जानेवारी महिण्यात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण, जलसंपदा व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. विट्याला ते मंत्री झाल्यानिमित्त जाहिर नागरी सत्कार व शेतकरी मेळावा आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाची पत्रकं आम्ही गावोगाव जावून वाटत होतो. खेडोपाड्यात जावून लोकांना कार्यक्रमाचे निमंत्रण देत होतो. निमंत्रण देताना वयोवृध्द माणसंही भेटायची. त्यांनाही आम्ही कार्यक्रमाला या असं सांगायचो. या निमित्ताने तालुकाभर फिरत होतो. गावा-गावात जावून पत्रकं देत अनाउन्सींग चालू होते. खानापुर तालुक्यातील साळशिंगे गावात निमंत्रण पत्रिका द्यायला गेलो होतो. गावात जावून स्पिकरवर पुकारत पुकारत पत्रकं वाटत होतो. तेवढ्यात समोर एक पंच्च्याहत्तर वर्षाचे आजोबा भेटले. त्यांनी पत्रक पाहिले होते. मी पत्रकं वाटत होतो, त्यांनी मला हाक मारली व विचारले "हे बच्चन कडू विट्याला येणार आहेत का ?" मी म्हंटलं, हो का ओ ? यावर ते म्हणाले, "अहो असला माणूस विट्याला येणार आसल तर आमी कारयकरमाला नक्की येणार. लय नेतं बघिटलं पर आसा नेता न्हाय कुठं, बाकीचं बी हायती की पण हे पाणी येगळंच हाय. बच्चन कडू सारखा नेता राज्यात न्हाय. चोरांच्या गर्दीत ह्यो एकटाच ढाण्या वाघ हाय. कुणाच्या बा ला घाबरत न्हाय. आवं आमी टी व्हीवर बातम्यात बघतू या माणसाला. लाच खाणाराच्या मुस्काडात देतय आणि इधानसभत इजगत कडाडतय. आसला नेता आपल्याकडं पाहिजी हुता. का करायचं या आसल्या बाकीच्या बुजगावण्यास्नी ? त्यास्नी लोकांचं काय देणं घेण न्हायच. भडवं नुस्ती आपलीच घरं भरत बसल्याती. आवं ह्योच माणूस, ह्यो बच्चन कडूच महाराष्ट्राचा मुखमंत्री झाला पाहिजे ! ही शब्दश: प्रतिक्रीया होती त्या आजोबाची. लिहीताना त्यातला एकही शब्द कमी केला नाही की त्यात एखादा वाढवला नाही. या निमित्ताने बच्चू कडूंची जन-माणसात काय प्रतिमा आहे याचा अंदाज करता येतो. ही होती अमरावती जिल्ह्यापासून शेकडो किलोमीटर लांब असलेल्या गावातील एका पंच्च्याहत्तर वर्षाच्या वयोवृध्द शेतकर्याची प्रतिक्रीया. पण बच्चू कडूंच्याबाबत राज्यभरातल्या खेडो-पाड्यातल्या लोकांच्यात हिच भावना आहे. अनेकांना त्यांचे नाव निट घ्यायला येत नाही. बरीच आजोबा मंडळी त्यांना बच्चन कडूच म्हणते. मी अनेकांच्या तोंडातून ते ऐकलं. खरंतर चित्रपटात अन्यायाच्या विरूद्ध पेटून उठणारा बच्चन आणि बच्चू कडू हे एकसारखेच आहेत. पण चित्रपटातल्या बच्चन पेक्षा या वास्तवातल्या बच्चनचा लढा, संघर्ष खुप मोठा आहे. त्यांच्या कामातून उभारलेली सच्चाईची, संघर्षाची आणि सेवेची दिवार फार मोठी आहे. या माणसाचे कौतुक आणि अभिमान महाराष्ट्राच्या काना-कोपर्यात पहायला मिळतो आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत त्यांचे चाहते आहेत. त्यांचे आकर्षण जसे युवकांच्यात आहे तसेच ते वयोवृध्दांच्यात आणि महिला वर्गातही आहे.
बच्चू कडूंचा मतदारसंघ अमरावती जिल्ह्यातील अचलपुर. तिथून सांगली जिल्हा सुमारे आठशे ते नऊशे किलोमीटर. सांगली जिल्ह्यातील एका छोट्या गावातल्या वयोवृध्दाला बच्चू कडू माहित आहेत. त्यांचे कौतुक वाटते, अभिमान वाटतो हे विशेष आहे. सदर वयोवृध्दाने जी भावना बोलून दाखविली तिच राज्याच्या कानाकोपर्यात ऐकावयास मिळते. गेल्या काही वर्षात मीही या माणसाला जवळून अनुभवतो आहे. पण खरंच साळशिंगे गावातल्या आजोबाने म्हंटल्याप्रमाणे हे पाणीच वेगळं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. यातले कैक आमदार पुर्ण मतदारसंघाला माहित नाहीत. आजूबाजूच्या मतदारसंघात तर माहित असायचा प्रश्नच येत नाही. त्यांची जेवढी माहिती असते ती ही पैसे पेरून, पेपरला पुरवण्या काढून, होर्डींग लावून आणि केलेल्या व न केलेल्या कामाचे मार्केटींग करून. हा माणूस आज मंत्री आहे पण त्यांना मंत्रीपदाचा वास लागलेला नाही. त्यांच्यात सत्तेचा माज नाही, मस्ती नाही. जगण्यातला कमालीचा साधेपणा आहे तसाच आहे. कपडे तसलीच साधी खादीची. कधीही ईस्त्री नसलेली. आजही फोन केला तरी मी बच्चू बोलतोय ! हे त्यांचे वाक्य ठरलेले असतेच. फोटो काढायला उभं रहाताना एखादे लहान मुल कसे दोन्ही हात बांधून उभे रहाते अगदी तसेच ते उभे राहतात. त्यांची फोटो देतानाची पोझ पाहताना हा माणूस इतका मोठा झाला तरी अजूनही खराखुरा बच्चूच आहे याची जाणिव होते. बच्चू आहेत पण ते मनातल्या निरागसतेनं, मनातल्या निर्मळतेनं आहेत. त्यांच्या आईने ज्या भावनेनं त्यांचे नाव बच्चू ठेवलं ते नाव आज खर्या अर्थाने सार्थक होतय हे नक्की.
बच्चू कडूंच्या व्यक्तीमत्वातले अनेक पैलू यापुर्वी मांडले आहेत. पण दरवेळी हा माणूस नव्याने भेटत राहतो. नव्याने मनाला धडकत राहतो. प्रचंड आत्मविश्वास, कामाची तडफ, तळमळ, लोकांच्या प्रश्नांची अंत:करणापासून जाणीव त्याचबरोबर लोकांच्या बेजबाबदारपणाची तेवढीच चिड त्यांच्यात दिसून येते. त्यांच्या कामाचा झपाटा आणि वेग कमालीचा आहे. त्यांचा कामाचा दांडगा उरकही दांडगा आहे. मंत्रालयात त्यांच्यासोबत पळताना बहूतेकांची त्रेधातिरपीट उडते. हा माणूस लिप्टची वाट न पाहता मजल्यावर मजले चढत राहतो, उतरत राहतो. अधिकार्यांच्या टेबलला जावून लोकांची कामे करत राहतो. अवती-भोवती, मागेपुढे लोकांचा प्रचंड गराडा असतो. बाकीचे नेते एकटे-दुकटेच असतात. पण खर्या अर्थाने लोकांचे वैभव जमवलेला हा माणूस नेहमी लोकांच्या गराड्यातच असतो. मोठ्या अपेक्षेने राज्यभरातून लोक येतात. त्यात अंध, अपंग, दिन-दुबळे सगळेच असतात. हा माणूस त्या प्रत्येकाला भेटतो, वेळ देतो, त्यांचे ऐकूण घेतो. लोकांच्या महागड्या गाड्या पाहून, त्यांची परिटघडीची कपडे पाहून त्यांना भेटत नाही. सामान्यातला सामान्य माणूस त्यांच्यासमोर हक्काने उभा राहू शकतो, हक्काने काम सांगू शकतो. फाटक्या कपड्यातल्या माणसासमोर वाकून त्याचे काम ऐकूण घेणारा व ते प्राधान्याने सोडवणारा हा माणूस आगळा-वेगळाच आहे. केवळ मतदारसंघातलेच नव्हे तर राज्याच्या काना-कोपर्यातील लोकांचे फोन त्यांना जातात, लोक त्यांना त्यांची गार्हाणी सांगतात. हा माणूस ती गार्हाणी मनापासून सोडवण्याचा प्रयत्न करतो. लॉकडाऊनच्या प्रारंभी मान तालुक्यातील बिदाल या गावापासून दहा-बारा किलोमीटरवर असलेल्या एका गावात पंचवीस तीस मजूर अडकले होते. त्यांना खायला धान्य नव्हते. मोदीजींनी लोकांना दिवे पेटवण्याचे आवाहन केले होते आणि या माणसाचा मला फोन आला की दहिवडीजवळ काही लोक अडकले आहेत त्यांना धान्य द्यायची व्यवस्था करा. मतदारसंघापासून शेकडो किलोमीटर दूर असणार्या दहिवडी गावाजवळ अडकलेल्या कर्नाटकी मजूरांची दखल घेवून त्यांना मदत करणारा हा माणूस म्हणूनच मनाला भावतो. कित्येक नेते मतदारसंघात मदत करत नाहीत, लोकांच्या उपयोगाला पडत नाहीत. एकदम गरिबड्या लोकांना ते भेटत नाहीत मग फोन उचलणे लांबची गोष्ट. खरेतर बच्चूकडूंच्याबद्दल लिहीण्यासारखे खुप प्रसंग आहेत पण शेवटी लेखनसीमा आहेच. उद्या त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना दिर्घायुष्य लाभो. त्यांच्याहातून नेहमी अशीच गोर-गरिबांची सेवा घडत राहो. जन-सामान्यांचा हा बच्चन कडू खरंच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा. याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
- दत्तकुमार खंडागळे
लेखक वज्रधारी न्युजचे संपादक आहेत...