वाटा वाटा वाटा ग,
चालीन तितक्या वाटा ग!
ह्या गाण्याच्या ओळी स्त्री शक्तीच प्रतीक असणार्या महिलांना अगदी साजेस आहे. आज स्त्री जिकडे पाउल टाकते तिकडे ती यशाचं शिखर गाठते. प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे.ह्या म्हणीप्रमाणे आजची स्त्री स्वतःला सिद्ध करत असते. अगदी अवकाशातून तर जगातील सर्व कानाकोपर्या पर्यंत स्त्रियांची कीर्ती पसरली आहे. पिढ्यानपिढ्या आपण ऐकत आलो स्त्रियांनी एकटे घराबाहेर जाऊ नये. स्त्रीचा जन्म चूल आणि मूल सांभाळण्यासाठी असतो. स्त्रीने बुरख्यात राहिले पाहीजे. स्त्री कशी सात पडद्याच्या आतच बरी हे सगळे ऐकून ऐकून स्त्रियांचे कान पिकले आणि त्या स्त्रियांनी सगळे कौटुंबिक सामाजिक पडदे तोडून चक्क नाट्यगृहा पर्यन्त पोहोचल्या.आणि रंगमंचावर आपले कला प्रदर्शन मोठ्या आत्मविश्वासाने सादर करून संपूर्ण देशात यशाचा झेंडा रोवला.
आज मराठी रंगभूमी स्त्रियांच्या कलाकौशल्यामुळे जीवंत आहे. अगदी पिढ्यानपिढ्या स्त्रियांनी रंगभूमी क्षेत्रात बाजी मारली आहे. त्यात अनेक स्त्री कलाकारांचे नाव झळकते त्यात ज्योत्स्ना भोळे यांची कामगिरी फार मोलाची होती. ज्योत्स्ना भोळे या मराठी गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. संगीतकार केशवराव भोळे हे त्यांचे पती होते. केशवराव भोळे यांनी 1933 साली नाट्य मन्वंतर नावाची नाट्यसंस्था काढली आंधळ्यांची शाळा या त्यांच्या नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी नायिकेची भूमिका केली होती. या नाटकाचे त्या काळात शंभराच्या वर प्रयोग झाले होते. बहुसंख्य प्रयोग पुणे मुंबईत झाले होते.
आंधळ्यांची शाळा हे नाटकं जगप्रसिद्ध झाले होते. त्या वेळी ज्योत्स्ना भोळे ह्या फक्त 18 वर्षाच्या होत्या. कंठ संगीतासाठी इतर गायिका नपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्ना भोळे यांचा आवाज होता. त्यामुळे त्यांनी गायलेली नाटकातील गाणी अजरामर झाली. ज्योत्स्ना भोळे यांचे यांचे संगीत कला निधी मास्टर कृष्णराव फुलंब्री यांनी संगीत दिलेले कुलवधू हे नाटकं आणि त्यातले बोला अमृत बोला हे भैरवी रागातील गाणे फार गाजले. ज्योत्स्ना भोळे यांनी अनेक नाटके गाजविली. जसे अलंकार. आंधळ्यांची शाळा आराधना आशिर्वाद एक होता म्हातारा कुलवधू कोणे एके काळी. तुझ माझ जमेना. धाकटी आई भाग्योदय लपंडाव अश्या अनेक नाटकात त्यांनी नावलौकिक मिळविला होता. अनेक पिढ्यांपासून चालत आलेली ही रंगभूमी कालही स्त्रियांमध्ये जिवंत होती आणि आजही स्त्रियांमुळेj जिवंत आहे. स्त्रिया म्हणजे रंगभूमीचा प्राणवायूच आहे असे म्हणायला हरकत नाही.
आजच्या काळातील रंगभूमीवर गाजलेले नाव म्हणजे अमृता सुभाष गोड चेहेरा. बोलका स्वभाव असलेली तरुण पिढीतील एक प्रतिभावंत अभिनेत्री आहे. अष्टपैलू अभिनेत्री असलेली अमृता एक लेखिका..गायिका..संगीतकार देखील आहे. त्यांची अनेक नाटके प्रसिद्ध आहे.
पुण्यातील एस. पी.कॉलेज मधून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्या नॅशनल स्कूल ऑफ.ड्रामा दिल्ली येथे अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी गेल्या. सत्यजित दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अनेक नाटकामध्ये काम करायच्या आणि हीच आवड त्यांनी जोपासली. अमृता प्रशिक्षित गायिका आणि भरत नाट्यम डान्सर आहेत. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये त्यांनी अनेक नाटकात भाग घेतला होता त्यात उर्वशी राम..बेला..मेरी जान..हाउस ऑफ बरणाडा..अलबा..मृग..तृष्णा...यासारख्या नाटकामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. महाराष्ट्रात परत आल्यावर त्यांनी अनेक नाटकामध्ये काम केले. ती फुलराणी हे त्यांच गाजलेले नाटकं होते त्यातून त्यांना फार प्रसिद्धी मिळाली. पुनश्च हनिमून हे त्यांच नाटकं अप्रतिम आहे अशा अनेक नाटकामुळे त्यांनी रंगभूमी गाजविली आहे.
तसेच सुकन्या कुलकर्णी..भक्ती बर्वे..प्रिया तेंडुलकर..वंदना गुप्ते अशा अनेक कलाकारांनी रंगभूमी वर आपले नाव गाजवले. जुन्या काळात ब्युटी पार्लर नव्हते रंग रंगोटीची सोय नव्हती तरीसुद्धा स्त्रियांनी स्वताच्या हुशारीने रंगभूमीवर पाया रोवला. आणि रंगभूमी क्षेत्र टिकून ठेवले. आधुनिक काळात सर्व सुविधा उपलब्ध आहे. निरनिराळे ब्युटी पार्लर रंग रंगोटीची साधने असल्याने स्त्रियांचा उत्साह अजूनच वाढला आहे. त्यामुळे रंगभूमीवर त्या आपला अभिनय उत्तम प्रकारे सादर करू लागल्या आहेत .
निरनिराळे पात्र साकारून भूमिका कित्येक रंगवता....
रंगभूमीला कर्मभूमी बनवून इतिहास तुम्ही घडवता.........
रंगभूमी आणि स्त्रियांचे नाते संपूर्ण जगाला दाखवता.........
-लेखिका- मंगला रविंद्र शिरोळे