कॉम्रेड अॅड. भगवानराव देशपांडे आणि उषा देशपांडे यांची प्यार वाली लव्ह स्टोरी
एक ९२ वर्षांचा तरूण आणि ८३ वर्षांची तरूणी आहे असं म्हटलं तर जरा ऐकायला विचित्र वाटतं. कॉम्रेड अॅड. भगवानराव देशपांडे आणि त्यांची पत्नी उषा देशपांडे यांची विचारांची क्षमता तल्लख आहे. आज घडीला वयाच्या ९२ व्या वर्षी मला म्हणाले की 'अगं अजून किती जगू? आता पुरे झालं.' मी म्हटलं, 'काका असं कसं? तुमच्या टेबलावर जितकं काम अद्यापही येऊन पडलंय तितकं तर तरूणांकडेही येत नाही. त्यावर माझ्याकडे पाहात खळखळून हसले.. कॉम्रेड अॅड. भगवानराव देशपांडे आणि उषा देशपांडे यांची प्यार वाली लव्ह स्टोरी यांची प्यार वाली लव्ह स्टोरी पत्रकार तृप्ती डिग्गीकर यांच्या शब्दात..
एक ९२ वर्षांचा तरूण आणि ८३ वर्षांची तरूणी आहे असं म्हटलं तर जरा ऐकायला विचित्र वाटतं. आपण वय वर्षांत मोजतो. मनाच्या जिवंतपणाच्या अंगाने विचार केला तर या वयातही अनेक जण तरूण असतात. कॉम्रेड अॅड. भगवानराव देशपांडे आणि त्यांची पत्नी उषा देशपांडे यांच्या सहवासात काही वेळ घालवला तर त्याचा प्रत्यय येईल. वयाच्या ९२ व्या वर्षी कॉम्रेड भगवानराव यांच्याकडे चिक्कार काम येते. ऐकण्याची क्षमता थोडी कमी झालीये पण जवळ बसवून घेऊन गप्पा मारतात. विचारांची क्षमता तल्लख आहे. आज घडीला वयाच्या ९२ व्या वर्षी मला म्हणाले की 'अगं अजून किती जगू? आता पुरे झालं.' मी म्हटलं, 'काका असं कसं? तुमच्या टेबलावर जितकं काम अद्यापही येऊन पडलंय तितकं तर तरूणांकडेही येत नाही. यातचं सगळं आलं. तुमच्या प्रेमाच्या माणसांना तुम्ही वृद्ध वाटत नाहीत.' त्यावर माझ्याकडे पाहात खळखळून हसले..
काहींनी पीएचडीच्या लेखनासाठी काकांकडून संदर्भ मागितले आहेत. तर काहींनी स्वतःच लिखित बाड त्यांच्या टेबलावर आणून दिलंय. निजामाच्या काळातील अनेक संदर्भ तुटक आहेत.. मार्गदर्शन करा..किंवा जे संशोधन झालंय त्यात काही फॅक्च्यूअल चूक नाही ना.. तपासून द्या.. दिग्गज लेखकानेही काकांच्या अभिप्रायासाठी खास पुस्तक पाठवलं आहे. असा हा साहित्य आणि सांस्कृतिक व्यवहार आजही सुरु आहे.
काका -काकूंना मी विचारलं की इतका संसार नेटाने करत आहात. इतकी कामं आहेत. या वयातही नात्यात एक लयबद्धता आणि आपसातील समज-उमज यात एक रिदम आहे. काय रहस्य असतो हो सहजीवनाचं?
काकांचा जन्म १९२८ चा तर काकूंचा १९३८ चा. दोघांत १० वर्षांचे अंतर. आज त्यांना पाहिलं किंवा त्यांच्या घराला पाहिलं तर जी काही इंटीग्रिटी जाणवते ते रसायन अजब आहे.
कॉम्रेड भगवानरावांचे शिक्षण गुंजोटी, गुलबर्गा आणि हैदराबादेत झालेलं. म्हणजे तसे ते आमचे गाववाले! कर्मभूमी लातूर. १९६० मध्ये लग्नाची गाठ बांधली. काकांची वकिलीची प्रॅक्टीस लातुरात बहरली. संसारही तिथंच थाटला आणि विस्तारला. या संसारात ४ अपत्यांचा जन्म झाला. कुटुंब ६ जणांचेच होतं असं नाही. काकू सांगतात की माझ्या नव-याने समाजालाच कुटुंब मानलं होतं. त्यामुळे चार लेकरांपुरतं कधीही आयुष्य राहीलं नाही. १९७२ -७४ दरम्यानचा काळ मराठवाड्यासाठी यादगार असा काळ! दुष्काळाच्या झळांनी अर्थव्यवस्था पार कोलमडली होती. लोक कासावीस झाले. या काळात काकांनी वकिलीचं कौशल्य पणाला लावलं. वाट्टेल ती मदत लोकांना केली. जवाहर सूत गिरणीचा संप याच काळात झाला. लातूरात यामुळे राजकीय वातावरण तापलं. काकांनी या संपाचं नेतृत्व केलं. काकुंना या काळातील प्रत्येक क्षण न क्षण जसाच्या तसा आजही आठवतो. हा काळ सांसारिक दृष्ट्या कसोटीचा होता. तसा तो सार्वजनिक आयुष्यातही कसोटीचाच. जिथं अनेक व्यावसायिक बेसुमार कमाई करत होते तिथं काका मात्र गरजूंसाठी उभे ठाकले. संप यशस्वी झाला. आता असा सार्वजनिक जीवनात झोकून दिलेला संसार करणेही सोपे नव्हते. पण वयाच्या या टप्प्यातही काकुंच्या चेह-यावर जे समाधान आहे ते अवर्णनीय आहे. ८३ व्या वर्षांच्या काकू सांगतात, माझ्या नव-यानं पैसा कमावला नाही. पण लोकांनी भरभरून दिलं. समाजानं सर्व पांग फेडले. ज्या समाजासाठी काका उभे राहीले त्याच लोकांनी माझ्या संसार वेलीवर बहरही दिलाय. सूतगिरणी संपात ८०० कामगारांना न्याय मिळाला. हे ८०० हात माझ्या संसाराचे आधार होते. शिवाय लातुरातील रिक्षा चालक असोत , पोलीस असोत किंवा सफाई कामगार असोत यांचं मिळालेलं भरभरून प्रेम, मदत, विश्वास हेच माझ्या संसाराचे अलंकार आहेत.
काका आणि तुमच्यात कधी वाद झाले नाहीत का, असे विचारल्यावर काकू अगदी नववधूसारख्या हसल्या. त्यांनी सांगितलं ४५ वर्षे या माणसानं प्रॅक्टिस केली. २ मुलं आणि २ मुली आज त्यांच्या आयुष्यात यशस्वी व सुखी आहेत. पैसा नाही मिळाला. पण कमीही काही पडलं नाही. ते चिडले की मी गप्प बसत असे. मी चिडले की ते गप बसतात. हा वाद शांत कऱण्याचा आमचा फॉर्म्यूला आहे. बरं काकूंचे माहेरही तसं संपन्नच होतं. त्यांचे वडील अबकारी विभागात चांगल्या पदावर. पण लग्नगाठ एका कॉम्रेडशी पडल्यावर काय होतं याची जाणीव त्यांना लवकरच झाली. पण सामाजिक कटीबद्धता आणि घरात राज्यभरातून येणा-या दिग्गज्जांचा राबता यामुळे काकांच्या भूमिकेशी काकू सहमत होत गेल्या, एकरूप होत गेल्या. त्या काळातील विविध राजकीय व सार्वजनिक जीवनातील चर्चा ऐकल्यावर व्यक्ती म्हणून आलेली प्रगल्भताही काकुंच्या बोलण्यातून जाणवते. अनेक आंदोलनात त्या स्वत: सक्रिय राहील्या. सभांना जात होत्या. त्यातून हे काम नव-याचं नाही तर स्वत:चंही आहे हा वसाच त्यांनी स्वीकाराला. त्यानुसार आई म्हणून मुलांवर संस्कार होत गेले.
१९९८ मध्ये या जोडप्यानं लातूर सोडलं तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली. इतकं संपन्न जोडप आपलं गाव सोडून जात आहे ही वेदना निरोपाच्या प्रत्येक शब्दात होती. आज ते औरंगाबादेत राहत आहेत. या घरातही कायम लोकांचा राबता आहे. काका सारखे कामात असतात आजही. फोन खणखणत असतो. काका नेमकं काय काम करत आहेत याबद्दल काकूंना सर्वच माहिती असते. म्हणजे काकांची पुस्तके असो किंवा त्यांचं वाचन असो. हे सहजीवन अत्यंत प्रगल्भ आणि डोळस आहे. काकू अभिमानाने सांगतात की आम्ही जो विचार घेऊन संसार केलाय तो विचार चारही अपत्यांमध्ये रुजला आहे. चारही मुलांनी साधेपणाने नोंदणी विवाह केला. सगळी मुले डाव्या विचारसरणीला आचरणात आणत आहेत. कोणत्याही कर्मकांडाला त्यांनी कधी थारा दिला नाही. सामाजिक जाणीवांचं हे सहजीवन अत्यंत आनंदी आणि समाधानी आहे. आजही दोघांची बोलण्याची ऊर्जा अचंबित करणारी आहे . काका-काकूंना म्हटलं तुमची लव्ह स्टोरी सांगा तर काकू अशा काही लाजल्या की लाजवाबच! .. म्हणजे कालच लग्न झालंय असं वाटलं. संसारात दोघांची आवड, विचारांची दिशा समान असेल तर संसारात संयम, सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती आपसूकच येते. काका -काकूंच घर म्हणजेही व्हॅलेंटाईन व्हेन्यू आहे. .. आजही...
या तरण्याबांड जोडप्याला एकच म्हणेल.. आय लव्ह यू !
- तृप्ती डिग्गीकर
(सदर लेख तृप्ती डिग्गीकर यांंच्या फेसबुक वॉलवरुन घेण्यात आाला आहे.)