"मी आणि गणेश नाईक लिव्ह इनमध्ये राहत होतो", महिलेची महिला आयोगाकडे तक्रार

गणेश नाईक मला व मुलाला मारून टाकीन अशी धमकी देत असल्याची तक्रार संबंधित महिलेने महिला आयोगाकडे केली आहे.

Update: 2022-04-08 09:52 GMT

आमदार गणेश नाईक त्यांच्यापासून मला मुलगा झाला असून आता ते मला व मुलाला ठार मारून टाकण्याची धमकी देत आल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या विरोधात संबंधित महिलेने तक्रार दाखल केली आहे..

काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी केलेले आरोप ताजे असताना आता भाजपच्या एका आमदारावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने ते माझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते व त्यांच्यापासून मला एक मुलगा आहे असा खुलासा केला आहे. आता गणेश नाईक मला व मुलाला मारून टाकीन अशी धमकी देत असल्याची तक्रार संबंधित महिलेने महिला आयोगाकडे केली आहे.

गणेश नाईक यांच्यावर आरोप केलेल्या महिने तक्रारीत म्हटले आहे की, आमदार गणेश नाईक यांच्यासोबत मी 1993 पासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये आहे. आणि त्यांच्यापासून मला मुलगा झाला. गणेश नाईक आठवड्यातून दोन ते तीन दिवस माझ्यासोबत राहायचे व आमचे शारीरिक संबंध होते. तेव्हा ते महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री होते. आता माझा मुलगा पंधरा वर्षाचा झाला आहे. त्याच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून काही ठोस उपाययोजना करा असं गणेश नाईक यांना सांगितल्या नंतर ते आज करू उद्या करू असे सांगून टाळत होते. मी काही बोलले कि ते मला व मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत आहे. मुलाला न्याय देणे गरजेचे आहे. या सगळ्याचा विचार करून कोणाच्याही दबावाला बळी न पडता तक्रार करत असल्याचं संबंधित महिलेला म्हंटले आहे.

या सगळ्या प्रकरणावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी, या संदर्भातील तक्रार महिला आयोगाकडे दाखल झाली असून यासंदर्भातील सविस्तर माहिती आम्ही घेत आहोत. त्यांनी जे आरोप केले आहेत त्यासंदर्भात त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का? याची शहानिशा करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणी गणेश नाईक यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना फोन द्वारे संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. जशी त्यांची याबाबतची प्रतिक्रीया मिळेल ती  या बातमीत अपडेट केली जाईल. 

Tags:    

Similar News