हा आमचा देश आहे, संविधानाने आम्हाला अभिव्यक्ति स्वातंत्र्य दिलं आहे. आमचं स्वातंत्र्य मान्य करून आम्हाला बरोबरिचा दर्जा दिला आहे. मानसन्मानाने जगण्याच्या आमच्या हक्काला मान्य केलेलं आहे. हे लक्षात ठेवून आम्ही आमच्या या देशात आणि मुक्त आहोत हे लक्षात ठेवून आहोत.
सारे भारतीय माझे देशबांधव आहेत... हे लक्षात ठेवून आम्ही मोकळेपणा ने वावरतो... पण मग हेच आमचे बांधव आमच्या प्रत्येक गोष्टीला टार्गेट करतात.
जणू घराच्या चार भिंतीआड़ आम्ही बंद रहावं...ते म्हणतील तसं... ते म्हणतील तेवढं आणि ते म्हणतील त्या पद्धतीने आम्ही आमचं लिहिण्या, बोलण्या.…वागण्याचं स्वातंत्र्य उपभोगावं असा ते सतत आम्हाला जमेल त्या भाषेत आणि पद्धतीने हुकुम करत असतात.
आम्ही कपड़े कसे घालावे... कसे वागावे..आम्ही कोणते शब्द उच्चारु नयेत... आम्ही किती वाजेपर्यन्त घराबाहेर असावे...कुठे जावे कुठं जाऊ नये हे सर्व ठरवण्याचा त्यांना अधिकारच आहे या गुर्मीत ते वावरत असतात...
आम्हाला ट्रोल करताना हेच आमचे बांधव आमच्या शरीराबद्दल.. चारित्र्याबद्दल गलिच्छ बोलतात.. हेतू एकच असतो...आम्ही व्यक्त होऊ नये.. त्यांनी आखून दिलेल्या चौकटी मोडू नये.. घरात बंदिस्त रहावे...घराबाहेरिल त्यांच्या जगात घुसखोरी करू नये... त्यांच्यावर वरचढ़ बनू नये...
खूप गलिच्छ भाषेत ट्रोल होत असतो आम्ही.
पण त्यावेळी एक महिला उदाहरण म्हणून ठाकते आमच्या समोर. सावित्रीमाई....जिने मुलींना शिक्षण मिळावं म्हणून शेणगोळे सहन केले...दगड सहन केले...शिव्याशाप सहन केले..ते त्याकाळातलं ट्रोलिंगच होतं....पण मुलींना शिक्षण देण्याच्या आपल्या कार्यापासून तसूभरही मागे ढळली नाही...
आज आम्ही शिकलोय...समर्थ झालोय...ते सावित्रीमाई आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळे...
आज ट्रोल्सना घाबरून माघार घेतली तर कसल्या आम्ही सावित्रीच्या मुलीं?
नाही घेणार माघार सावित्रीच्या मुलीं... ज्याच्यात हिंमत असेल त्यांनी करावं आम्हाला ट्रोल.
-छाया थोरात