परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवून उभी राहत उपजिल्हाधिकारी झालेली शेख वसीमा
नांदेड जिल्ह्यात शिराढोन, उस्मानगर, भुत्याची वाडी, जोशी सांगवी, लोंढे सांगवी, तेलंग वाडी या हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्या वस्तीतील जोशी सांगवी हे एक छोटंसं गाव. शेख वसीमा महेबुब ही त्याच जोशी सांगवी गावातील रहिवासी. घरची परिस्थिती अगदी सामान्य. आई मोलमजुरी करते तर दोन भाऊ रिक्षा चालवतात. पण वसीमाला शिक्षणाची गोडी लागली आणि आपली परिस्थिती शिक्षणातूनच बदलू शकते याची तिला जाणीव झाली.तीच माध्यमिक शिक्षण बाचोटी, ता.कंधार येथे झाले. तर कॉलेजला जाऊन शिकावं, अशी परिस्थिती नसल्याने पदवी तिने मुक्त विद्यापीठातून घेतली आहे.
दररोज वर्तमानपत्र वाचण्याची तिला आवड.. त्यात ती वाचायची वेगवेगळ्या यशस्वी लोकांच्या 'यशोगाथा' "त्यातूनच मला प्रेरणा मिळाली असं वसीमा सांगते." आणि अशा सामान्य घरात राहून जिद्दीने अभ्यास करत वसीमाने पहिल्यांदा 'विक्रीकर निरीक्षक' ही पोस्ट मिळवली व नागपूरला जॉईन केलं.
पण तिचं ध्येय व जिद्द मोठी होती, ती तेवढ्यावरच थांबली नाही. तिला आपली आणि परिवाराच्या कष्टाची जाण होती. तिला ही परिस्थिती बदलायची होती, तिने अभ्यास सोडला नाही. आणि 2019 ची राज्यसेवा परीक्षा तिने दिले नुकताच त्या परीक्षेचा निकाल आला, त्यात तिने राज्यातून मुलींमध्ये खुल्या गटातून तिसरा क्रमांक मिळवत 'उपजिल्हाधिकारी' ही पोस्ट मिळवली आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्रातून तिचं कौतुक होत आहे. पण आता इथून पुढे कित्त्येक वर्षे वसीमा शेख ही परिस्थितीशी लढत शिकणाऱ्या हजारो मुलामुलींना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व, तिचा यशाचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी असेल.. हे मात्र नक्की.
जगदीश ओहोळ, प्रेरणादायी व्याख्याते