#सावित्रीउत्सव : जेव्हा खंबीर जोतीबा पाठिशी असतो तेव्हा जिवनातील अंधाराची भिती वाटत नाही
स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या, दगड धोंडे आणि शेणाचा मारा सहन करत,आपल्या पतीच्या आधाराने मुलींसाठी पहिली शाळा सूरू केलेल्या त्या सावित्री माईला माझे शतशः वंदन ! आज मी जे काही माझे अनुभव मांडू. इच्छिते ते केवळ या सावित्री माई मुळेच. मी आयुष्यभर संघर्ष करीत उभी राहिली. या माझ्या संघर्षशील आयुष्यात मला भेटलेला जोतिबा म्हणजेच माझा नवरा. कसलाही मानपान, दागदागिने, हुंडा या गोष्टीची अपेक्षा न ठेवता, या सगळ्याला फाटा देत मला आपली अर्धांगिनी म्हणून स्वीकारणारा माझा जीवनसाथी संजय कोष्टी हाच माझा जोतिबा आहे. सर्व सामान्य घरात वाढलेला, नोकरी करत कसंबसं शिकलेला, पण असे असूनही नेहमी माझ्या सोबत राहणारा, माझ्या विचारांचा सन्मान करणारा.
माझ्या सर्व साधारण कुटुंबात जेव्हा माझ्या मुलीच्या लग्नाचा विषय निघाला. लग्न आणि ते ही आंतर जातीय लग्न. अशा वेळी कि माझ्या घरातील वयस्कर व्यक्ती जीवन मरणाचा लढा देत असताना काय करावं ते कळत नव्हतं. कुणाला विचारायचं हा प्रश्नच होता. आर्थिक चणचण तर होतीच शिवाय मुलीचा आंतर जातीय विवाह म्हणजे माझ्या साठी सहजासहजी साध्य होणारी गोष्ट नव्हती. या अशा माझ्या दृष्टीने अडचणीच्या वेळी जसे जोतिबा फूले आपल्या पत्नीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, तसेच या वेळी माझ्या पतीने मला भक्कमपणे साथ दिली. या आंतर जातीय विवाहाला मान्यता देऊन अवघड गोष्ट सहज साध्य करून दिली. सगळ्या जगाच्या विरोधात आपल्या पतीची साथ ही फार मोठी ताकत असते.
घरात माझ्या सासूबाई आजारी असल्याने सतत हॉस्पिटल, औषधे त्यात मुलीच्या लग्नाचा विषय, पैशाची चणचण, अशा वेळी आणखी एक सावित्री जोतिबा भेटले. ते म्हणजे ज्यांना मी मार्गदर्शक मानते, अडचणीच्या वेळी धावून येणारा माझा निस्वार्थी मित्र म्हणून ज्यांच्याकडे बघते, ते म्हणजे संजय रेंदाळकर व इंद्रायणी पाटील हे पतीपत्नी. आता यांच्या बद्दल काय सांगावं. इतकंच म्हणेन जे स्वतः जवळ चांगले आहे ते दुसऱ्याला भरभरून देणारे, स्वतःचं माणूसपण जपत दुसऱ्याला माणूस म्हणून घडवणारे, शाहू, फूले, आंबेडकर, गांधीजी यांच्या प्रकाशमान वाटेचे वाटसरू होऊन स्वतः स्वयंप्रकाशीत होण्याचा निर्धार मनाशी बाळगणारे असे हे व्यक्तीमत्व. या उभयतांनी माझ्या मुलीच्या लग्नाचा सगळा भार आपल्या घरातलं लग्न आहे असे समजून स्वतःच्या खांद्यावर घेतला. आणि अखेरीस 6 जून 2018 ला माझ्या मुलीचा आंतर जातीय विवाह मोठ्या थाटात पार पडला. आज माझ्या मुलीला तिच्या आवडीचा जोडीदार मिळाला आणि ती तिच्या जोतिबा सोबत आनंदात आहे. ते केवळ संजय कोष्टी आणि संजय रेंदाळकर या मला भेटलेल्या दोन जोतिबांमूळेच. अशा जोतिंचे प्रकाशमय वलय आपल्या सभोवती असताना अंधाराची भिती वाटत नाही, अवघड वाटणारं जगणं सोपं होऊन जातं. म्हणूनच म्हणावसं वाटतं,
संकटे दाही दिशा जडली झुंजायाची नशा.... 3 जानेवारी या दिवशी मी माझ्या घरात सावित्री उत्सव साजरा करणार आहे. दारात रांगोळी, आकाशकंदील, दिव्यांची आरास आणि उंबऱ्यावर ज्ञानाची पणती. बरोबर माझ्या मैत्रिणी, शेजाऱ्यांना घेवून सावित्रीच्या विचारांच्या पुस्तकाचे सामूहिक रीत्या वाचन करून सावित्री उत्सव साजरा करणार आहे.
- उषा संजय कोष्टी