊन कामं सुरू झालं. रस्ता नसल्यामुळं चौथीनंतर विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबत होतं. सदर संपल्यानंतरही या सर्व सरपंचताई आणि मी नेहमी संपर्कात आहोत. या सर्व गावांमध्ये आज मला आपुलकीचं घर आहे एवढं मी निश्चित सांगू शकते.
हे ही वाचा
12 तासात मुंबईत कुठे किती पावसाची नोंद वाचा एका क्लिकवर
RSCD आणि NCAS ने हे लेख संकलित करून त्याचं पुस्तक तयार केलं, ‘महिला सरपंचाच्या धैर्यगाथा’. आज वरिष्ठ पत्रकार आणि राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते ऑनलाईन एकत्र येऊन या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकातली प्रत्येक सरपंचताई गावगाड्यातल्या प्रत्येक महिलेला प्रेरणा देणारी आहे. हे पुस्तक वाचून आणखीही महिला राजकारणात पुढे येतील अशी आशा आहे.
भीम रासकर सर, RSCD टीम, मराआंच्या सर्व कार्यकर्त्या, NCAS च्या जोहाना लोखंडे आणि चतुरंगच्या आरती कदम यासर्वांचे खूप आभार...
- साधना तिप्पन्नाकाजे