14 महिन्यांपूर्वी पोलिसांशी वाशीच्या रस्त्यावर उभा पंगा घेणाऱ्या प्रियंका नावाच्या तरुणीचा वीडियो वायरल झाला होता. पोलिसांच्या आरे ला कारे करणारी ही मुलगी झोम्याटो गर्ल म्हणून सर्व सोशल मीडियावर वायरल झाली होती. तिला तब्बल १४ महिन्यांनंतर जामीन मिळाला आणि ती भायखळा जेलमधून बाहेर आली. पण आता पुढे आता जीवनात परत उभे रहाणे हे मोठे आव्हान असल्याचे प्रियंकाने जेलमधून बाहेर आल्यानंतर म्हटले आहे.
प्रयास नावाच्या संघटनेने प्रियंकाच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. तर क़ायद्याने वागा संघटनेने हातभार लावला दोन महीने सतत पाठ पुरवा केला. त्यानंतर प्रियंकाची सुटका झाली. एका विशिष्ट परिस्थितीत प्रियंकाने चूक केली होती. पण तिला एवढे महिने तुरुंगात खितपत पडावं लागले याला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप राज असरोंडकर यांनी केला आहे. तसेच सरकारने प्रियंका आण तिच्या ४ वर्षांच्या मुलीचे पालकत्व स्वीकारावे अशा मागणीचे पत्रही गृहमंत्र्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
आता प्रियंका बाहेर आली आहे, सध्या ती तिच्या ४ वर्षांच्या मुलीला भेटायला सासरी गेली आहे, मात्र वृध्द वडील, चार वर्षांची मुलगी आणि खिशात दमड़ी नाही, हाताला काम नाही अशा स्थितीत प्रियंकाला जीवनाची पुन्हा सुरुवात करायची आहे आणि पुढे कोर्टाची लढाई देखील लढायची आहे.
प्रियंकाचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. प्रेम विवाह आणि त्यानंतर आपल्या साडे तीन वर्षाच्या मुलीसोबत ती स्वतंत्रपणे राहते. पूर्वी गोवा इथे एचआरमध्ये ती कामाला होती. नंतर नवी मुंबईमध्ये झोमॅटोमध्ये डिलिव्हरी गर्ल म्हणून ती काम करत होती. पण एका छोट्याशा चुकीने तिचे जीवन बदलले.
तुरुंगात काढलेल्या दिवसांबद्दल सांगताना ती म्हणते, अंडरट्रायल व्यक्तींना वेगळी कामे द्यावी असा नियम आहे, मात्र तिथे संडास साफ करण्यापासून सगळी कामे करावी लागली. त्यात जेवण चोरीला जाणे आणि इतर महिला क़ैदयांची वागणूक फार त्रासदायक ठरली.