"ताय माझ्या पोराला पोलीस बनायचय"
वेश्या वस्ती म्हणजे आपल्यासाठी अत्यंत बदनाम ठिकाण. पण तिथं काम करणाऱ्या स्त्रीयांना देखील भावना आहेत. मन आहे. हे आपण विसरुन जातो. अशीच एक वेश्या महिला जेव्हा पत्रकार सुवर्णा धानोरकर यांना म्हणते "ताय माझ्या पोराला पोलीस बनायचय"
गेल्यावर्षी 1 मार्चला महिला दिनाच्या शूटला गेलेले. मुंबईत शूट होतं. तडजोड म्हणजे काय ते तिला भेटले तेव्हा कळलं. तिनं तर आयुष्याशीच तडजोड केलीय. स्त्रीत्वाशी तडजोड केलीय. महिलेच्या शरीराला परवानगीशिवाय कुणी हात लावला तर तो तिचा अपमान आणि तिच्या आवडत्या व्यक्तीनं हात नाही लावला तर तोही तिचा अपमानच.
पण मी जिला भेटले तिचं तर आयुष्य अशा विसाव्याला होतं जिथे रोज नवा माणूस येऊन अंगांगाला हात लावायचा. तो तिच्या आवडीचा असो, नसो. ती लावू द्यायची हात. तिचं, तिच्या मुलाचं, तिच्या सावत्र आईचं आणि सावत्र बहिणीचं पोट भरायचं, त्यानं तिच्या अंगाला हात लावला की. उलट त्यानं तिच्या दारात यावं म्हणून ती सजूनधजून बसायची दारात. ती त्याला शरीर सुख द्यायची. पण तिला ते मिळत नव्हतं. तिला ते मिळायचं दोनचार महिन्यातून नवरा आला तिच्याकडे की.
तिचं नाव.. नको तिच्या नावाची गरज काय इथे. तिला वचन दिलंय तिचं नाव नाही सांगणार कुणाला. तिला भेटायला गेलो, मी प्रशांत, विद्याधर, देवेन आणि तिवारी.. तिला फक्त सांगितलं तुम्ही कसं जगता, कसं राहता त्याबाबत स्टोरी करायचीय. महिला दिनी दाखवणार ती. तिची अट एकच ओळख उघड न करण्याची. मी म्हटलं तू म्हणशील तसं.. ती खूश झाली. तिनं सहज विश्वास ठेवला आमच्यावर. विद्याने कॅमेरा सुरु केला. रोल म्हणताच माझा पहिलाच प्रश्न,
'पिक्चरमध्ये वेश्यावस्ती म्हणजे झगमगाट दिसतो. चकचकीत कपडे, लालेलाल ओठ करून मेकअपची पुटं चढवून विचित्र अंगविक्षेप करत गिऱ्हाईकं गोळा करतात. मला इथे तसं काहीच दिसत नाही.'
ती- 'तेवडे पैसे नसतात आमच्याकडे. आमच्याकडे काई गिरायकं येतात नशेत, काम झालं की पैसे मागतो आमी तर मनतात कसले पैसे, राडा करता येत नाय तवा. दुसऱ्या बायका गिरायकं घेऊन असतात. धंद्याची वेळं. कुटे कोनाची खोटी करायची ताय. मनून आमी सोडून देतो तशा गिरायकाला. परत आला की घेत नाय.'
प्रश्न- 'असा कुठला गिऱ्हाईक आहे जो रेग्युलर येतो. त्याला तू आवडते?
उत्तर-'हां खूपेत. येतात. पन माजा नवरा हाय. मी लव मॅरिज केला ना.. तिला थांबवत मी लगेच विचारलं..
'तू लव्ह मॅरेज केलं?
ती- 'हां तो पन गिरायक होता माजा. यायचा. मी आवडायची ना तेला. मला पन मग तो आवडायला लागला. मी मनली तेला, बग आता आवडते मी. तू मनतो लग्न करुया. पन नंतर मनशील तू धंदा करायची... तसं नाय चालनार. जुना कायबी काडायचा नाय. तर तो बोलला हे काम बंद करु नको. आपल्याला संसार करायचाय. पन काम बंद केलं तर आपन खायचं काय? माझं पन काम काय रोजरोज नसतं. कदी पैसे मिळतात कदी नायपन मिळतं. मग मी मटली चालेल. मग आमी केलं लग्न. माजा मुलगा 6 वर्षाचा हाय आता.'
माझे डोळे भरून आले. अशा परिस्थितीत हिनं मुल जन्माला घातलं!
'काय नाव तुझ्या मुलाचं?'
'ताय नका माज्या मुलाला या कॅमेऱ्यात आनू. (ती काकुळतीला आलेली)
'नाही ग! तू विचार करतेस तसं काही नाही. मी सहजच विचारलं. अगं मला पण एक मुलगा आहे. मी पण आई आहे. असं कसं मी तुझ्या मुलाविषयी वाईट विचार करेन. मी सहज त्याचं नाव विचारलं तुला. बरं असू दे. नाव नको सांगू. तू त्याच्यासाठी काय काय खाऊ बनवतेस, त्याला काय आवडतं ते सांग..'
ती- 'तेला मॅगी खूप आवडते. तो मागतो कदी कदी. असले तर देते. नायतर ओरडते तेला आणि सांगते, नाय पैसे तर कुटुन देऊ? समजतो तो लगेच. रडतो थोडा वेळ. मी कदीमदी तेला फिरायला नेते. तेला जुहू चौपाटीला खूप आवडतं. तिकडं नेते. फिरतो आमी दोगं. पानीपुरी, भेल देते. नंतर आईसक्रीमपन देते. तेला ना खिर लय आवडते ताय..'
आता तिचे डोळे भरून आले. तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती थरथरत होती आतून, माझ्या हातांना ते जाणवत होतं. काही क्षणांची ती शांतता मला पार आतपर्यंत खात होती. पुढचा प्रश्न विचारला कसाबसा...
'कुठून आलीस तू इकडे?'
'ताय मी युप्पीची हाय. १६ वर्षाची होते ना तवाच हिकडं आले. माज्या सावत्र भयनींना शिकायचं होतं. बाप लवकर मेला. मग मी ठरवला की, मी करते कायतरी काम. माजी एक मैत्रिन मुंबईत रायची. ती गावाला आली तवा तिला विचारलं मला नेशील का सोबत? काय काम करतीस मीबी करीन. हो मनली ती. आमी आलो मुंबईत. हिकडं आल्यावर ती बोलली, हे काम करते. तुला करायचं असेल तर कर. नायतर शोद दुसरं... मी शिकली दुसरी. मला कोन काम देनार? मनून मीपन धंदा कराय लागले. आदी लई तरास झाला. पन आता काय वाटत नाय. रोजचंच काम हाय.'
प्रश्न- 'सुट्टी घेतेस का कधी?'
'ताय आमचा इते कोनी मालक नाय. आमाला पायजेल तवा आमी सु्ट्टी घेतो. जेनला मालक असतात तेनला लई तरास असतो. काई बायकांना तर पाळीलापन सुट्टी नाय घेयेला देत. अजूनपन हाय कोनी कोनी अशा. पन आमचं नाय तसं. आमी जवा वाटल तवा सुट्टी घेतो.'
'गावाला जातेस कधी?'
'हां. जाते. आय तर मातारी झाली आता. पन जाते वर्षा दोन वर्षातून एकदा. तीन सावत्र भयनी हायत. त्या येतात, मी जाते. आमची पोरं, आमी लय मजा करतो. हिकडं यायला मन नाय होत.'
'तिकडे कुणी विचारत नाही काय काम करते तू?'
आदी विचारायचे. मी कायपन सांगायची दुकानात काम करते. कदी सांगायची घरकाम करते. आय नाय विचारत. तिला मयन्याला पैसे पाटवते थोडे. तिला पुरतात.'
'मग तू कधी दुसरं काम करायचा विचार नाही केला?'
'ताय आमी एकदा हे काम करायला लागलो ना की नावाला चिटकलं ते, नाय दुसरं काम देत कोन. तुमाला काय वाटलं? मी ट्राय नसेल मारला. खूप ट्राय मारला. दुकानात काम करायला गेले. चारपाच दिवस झाले. मालक लोकांनला कळला मी धंदा करायची. ते अंगावर हात घालायला लागले. मग सोडलं दुकान पुना धंदा सुरु केला. इते पैसा मिळतो. दुकानात काम करा, वर मालकाची बळजबरी, आनी धड पैसा पन नाय... मग हे काम काय वाईट हाय? इज्जत नाय आमाला. पन ताय! आमी हाय, मनून तुमी हाय. तुमच्यासारक्या सगळ्या पोरी नाईटला कामावरून घरी जाता. भीती वाटते का? नाय ना? आमच्यामुळे. निदान जेंची इच्छा होते ते आमच्याकडे येतात. मनून अर्ध्या पोरी वाचल्या. नायतर ती दिल्लीतली नाय का तिच्यासाटी खूप लफडा झालेला देशात...'
मी-निर्भया?
'हां तीच...आमी नसतो तर सगळ्या मुलींची अवस्ता निर्भयासारकी झाली असती. आता रोज ते पेपरला हितली बातमी येते ना? ते टीचर होती ती मुलगी तिला एका पोरानं जाळली. लय वाईट. (हिंगणघाट प्रकरण)
'तू पेपर वाचते?'
'हां कदीतरी. पन अशा बातम्या असल्या की इते बोलतात ना सगळे. मग माईत पडतं. रोज वाचायला वेळ नाय मिळत. आमी उटतो धा आकरा वाजता, मग पटापट सगळं आवरून मुलाला आदी शाळेत सोडते. आमचं काम सुरु होतं संद्याकाळी पाच-सा वाजता.'
'मग तेव्हा मुलगा कुठे असतो?'
'तो शाळा, टुशन करून येतो सा वाजता. मग तवा गिरायक असेल तर बाजुचीला सांगते. त्या सांबाळतात. आमी सगळ्या अशाच एकमेकीनला मदत करतो. दुसरं कोन करनार ना... कदी मुलगा घरी आला आनी गिरायक आला तर मी नाय घेत.'
'मुलगा विचारत नाही कधी तुला, काय करते तू? रोज कोण माणसं येतात घरात?'
'नाय... पन टेन्शन येतं ताय कदीकदी. विचारला तर काय सांगायचा.. कदीतरी सांगायलाच लागनार ना. पन अजून छोटा हाय ना तो, मनून नाय सांगत. मला तेला मोटा मानूस बनवायचा हाय. तो मनतो की तेला पोलीस बनायचाय. मी बनवनार. तेच्यासाटीच करतेय आता. आदी भयनी शिकायच्या होत्या मनून धंदा केला आता मुलासाटी करते.'
'तू मुलाला फिरायला नेते तेव्हा कधी कुणी ओळखलं नाही तुला?'
'मी तोंड बांदून जाते. मुलापुडे कोनी ओळकायला नको ना ताय. भीती वाटते मला. पन तूमाला बोलले ना दुसरं काम करायला जा तर लोक अशे वागतात ना की हेच काम चांगलं वाटतं.'
'कधी सोडणार हे सगळं?'
हसली मनापासून 'देव सांगल तवा'
जवळपास ३७ मिनिटं हा संवाद सुरु होता. विद्याचा हातही पार गळून गेलेला. कॅमेरा हातात घेऊनच तो शूट करत होता. तिच्या डोळ्यातले भाव टिपता याव म्हणून त्यानं ट्रायपॉड अव्हॉईड केला. सगळं ऐकून कदाचित त्याचंही मन सुन्न झालं असेल. तिच्या घरातून निघालो. त्या रंगीबेरंगी गल्ल्या शूट केल्या. तिथेच दोन चार घरं सोडून एका मजल्यावर वेश्यांच्या मुलांसाठी ट्युशन आहेत. तिथे गेलो आणि खूप आशादायक चित्र दिसलं. दोन वेश्या इंग्लिश शिकत होत्या. त्यांच्याशी बोललो. तिथे शूटला परवानगी नव्हती. एक सामाजिक संस्था वेश्या आणि त्यांच्या मुलांना शिकवते. शिवणकाम, आर्टिफिशिअल ज्वेलरी आणि बरचं काही. या सगळ्या महिलांसाठी दर तीन महिन्यांनी आरोग्य शिबीर घेते. त्यांना हवी नको ती औषधं, कंडोम पुरवते. त्यांच्या मुलांसाठी वह्या पुस्तकं देते.
सगळे सण या गल्ल्यांमध्ये साजरे होतात. महिला दिनसुद्धा. जगात फक्त हीच एक जागा अशी आहे जिथे जात, धर्म दिसत नाही. खरा सर्वधर्म समभाव तुम्हाला इथेच आणि इथेच दिसेल. बाकी सब सफेद झुठ आणि स्वार्थासाठीचा सर्वधर्म समभाव. शरीराची भूक भागवायला येणाऱ्या प्रत्येकाला जातधर्माचा विसर पडतो. या गल्लीत त्याच्यासाठी फक्त तिचं शरीर महत्त्वाचं असतं. जातधर्म त्याच्या भुकेला शिवतही नाही.
वासना शमवताना जात धर्म म्हणजे अंधश्रद्धा. पण समाजात उजळ माथ्यानं जगताना आम्हाला जात आठवते. धर्म आठवतो. कातडीचा रंगही महत्त्वाचा वाटतो. व्हाईट कॉलर समाज ना आपला, जात, धर्म, लुच्चेगिरी, भ्रष्टाचाराच्या डागांनी भरलेला. त्यापेक्षा या गल्लीत माणुसकी दिसली. विद्या आणि माझ्यासाठी बिसलरीची बॉटल आणली. का? तर म्हणे तुम्ही नका आमच्या खोलीतलं पाणी पिऊ. यांचे विचार उच्च की आमचे?
पुढच्या गल्लीत एक गोरीपान लहान चणीची ट्रॅक- टीशर्ट घातलेली मणीपुरी बाई दिसली. तिच्या मोठ्या ओठांवर डार्क पिंक शेड उठून दिसत होता. गोड हसून उजव्या बाजुला मान उडवून मला विचारलं 'हाऊ आर यू...? मग स्वत:च 'आय ऍम फाईन, थँक्यू...' तिनं शेकहँड केला. मी हात सोडत असताना जाणवत होती तिची तडफड... चल, मलाही तुझ्यासोबत घेऊन. काढ इथून मला बाहरे.
तिथून निघालो. किन्नरांना भेटलो. तिथलाही अनूभव सुखदच... त्या सर्व किन्नरांशी अजूनही बोलणं होतं. पण तिथून येताना पुन्हा वेश्यावस्तीतले शॉट्स हवेत थोडे, म्हणून आम्ही आलो. तिवारी जरा जास्तच उत्साही माणूस. त्यामुळे तोच मला आणि विद्याला घेऊन आला. आमचं नशीब बलवत्तर की आम्ही मार न खाता तिथून सुखरूप बाहेर पडलो. कोण कॅमेरा घेऊन आलं म्हणून तिथे गर्दी जमली मिनीटभरात. पण कसबसं बाहेर पडलो आम्ही.
या गल्लीत प्रत्येक घरापुढे रंगीबेरंगी कपडे वाळत होते. जसे तुमच्या माझ्या घरापुढे असतात. प्रत्येक घरात तेच सगळं होतं, जे तुमच्या माझ्या घरात असतं. तशीच भांडीकुंडी. तेच डबे, वाट्या, चमचे, ताटं. कपड्यांचा पसारा, एक टेबल खुर्ची, तशीच लादी. भिंतीही तशाच बोलक्या, कॅलेंडर ल्यालेल्या. फक्त वेगळेपण दिसलं त्या पार्टिशन केलेल्या खोल्यांमध्ये. तिथेच अडगळीत ट्रेनमधल्या बर्थइतक्या जागेचं पार्टिशन आणि तिथेच बेड. बेड म्हणजे काय तर उंच लोखंडी चौकटीवर प्लायवूड आणि त्यावरच गादी वाटावी असं काहीसं अंथरलेलं. (शूटसाठी तिथेच आम्ही बसलेलो. सुरुवातीला तिथे बसताना मी प्रचंड अस्वस्थ झालेले. आताही तो क्षण आठवून धडधडायला लागलं) एकाच घरात तीनचार गिऱ्हाईकं एकावेळी आली तरी गोंधळ होत नाही. या एका घरात तीनचार बायका आपल्या मुलांसह राहतात. वर्ष झालं तरी एक प्रश्न मनात सतत येतो, कुठे भांडणं झाली की म... भ... च्या शिव्या सर्रास कानावर येतात. या गल्ल्यांमध्ये काय शिव्या देत असतील? जे शब्द आपल्याला सभ्य आणि प्रतिष्ठेचे वाटतात त्या यांच्यासाठी शिव्या असतील का?
- पत्रकार सुवर्णा धानोरकर
लेखिका झी 24 तास या वाहिनीत वृत्त निवेदक आहेत.